उगवले नारायण, उगवले गगनांत

सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (12:13 IST)
उगवले नारायण, उगवले गगनांत
उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात
 
उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर
 
उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस
 
वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी
 
हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी
 
मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत
 
- बहिणाबाई चौधरी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती