अमित शाहांनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत 'त्या' बैठकीत काय झालं होतं...

रविवार, 11 जून 2023 (11:02 IST)
"उद्धवजी, सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात," अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.अमित शाह यांची नांदेड येथे शनिवारी (10 जून) जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते.
 
यावेळी अमित शाह यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी वाटाघाटी सुरू असताना शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत सांगितलं.
 
अमित शाह म्हणाले, "मी तेव्हा भाजपचा अध्यक्ष होतो. मी आणि देवेंद्र फडणवीस वाटाघाटी करण्यासाठी गेलो होतो. उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं होतं की, बहुमत एनडीएला मिळाल्यास देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.
 
"निकाल आले आणि एनडीएला बहुमत मिळालं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी आश्वासन पूर्ण केलं नाही. ते सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले."
याच बैठकीवरून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतमतांतरे आहेत. किंबहुना, मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरूनच शिवसेना आणि भाजप यांची तीस वर्षांची युती तुटली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर ते बसले.
 
भाजपसोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर बंद दाराआड झालेल्या या बैठकीबाबत भाजप आणि उद्धव ठाकरे कायमच वेगवेगळे दावे करताना दिसतात आणि नेमकी काय चर्चा झाली, हा वादाचा मुद्दाच राहिला आहे.
 
अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना 7 सवाल
दरम्यान, नांदेडच्याच सभेत बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना 7 सवाल केलेत.
 
1) ट्रिपल तलाक रद्द करण्याला तुमची सहमती आहे की नाही?
 
2) काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याला तुमची सहमती आहे की नाही?
 
3) रामजन्मभूमीवर राममंदिराला तुमची सहमती आहे की नाही?
 
4) समान नागरी कायदा तुम्हाला हवा की नको?
 
5) धर्माच्या आधारावर आरक्षण संविधानसंमत नाही. मुस्लिम आरक्षणाबाबत तुमचे मत काय?
 
6) कर्नाटकच्या इतिहासातून वीर सावरकरांना काढण्याला तुमची सहमती आहे का?
 
7) जेथे तुम्ही आहात, तेथे औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगरच्या नामांतराचेही तुम्ही समर्थन करु शकत नाही.
 
हे प्रश्न विचारताना अमित शाह म्हणाले, "उद्धव ठाकरे एकाच वेळी दोन जहाजांमध्ये तुम्हाला बसता येणार नाही. दुहेरी भूमिका तुम्हाला घेता येणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर याबाबत तुम्ही भूमिका स्पष्ट करा, तुमची पोलखोल आपोआप होईल."
 
अमित शाह यांच्या टीकेवर आता उद्धव ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती