झटपट श्रीमंत होण्यासाठी उच्च शिक्षित तरुणांनी थेट एटीएम फोडले

सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (06:23 IST)
पिंपरी चिंचवडमध्ये झटपट श्रीमंत होण्यासाठी उच्च शिक्षित तरुणांनी एटीएम फोडून ७७ लाखांची चोरी केली आहे. या प्रकरणी दोघांना गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून ६६ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपी हे मूळ जळगावचे असून उच्च शिक्षित आहेत.
 
मनोज उत्तम सूर्यवंशी (वय- ३० रा.जळगाव) याने इलेट्रोनिक डिप्लोमा केला असून, किरण भानुदास कोलते (वय- ३५ रा. जळगाव) याने देखील मॅकेनिकल इंजिनिअरिंग केलं आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघी पोलीस ठाण्याच्या परिसरात वडमुखवाडी आणि माऊलीनगर येथे दोघांनी रेकी करून एटीएम फोडून ७७ लाखांची रक्कम लंपास केली होती. दरम्यान, यातील आरोपी मनोज सूर्यवंशी हा इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केला असून काही वर्ष त्याने एटीएम मशीन बनवण्याच्या कंपनीत काम केले होतं. तसेच तो एटीएममध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीचे काम देखील करायचा. त्यामुळे त्याला एटीएम मशीनबाबत सर्व माहिती होती.
 
 त्याने जळगाव भुसावळ येथील ओळखीचा मित्र किरण कोलते याला सोबत घेऊन एटीएम फोडायचे आणि झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यानुसार त्यांनी दोन एटीएमची रेकी करून डिजिटल लॉक तोडून एटीएममधील तब्बल ७७ लाख रुपये लंपास केले होते. पैकी काही रक्कम कोलतेच्या घरी, तर उर्वरीत रक्काम आरोपी किरण काम करत असलेल्या कंपनीत लपवून ठेवली होती. त्यांनी काही पैसे मौज मजेत उडवले देखील आहेत, असं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती