उत्तराखंडच्या हल्दवानीमधील बनभूलपुरा इथं गुरूवारी हिंसाचार सुरू झाला.
हल्दवानी क्षेत्रामधील बनभूलपुरा इथं आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू असताना दगडफेकीला सुरुवात झाली असं पोलिसांनी सांगितलं.
पोलीस सांगतात, इथं एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली, त्यामुळे सामान्य लोकांसह सरकारी संपत्तीचंही नुकसान झालं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बनभूलपुरामध्ये कथित बेकायदेशीररित्या बांधलेल्या एका मदरशाला तोडण्याचं काम पोलीस करत होते. तेव्हा स्थानिकांनी जाळपोळीला सुरुवात केली आणि दगडफेक केली. मदरसा हटवण्याच्या कामात नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस सहभागी होते. या हिंसेत किमान 60 लोक जखमी झाले आहेत.
नैनितालच्या जिल्हा माहिती अधिकारी ज्योती सुंदरियाल यांनी या घटनेत 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती बीबीसीचे सहयोगी पत्रकार राजेश डोबरियाल यांना दिली आहे.
हिंसक जमावाकडून जाळपोळ
हिंसक जमावाने अनेक वाहनांची जाळपोळ केली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकींचा समावेश आहे. जाळपोळ झालेल्या वाहनांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीच निश्चित माहिती हाती आलेली नाही, असं त्या म्हणाल्या
हिंसाचारादरम्यान डझनभर पत्रकारांसह अनेक पोलीस आणि प्रशासनातील लोकंही जखमी झाले आहेत.
कायदा सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता केंद्रीय सुरक्षा दलाच्या चार तुकड्यांसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील पोलिस दलांना गुरुवारी संध्याकाळीच हल्दवानी येथे पाचारण करण्यात आलंय.
सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे मदरशाचे बांधकाम करण्यात आले होते आणि तो पाडण्याची आगाऊ नोटीस देण्यात आली होती, असं एसएसपी प्रल्हाद मीणा यांनी सांगितलं.
नैनितालच्या जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांनी सांगितलं की, पुढील आदेश येईपर्यंत हलद्वानी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.