मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डन मार्केटमध्ये सोमवारी एका इमारतीला आग लागली. दिल्ली अग्निशमन सेवा विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, दुपारी 2 वाजता राजौरी गार्डन मेट्रो स्टेशनजवळ आग लागल्याची माहिती मिळाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे कारण अजून समजू शकलेले नाही. आगीमुळे परिसरात दाट धुराचे लोट पसरल्याने आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन कार्य सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे. तसेच ही घटना दिल्लीच्या राजौरी गार्डनच्या जंगल जंबोरी रेस्टॉरंटची आहे. ही आग इतकी वेगवान होती की काही वेळातच संपूर्ण रेस्टॉरंट जळून खाक झाले. त्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांमध्येही भीतीचे वातावरण होते.