श्रीरामाचा धांवा Shri Ramacha Dhava
मंगळवार, 28 मार्च 2023 (10:44 IST)
हे रामसख्या तुज भक्तछळण कां साजे ।
तव ब्रीद तोडरीं राम दयार्णव गाजे ॥धृ०॥
या कलियुगिं सकलहि दुर्बल हे श्रीरामा ।
नच देहशक्ति बा मानसीक हि आम्हां ॥
जरि इच्छिसि तपहि न होतें आम्हां कडुनी ।
झट ज्वरादिकें तनु पीडित थोडें करुनी ॥१॥हे राम-
एकाग्र मनहि नच जपध्यानादिकिं होय ।
तव प्राप्तिस्तव या कोणतीहि नच सोय ॥
नच धनधान्य हि बा विपुल असे या आम्हां ।
कलिं सकल दृष्टीनें हीन भक्त बहु रामा ॥२॥हे राम-
असहाय बालका देखुनि माता धावे ।
मम भक्त म्हणुनिया त्वरितचि आम्हां पावे ॥
तूं देव त्रयाचा चालक पालक अससीं ।
जगिं अघटित करण्या शक्य असुनिया तुजसी ॥३॥हे राम-
या कलिकालाचे निमित्त पुढती करुनी ।
नच फसवी आम्हां भोळे भाविक म्हणुनी ॥
असहाय निरंकुश वीर श्रेष्ठ तूं होसी ।
तव सम न शक्त बा कोणिहि गोचर मजसी ॥४॥हे राम-
तव विरह व्यथेनें बहुत दुःख या होई ।
चिर दुःखित आम्हां झडकरि दर्शन देई ॥
तव दासाम आम्हां विघ्न कायसें रामा ।
तव उदासीनता कारण या सुखधामा ॥५॥हे राम-
मी निर्गुण निष्क्रिय अरुप म्हणुनि न राहे ।
नित स्थूल कार्य जगिं स्थूलचि रुपें बाहें ॥
बहु भक्तां दर्शन देऊनि पावन केलें ।
आतांचि असें कां मौन जाडय बा धरिलें ॥६॥हे राम-
तव परम प्रीतिचा आर्यधर्म हा आतां ।
जगिं लुप्त प्राय बा होत कुणि न या त्राता ॥
कितीकांच्या मानी सुर्या पडति कितिकांच्या ।
निजधर्मासाठीं पाठीं पोटिं भोळ्यांच्या ॥७॥हे राम-
किति पादत्राणें कुंकुमसतिचें पुसुनी ।
सति पुढति पतीचा खून बहू छळ करुनी ॥
नव युवति कुमारिहि तदीय हे रघुनाथा ।
किति भ्रष्ट करुनि मग केल्या भ्रष्ट सुमाता ॥८॥हे राम-
किति असति बिघडल्या सति पति मज ना गणती ।
किति अंगावरचीं पोरें पयाविण रडती ॥
मायबापाविण बा कितिक बालके दीन ।
किति त्यक्त-ग्रामगृह विदेशी धनकणहीन ॥९॥हे राम-
हे कितिक सुधार्मिक कुलीन बळजबरीनें ।
परधर्माचें जूं वागवीति भीतीनें ॥
त्या दुष्टांच्या करि हताश होउनि रामा ।
अति करुण अश्रुनें बाहति तुज सुखधामा ॥१०॥हे राम-
किति कोमल कुलिना बाल बालिका युवती ।
किति पतिव्रता सति यवनांच्या दुर्नीतीं ॥
बहु नीच छळण बा सोसुनि मनिं कढताती ।
मग निराशतेच्या दीर्घश्वासिं तुज बाहती ॥११॥हे राम-
कुणि दिव्य शक्तिचा साधु वा संन्यासी ।
अभिमान बाळगुनि सोडवील आम्हांसी ॥
हे दीन हिंदुजन आशा करिती रामा ।
आम्हांसि तरी दे योग्य शक्ति सुखधामा ॥१२॥हे राम-
मज ऐकवेन हे नयनातुनि जल वाहे ।
बहु हृदयि पीळ बा पडुनी प्रार्थित आहे ॥
झणिं धाव पाव बा धर्माच्या अभिमानें ।
जरि ना तरी दे बळ आम्हां या करुणेनें ॥१३॥हे राम-
बहु नियम वर्तवुनि धर्म मालवूं बघती ।
सामान्य जनहि हे धर्मशल्य हा म्हणती ॥
बहु अनीतिसी बा ऊत आलासे जगतीं ।
अवतार घेई जरि ना, दे शक्ति आम्हां ती ॥१४॥हे राम-
हा धर्म सनातन महत्त्व परि याचें हें ।
जगिं नेणुनि सकल हि अंध जाहले पाहे ॥
या धर्माचें बा महत्व वठवुनी दावी ।
स्वतःची ना तरी करवी आम्हां करवीं ॥१५॥हे राम-
झणिं देह धरुनि क्षणिं वाढुनिया सुखधामा ।
हा अधर्म हाहाःकार शान्तवी रामा ॥
हा आवडीचा तव धर्म आतां नच राहे ।
जरि वेळ लाविसि म्हणवुनि तुज बहु बाहे ॥१६॥हे राम-
हे रामसख्या तुज भक्तछळण कां साजे ।
तव ब्रीद तोडरीं रामदयार्णव गाजे ॥धृ०॥हे राम-
रचनाकार - श्रीधरस्वामी महाराज