पुणे मेट्रोत ढोल-ताशा वादन, जादूचे प्रयोग अशा कार्यक्रमांचं आयोजन का केलं जातंय?
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (16:42 IST)
काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रोमध्ये ढोल-ताशा वादन सुरू असतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर या व्हीडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. आता 31 ऑगस्टला पुणे मेट्रोच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं, ते चर्चेचं केंद्र बनलंय.
पुणे मेट्रोच्या वनाज स्टेशनमध्ये जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर हा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या एका यंत्रणेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम कसे काय केले जात आहेत? ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
याचवर्षी 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींनी मेट्रोतून सफरही केली. यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येकी एका असा मार्ग प्रवासासाठी सुरू झाला.
पुणे शहरात वनाज ते गरवारे कॉलेज मार्ग (5 किलोमीटर) आणि पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते फुगेवाडी (7 किलोमीटर) हे मार्ग सुरु करण्यात आले. पुणे मेट्रोचा पूर्ण प्रकल्प हा सध्या 33 किलोमीटरचा आहे. त्यातले हे दोन छोट्या टप्प्यांचे मार्ग सुरु प्रवाशांसाठी सुरू झाले.
सुरुवातीला मेट्रोच्या प्रवासाला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. लोकांमध्ये मेट्रोच्या प्रवासाबद्दल उत्सुकता होती. रोजच्या प्रवासी संख्येनंही उच्चांक गाठत एका दिवसात 67 हजार प्रवासी संख्येचा आकडा पार केला. पुणे शहरातील दूरच्या भागातून या स्टेशनपर्यंत येऊनही काहींनी मेट्रोची राईड अनुभवली.
पण हा गोल्डन पीरियड लवकरच संपला. महामेट्रोने दिलेला माहीतीनुसार, आता दोन्ही मार्ग मिळून मेट्रोच्या दररोजच्या प्रवाशांची संख्या ही 5 हजारावर आली आहे. विकेंडला हा आकडा 8 ते 9 हजारावर जातो. असं का झालं? याविषयी आम्ही पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारांकडून जाणून घेतलं.
"पुण्यात गरवारे कॉलेज ते वनाज एवढाच मार्ग आहे. तो कुणालाच उपयोगाचा नाही. धड डेक्कनला पण जाता येत नाही. पहिले दोन महिने मेट्रो बघायची या उत्सुकतेपोटी लोकं आनंदाने मेट्रोत चढले. ते प्रवासासाठी नव्हतं. तर जॉय राईड होती. अता त्यातील उत्सुकता संपली.
जोपर्यंत त्याला पुढे कनेक्टिव्हिटी मिळत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. हा यातला प्रॅक्टिकल भाग आहे. असं असेल तर मग मेट्रो सुरु का झाली? असा प्रश्न निर्माण होतो. तर त्याचं उत्तर आहे तेव्हा डोळ्यांसमोर असलेल्या पालिका निवडणुका," असं महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांनी सांगितलं.
घसरलेल्या प्रवासीसंख्येवर महामेट्रोचं काय म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेतलं.
"सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत मेट्रोची सुविधा सुरू असते. साधारणपणे दिवसात 27 फेऱ्या होतात. कुठलाही मोठा प्रकल्प एकाच वेळी पूर्ण सुरु होत नाही. जसं एखादा महामार्ग असेल तर तो आधी 50 किलोमीटर मग शंभर किलोमीटर असा सुरू होते. आता या टप्प्यात तेवढी रायडरशीप आलेली नसते. तसंच मेट्रोतचंही आहे. काही गोष्टी अजून कनेक्ट व्हायच्या आहेत."
"जसे की, सिव्हिल कोर्ट, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट. ही महत्त्वाचा ठिकाणं आहेत. ही कनेक्ट झाल्यावर जी अपेक्षित रायडरशीप आहे ती आपल्याला मिळेल. संपूर्ण मार्ग सुरु झाल्यावर जॉय रायडरची संख्या कमी असेल. रेग्युलर वापर सुरु होईल. प्रत्येक शहरात हाच अनुभव आहे. जेव्हा एका भाग सुरु होतो, तेव्हा पाहिजे ती रायडरशिप मिळत नाही. जेव्हा संपूर्ण रुट सुरू होतो तेव्हा वाढते. तसा सर्व्हेपण केला जातो," असं महामेट्रोचे कार्यकारी संचालक आणि जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे यांनी सांगितलं.
कोणत्याही नॉन-मेट्रो शहरात मेट्रोतल्या प्रवासीसंख्येचा म्हणजे रायडरशीपचा मुद्दा निर्माण होतो असं तज्ज्ञ सांगतात. त्यात पुण्यातले सुरु झालेले मार्ग हे कमी अंतराचे आहेत आणि शहरातल्या मुख्य भागांपर्यंत पोहोचणारेही नाहीत त्यामुळे पुण्यात रायडरशीपचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर रायडरशीप वाढवायची असेल तर लोकांना आकर्षित करण्याशिवाय पर्याय नाही, असं प्रशांत आहेत सांगतात. त्यासाठी लोकांना काही आणखी पर्याय देणं गरजेचं आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोकडून 'सेलेब्रेशन ऑन व्हिल्स' नावाचा एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये छोटेखानी कार्यक्रमासाठी मेट्रोची सफर बूक करता येते. त्यासाठी काही दर मेट्रोकडून आकारले जातात. जसे की 1 ते 100 प्रवाशांसाठी 5000 रुपये.
101 ते 150 प्रवाशांसाठी 7500 रुपये. 7 दिवसांआधी याचं बुकिंग होऊ शकते. यामध्ये वाढदिवस, कविता वाचन यांसारखे छोटेखानी कार्यक्रम केले जाऊ शकतात. ढोल वादन आणि जादूचे प्रयोग याच उपक्रमाचा भाग असल्याचं मेट्रोकडून सांगण्यात आलंय. यालाही मर्यादित प्रतिसाद पाहायला मिळतोय. जुलै महिन्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला.
"जास्तीत जास्त लोकांनी मेट्रोचा अनुभव घ्यावा यासाठी आम्ही 'सेलेब्रेशन ऑन व्हिल्स' ही योजना सुरु केलेली आहे. त्या अनुषंगानेच या गोष्टी होत आहेत. ढोल-ताशांचं पण जे वादन झालं होतं ते याच धर्तीवर झालं होतं. त्यांनी विनंती केली होती की, गणपतीच्या आगमनाआधी आम्हाला परवानगी मिळावी. ती आम्ही दिली होती. तसंच जादूचे प्रयोगही सेलेब्रेशन ऑन व्हिल्स अंतर्गतच केलं जातंय.
"जे काही प्रवासी आहेत त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मेट्रो कशी आहे याची उत्सुकता त्यांच्यात असते. त्यांच्यासाठी आपण हे करतोय. छोटेखानी कार्यक्रमांसाठी जसे की वाढदिवस साजरा करणे, कविता वाचन, छोटे वाद्य वाजवणे यासाठी सेलेब्रेशन ऑन व्हिल्सअंतर्गत परवानगी दिली जाते. तिथे प्रवासी संख्या कमी होती आणि गणपतीच्या आगमनाप्रित्यर्थ त्यांनी ती परवानगी मागितली होती. त्यात गैर काही नाही," असं हेमंत सोनावणे यांनी सांगितलं.
हा उपक्रम आणि मेट्रोविषयी प्रवाशांना काय वाटतं याची पण आम्ही चाचपणी केली. गरवारे कॉलेज ते वनाज स्टेशन या प्रवासात काही प्रवाशांसोबत संवाद साधला. दुपारी 2-3 या दरम्यान प्रवासी संख्या कमीच होती. एका बेंचवर एक जण असे साधारणपणे बसले होते. यातील बरेच जण मेट्रो प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी मित्र परिवार किंवा कुटूंबातील सदस्यांसोबत रिटर्न तिकीट काढून बसले होते. संध्याकाळी 5-8 दरम्यान प्रवासी संख्या वाढते असं महामेट्रोचं म्हणणं आहे.
यामध्ये अथर्व कळुस्कर हा गरवारे कॉलेज मध्ये शिकणारा विद्यार्थी मेट्रोचा नियमित प्रवासी आहे. तो आयडियल कॉलनी मध्ये राहतो.
"मला मेट्रोचा प्रवास बरा वाटतो. बसमध्ये गर्दीत जाण्यापेक्षा मी 3 किलोमिटरचा प्रवास मेट्रोवर करतो. माझं घर आयडीयल कॉलनी स्टेशन जवळच आहे. त्यामुळे मला सोयीचं होतं. पण जर मेट्रो चुकली तर मग पुढचे 30 मिनिटं वाट पाहावी लागते. मी प्रवास करतो तेव्हा कमीच लोक असतात. विकेंडला थोडी संख्या वाढलेली दिसते. तसं हे अंतरही कमी आहे," असं अथर्व कळुस्करने सांगितलं.
मेट्रोमध्से नंदुरबारच्या कॉलेजमध्ये वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांचा एका ग्रुप भेटला. "मी पुण्याची आहे पण माझी मैत्रीण पंढरपूरची आहे. ती माझ्याकडे आलीये. त्यामुळे आम्ही मेट्रोत बसायला आलो. आम्ही मुंबई मेट्रोमधूनही प्रवास केला आहे. आता पुण्याच्या मेट्रोतून प्रवास करतोय. मला तरी फार काही फक्त जाणवला नाही. पण गर्दी कमी असल्याने चांगलं वाटतंय," असं त्यातल्या एका मुलीने सांगितलं.
उज्जैनवरुन पुण्यात नातेवाईकांकडे भेटीसाठी आलेले अजय वाघ मेट्रोतून प्रवास करत होते. "घरी कंटाळा आला म्हणून मी मेट्रोतून प्रवास करण्यासाठी आलो. मी दिल्ली, मुंबईच्या मेट्रोतून प्रवास केला आहे. न्यूयॉर्क आणि लंडन ट्रेन मध्ये पण बसलो आहे. पुण्यात आलोय तर म्हटलं की पुणे मेट्रोत पण बसावं," असं अजय वाघ यांनी सांगितलं.
पुणे मेट्रो सध्या मर्यादित मार्गांवर धावते आहे. ते अंतरही कमी आहे. पुणे आणि उपनगरांमध्ये सुखकर आणि जलद प्रवास व्हावा यासाठी पुढच्या मार्गांवरही मेट्रो धावणं आवश्यक आहे. नुकतंच गरवारे कॉलेज तो डेक्कन अशी या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.
सिव्हिल कोर्ट स्टेशनपर्यंतच्या मार्गाचं काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यता महामेट्रोकडून वर्तवण्यात आली आहे. हे कामं पूर्ण झाल्यावरच चाचण्या होऊ शकतील. दिवाळीआधी गरवारे कॉलेज ते पालिका हा मार्ग सुरु करण्याचं मेट्रोचं ध्येय असल्याचं सांगितलं जातं. हा मार्ग सुरू झाल्यावर प्रवासी संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
"कमी अंतरासाठी मेट्रो का सुरु करण्यात आली? आतापर्यंतचा इतिहास असा आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यापर्यंत होतात. 15 मार्चला पालिकेच्या सभागृहाची मुदत संपून 16 मार्चला नवीन सभागृह अस्तित्त्वात येणं अपेक्षित असतं. त्यामुळे आचारसंहिता लागणार आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर 5 वर्षांआधी भाजपचं मेट्रो सुरू करण्याचं आश्वासन पुर्ण झाल्याचं दाखवण्यासाठी आणि एक इव्हेंट घडवण्यासाठी पंतप्रधानांच्या हातून मेट्रोचं उद्घाटन झालं."
पण निवडणुका पुढे गेल्या आणि आजच्या तारखेलाही ते कधी होतील सांगता येत नाही. गरवारे ते पालिका हा मार्ग त्यांना दिवाळीपर्यंत सुरू करायचा आहे. आता जर पालिकेपर्यंतचा मार्ग सुरू झाला तर दिवाळीनंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी हा परत इव्हेंट होईल," असं प्रशांत आहेर यांनी सांगितलं.