उन्नत क्षण

सोमवार, 6 मार्च 2023 (14:21 IST)
त्या घरापाशी टॅक्सी नेऊन थांबवली, हॉर्न वाजवला
आणि बरीच मिनिटं थांबलो
 
शेवटी उतरून दारापाशी जाऊन कडी वाजवली
 
"आले, आले.."
एक कापरा, वृद्ध आवाज आणि फरशीवरून काहीतरी ओढल्याची जाणीव
 
बर्‍याच वेळाने दार उघडलं
नक्षीकामाच्या झग्यात आणि फुला-फुलाच्या हॅट मधली
चाळीस सालच्या चित्रपटातून उतरून आलेली
एक नव्वदीची वृद्धा
 
हातातल्या दोरीमागे नायलॉनची बॅग
आणि त्यामागे एक आवरलेलं, स्तब्ध शांततेतलं निर्मनुष्य घर
बिनभांड्यांचं स्वयंपाक घर, आणि बिन घड्याळाची भिंत
 
"माझी बॅग नेणार का उचलून गाडीत?"
 
मी एका हातात बॅग घेऊन दुसर्‍याने त्या वृद्धेला हात दिला
"थॅंक यू!"
"त्यात काय मोठंसं, मी नेहेमीच करतो अशी मदत
माझ्या आईलाही इतरांनी असंच वागवावं म्हणून."
 
"किती छान बोललास रे बाबा! थॅंक यू!"
 
तिने पत्ता दिला मला, आणि म्हणाली
"आपण शहरातून जाऊयात का?"
"ते लांबून पडेल.."
"पडू देत रे, मला कुठे घाईये..
वृद्धाश्रमात जातेय मी, आता तोच स्टॉप शेवटचा !"
 
मी आरश्यातून मागे पाहिलं
तिचे ओले डोळे चकाकले
"माझं कुणी राहिलं नाहीये...
आणि डॉक्टर म्हणतात
आयुष्यही फार राहिलं नाही"
 
मी हात लांबवून मीटर बंद केलं
 
"कुठून जावूयात?"
 
पुढचे दोन तास आम्ही शहरभर फिरलो
गल्ल्या-बोळातून, हमरस्त्यांवरून
ती कुठे काम करायची ते तिनं दाखवलं
ती आणि तिचा नवरा लग्न करून रहायला आले
ते घर दाखवलं
एका जुन्या गोदामापुढे गाडी थांबवून म्हणाली
"पूर्वी इथे नृत्यशाळा होती, मी नाचले आहे इथे"
काही ठिकाणी नुसतीच कोपर्‍यावर टॅक्सी थांबे
ती टक लावून इमारतीकडे पाही, अबोलपणे
मग खुणेने "चल" म्हणे
 
सूर्य मंदावला
"थकले मी आता, चल जाऊयात"
 
आम्ही अबोल्यात वृद्धाश्रमात पोहोचलो
टॅक्सी थांबताच दोन परिचारक पुढे आले
तिला व्हीलचेअर मध्ये बसवून तिची बॅग घेते झाले
तिने पर्स उघडली, "किती द्यायचे रे बाळा?"
"काही नाही आई, आशीर्वाद द्या."
 
"अरे तुला कुटुंब असेल. आणि पोटा-पाण्याची..."
"हो, पण इतर प्रवासीही आहेत, होईल सोय त्याची"
खाली वाकून म्हातारीला जवळ घेतलं
आणि चटकन् टॅक्सीत बसलो, डोळे चुकवत..
"मला म्हातारीला आनंद दिलास रे, सुखी रहा!"
 
व्हीलचेअर फिरली, गाडी फिरली
माझ्या मागे दार बंद झालं
तो आवाज एका आयुष्याच्या बंद होण्याचा होता
 
उरल्या दिवसभर मी एकही प्रवासी शोधला नाही
शहरभर फिरत राहिलो
असाच विचारांत हरवून
 
माझ्या ऐवजी, पाळी संपत असलेला एखादा 
चिडका ड्रायव्हर भेटला असता तर..
मीही स्वतःच, एकदा हॉर्न वाजवून, निघून गेलो असतो तर..
 
मला जाणवलं, मी काही खास केलं नव्हतं,
 
उन्नत क्षण आपण शोधून मिळत नसतात
ते क्षण आपल्याला शोधत येतात
 
आपण फक्त जागं असलं पाहिजे!

- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती