पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात लोकमान्य टिळक स्मारक समिती तर्फे देण्यात येणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला. याच पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले आहेत. पुण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाचे पूजन करून केली जाते, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी पायाभरणी आणि उद्घाटन करण्यापूर्वी महाराष्ट्रातील पुणे येथील दगडूशेठ गणपती मंदिरात भेट दिली.
दरम्यान पुण्यात उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ठिकाणी जवळपास 20 मिनिटे होते. याठिकाणी त्यांनी अभिषेक करत आरती केली. त्यानंतर पंतप्रधना नरेंद्र मोदी यांनी गणपतीचे दर्शन घेऊन साकडं घातलं आहे. सिंधूताई सकपाळ यांच्या कन्या ममता सकपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औक्षण केले. यावेळी भारताने सोडलेलं चांद्रयान चंद्रावर 21 ऑगस्ट रोजी व्यवस्थितपणे उतरण्याचा असा संकल्प भारतीयांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
“देवतांप्रती त्यांची अपार श्रद्धा आहे. ट्रस्टच्या वतीने पंतप्रधानांना चांदीचा गणपती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती त्यांना दिली. यासाठी महिनाभर आधीपासून तयारी सुरु होती. पंतप्रधानांच्या संकल्पामध्ये भारत विश्वगुरु व्हावं आणि आपण सोडलेलं चांद्रयान 3 हे चंद्रावर सुरळीतपणे उतरावं अशी प्रार्थना करण्यात आली,” अशी माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली..