लालपरीचे 75 वर्षे

बुधवार, 1 जून 2022 (11:17 IST)
1 जून 1948 साली केवळ 35 बेडफोर्ड गाड्यांवर एसटीची सुरूवात झाली. त्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या दिवसाला 74 वर्षं पूर्ण झाली, म्हणजेच पुढील संपूर्ण वर्ष हे एसटीचं अमृतमहोत्सवी वर्ष आहे. याच दिवशी एसटीची पहिली गाडी पुणे-नगर या मार्गावर धावली. याच ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून बरोबर 74 वर्षांनी महामंडळाची इलेक्ट्रिक बस याच पुणे-नगर मार्गावर 1जूनला धावणार आहे. हा दुग्धशर्करा योग महामंडळाने साधला आहे. आज एसटीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या आरामदायी गाड्या आहेत. नवीन आलेल्या माइल्ड स्टीलच्या बांधणीच्या गाड्या आहेत. वातानुकूलित, बिगर वातानुकूलित अशाही काही गाड्या आहेत. खेड्यापासून शहरांपर्यंत जनसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त तिच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.
  
1950 रोजी प्रवासी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण झालं आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाली. लाल पिवळ्या रंगाची ओळख सांगणारी एसटी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात राज्याची ध्येयधोरणे घेऊन ग्रामीण जनतेपर्यंत पोहचू लागली. केवळ एसटीमुळेच महाराष्ट्रातील गावं एकमेकांशी जोडली गेली. ग्रामीण भागात जी काही शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचली ती केवळ लोकवाहिनी एसटीमुळेच. एसटी ग्रामीण जनतेची रक्तवाहिनी झाली. चुल आणी मुल या चौकटीतून मुलींना शिक्षणाच्या दारापर्यंत एसटीने पोहचवले हे विसरता कामा नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती