अरुणाचल प्रदेशातून चिनी सैन्याने अपहरण केलेल्या तरुण मिराम तेरनच्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. मिराम तेरनचे वडील ओपांग तेरन यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलाचा चिनी सैन्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला, त्यामुळे मिराम अजूनही शॉकमध्ये आहे. त्यांनी सांगितले की चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने त्यांच्या मुलाला मारहाण केली. त्यांच्या मुलाचे चिनी सैन्याने अनेक छळ केले. त्याला डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवायचे. त्याचे हातही बांधलेले होते. तेथे चिनी अधिकाऱ्यांनी त्याला लाथांनी मारहाण केली, त्याला विजेचे शॉकही दिले.
मिराम तरेन हा तरुण 18 जानेवारीला अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बेपत्ता झाला होता. यानंतर चिनी सैन्याने त्यांचे अपहरण केल्याचे समोर आले. मात्र, चिनी लष्कराने हा आरोप फेटाळून लावला . त्यानंतर चीनमध्ये हरवलेला तरुण सापडल्याची माहिती चिनी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
27 जानेवारी रोजी चिनी सैन्याने मिरामला भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले होते, मात्र येथे त्याला आयसोलेट करण्यात आले होते. सोमवारी त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्हा उपायुक्त शाश्वत सौरभ यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने सियांग जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात मिरामला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. घरी परतल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडूनही त्यांचे स्वागत करण्यात आले.