प्रेषित पैगंबर अवमान प्रकरण : नुपूर शर्मांनी टीव्हीवरुन देशाची माफी मागावी - सुप्रीम कोर्ट

शुक्रवार, 1 जुलै 2022 (16:02 IST)
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांनी टीव्हीवरून देशाची माफी मागावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
 
प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणावर दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्या. सुर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी सुरू होती. यावेळी कोर्टाने शर्मा यांच्यावर ताशेरे ओढले.
 
यावेळी कोर्टाने म्हटलं, "नुपूर शर्मांची जिभ घसरली. त्यांच्या बेताल वक्तव्याचा परिणाम म्हणून देश पेटला. अखेर, उदयपूर हत्या प्रकरणासारखी दुर्दैवी घटनाही घडली.."
 
नुपूर शर्मांनी यांनी तत्काळ माफी मागितली होती आणि वक्तव्य मागे घेतलं होतं, असं त्यांचे वकील मनिंदर सिंह यांनी सांगितलं.
 
यावर कोर्टाने म्हटलं, "शर्मा यांनी माफी मागण्यास प्रचंड विलंब केला. शिवाय, त्यांनी सशर्त माफी मागितली आहे. त्यांच्या याचिकेत उद्धटपणा दिसतो. त्यांनी टीव्हीवर जाऊन माफी मागायला हवी होती."
 
"पक्षाच्या प्रवक्त्या आहात म्हणून काहीही बोलता येईल असं समजू नका," असं कोर्टाने म्हटलं.
 
नुपूर शर्मा यांनी देशात विविध ठिकाणी दाखल झालेले FIR दिल्लीत हस्तांतरित करावे अशी याचिका केली आहे. त्याला कोर्टाने नकार दिला.
 
"प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी आहे, तशीच त्या त्या ठिकाणी सुरू राहणार," असं कोर्टाने सांगितलं आहे.
 
ज्या प्रकारे त्यांनी देशाभरात भावना भडकवल्या, त्या पाहता सध्या देशात जे काही घडत आहे, त्याला शर्मा यांचं वक्तव्य कारणीभूत आहे, असं कोर्टाने म्हटलं.
 
याला उत्तर देताना शर्मा कुठेही जाणार नाहीत, त्या तपासात वेळोवेळी सहकार्य करतील, असं स्पष्टीकरण त्यांच्या वकिलांनी दिलं. पण तरीही कोर्टाने शर्मा यांच्याविरुद्धच्या सर्व याचिकांची सुनावणी एकाच ठिकाणी करण्यास नकार दिला.
 
काय आहे प्रकरण?
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याचे पडसाद जगभरात उमटले. ईशनिंदा केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांचं भाजपमधून निलंबन झालं असलं तरी हा वाद आता पेटलेला आहे.
 
पैगंबरांचा विवाह आणि इस्लाम धर्मातल्या काही मान्यतांबाबत हे वक्तव्य आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून बोलताना शर्मा यांनी अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी हे उद्गार काढले होते. त्यांच्या विधानांची री भाजपचे दिल्लीतले नवीन जिंदाल यांनी ओढली आणि हा वाद वाढला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानपूर दौऱ्यापूर्वी याचे पडसाद कानपूरमध्ये उमटले आणि दोन गटांमध्ये या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. मात्र, हा वाद भारतातच न थांबता देशाच्या सिमेपलिकडे गेला.
 
या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोदी सरकारवर जगभरातून टीका होतेय. कतार, कुवेत, इराण या देशांसह इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेनं यावर जोरदार आक्षेप घेतलाय. या देशांनी 5 जूनला त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांना बोलावून घेतलं आणि आपला निषेध व्यक्त केला होता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती