नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि हेमंत करकरे यांनी हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे ते आमचे शत्रूच होते. पण, त्यांच्या हत्येशी आमच्या साधकांचा अजिबात संबंध नाही, असे स्पष्ट करतानाच, आमच्याविरोधात बोगस साक्षीदार उभे करून सीबीआय आम्हाला बदनाम करत आहे, असा आरोप सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळकर यांनी केला आहे.
वीरेंद्र तावडे याच्या अटकेच्या पाश्र्वभूमीवर ‘सनातन’ने सध्या आपली बाजू मांडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून मंबई मराठी पत्रकार संघात काल पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पुनाळकर यांनी वरील वक्तव्य केले. सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांनी ‘सनातन’च्या विरोधात कट रचला आहे. संजय साडविलकर या बोगस साक्षीदाराला उभे करून आम्हाला बदनाम केले जात आहे, असा आरोप ‘सनातन’चे प्रवक्ते अभय वर्तक यांनी यावेळी केला. वर्तक यांनी यावेळी साडविलकरवरही तोफ डागली. साडविलकर हा भ्रष्टाचारी असून त्यांना हिंदूंच्या श्रद्धास्थानांनाही सोडलेले नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील रथाची चांदी त्याने चोरली आहे. आमच्या संस्थेचे साधक शिवानंद स्वामी यांनी यापूर्वी त्याच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्याचा राग मनात धरून आता तो ‘सनातन’च्या विरोधात उभा राहिला आहे. तो सीबीआयला विकला गेला आहे. साडविलकरला साक्ष देण्यासाठी किती पैसे मिळाले याची ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्टद्वारे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वर्तक यांनी केली.