मिळालेल्या माहितीनुसार बिहार सरकारचे कामगार संसाधन मंत्री संतोष कुमार सिंह यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. संतोष कुमार सिंग यांनी मंगळवारी दावा केला की, त्यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई म्हणून ओळख देणाऱ्या एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कामगार संसाधन मंत्री संतोष कुमार सिंह यांनीही मंगळवारी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच कामगार संसाधन मंत्री संतोष कुमार सिंह यांनी धमकीच्या कॉलची संपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "मंगळवारी माझ्या मोबाईलवर एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई अशी करून दिली. त्याने ३० लाख रुपयांची मागणी केली.
मंत्री संतोष कुमार सिंह म्हणाले की, फोन करणाऱ्याने त्यांना पुन्हा एकदा फोन करून बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची आठवण करून दिली. तो म्हणाला की जर पैसे दिले नाहीत तर तो मंत्र्यालाही अशाच प्रकारे मारेल. धमकीचा फोन आल्यानंतर मंत्री संतोष कुमार सिंह यांनी लगेचच डीजीपींना माहिती दिली. मंत्री म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हेगारी खटला दाखल नाही किंवा त्यांचे कोणाशीही राजकीय वैर नाही. त्याचवेळी, पोलिसांनी सांगितले की या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.