'इतिहासकारांनी केवळ मुघलांचीच चर्चा केली' - अमित शाह

रविवार, 12 जून 2022 (12:28 IST)
"भारतातील बहुतांश इतिहासकारांनी केवळ मुघलांचीच चर्चा केली. त्यांनी पांड्य, चौला, मौर्या, गुप्ता आणि अहोम राज्यकर्त्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलं." अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
 
'महाराणा : सहस्त्र वर्ष का धर्म योद्धा' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यानिमित्ताने ते दिल्लीत बोलत होते.
 
अमित शाह म्हणाले, "मला इतिहासकारांविषयी बोलायचं आहे. आपल्याकडे अनेक राजवटी होऊन गेल्या. परंतु इतिहास लिहिणाऱ्यांनी या राजवटींची इतिहासात नोंद करण्याची वेळ आली तेव्हा मुघल राजवटीची चर्चा केली. पांड्य राजवट 800 वर्षे होती, आसाममध्ये अहोम राजवट 50 वर्षे होती. खिलजीपासून औरंगजेबपर्यंत अनेकांना त्यांनी पराभूत केलं. त्यांनी आसामला स्वतंत्र ठेवलं."
 
ते पुढे म्हणाले, "पल्लव साम्राज्य 600 वर्षे चाललं, चालुक्य साम्राज्य 600 वर्षे तर मौर्यांनी 550 वर्षे अफगाणिस्तानापासून श्रीलंकेपर्यंत राज्य केलं. सातवाहनने देखील 500 वर्षे राज्य केलं. गुप्त राजवटीने 400 वर्षे. समुद्र गुप्तने पहिल्यांदा भारत संकल्पनेला वास्तवात साकारण्याचा प्रयत्न केला आणि यशही मिळवलं. पण यावर ग्रंथ लिहिण्यात आले नाहीत.
 
"टीका न करता अभिमानास्पद इतिहास आपण सांगायला हवा. चुकीचा इतिहास आपोआप मागे पडेल. सत्य समोर येईल. यासाठी खूप लोकांनी काम करण्याची गरज आहे," असंही अमित शाह म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती