नोटबंदी काळात सर्वाधिक नोटा नाशिकच्या नोटप्रेसमध्येच छपाई होऊन पाठविण्यात आल्या होत्या. यावेळी नाशिकच्या नोटप्रेस कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून नोटांची छपाई करत दिलासा दिला होता. परराष्ट्र मंत्रालयाकडून ई-पासपोर्टसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. ई-पासपोर्टसाठी लागणारी चीप नाशिकरोड प्रेसला उपलब्ध करण्यासाठीदेखील वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे समजते.
परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्टबाबत नाशिकरोडच्या प्रेस प्रशासनासोबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती आहे. सरकार दरवर्षी सरासरी एक कोटी पासपोर्ट देत असते. प्रगत देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप असलेले ई-पासपोर्ट उपलब्ध केले जातात. भारतात मात्र, अजून छोट्या डायरीच्या स्वरुपात पासपोर्ट दिला जातो.
पासपोर्टची छपाई देशात फक्त नाशिकरोडच्या प्रेसमध्येच होते. हा पासपोर्ट बंद करून इलेक्ट्रॉनिक चीप असलेला ई-पासपोर्ट जारी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. केंद्रीय अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग व प्रेस महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पात्रा घोष यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला भेट दिली होती. तेव्हापासून ई-पासपोर्टबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.