कोव्हिड होऊन गेलेल्यांना हृदयविकाराच्या झटक्याची भीती वाढलीय का?

बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (12:30 IST)
-सुशीला सिंह
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गंभीर कोव्हिडचा सामना केलेल्या लोकांनी कठोर परिश्रम, धावणे किंवा जास्त व्यायाम करणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. त्यांनी आयसीएमआरने केलेल्या एका अभ्यासावरून हा सल्ला दिला आहे.
 
नुकतंच गुजरातमध्ये नवरात्रीदरम्यान लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यात आता आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.
 
याबाबतचे व्हीडिओही व्हायरल झाले आहेत. नवरात्रीमध्ये 12 व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समोर आली होती.
 
"आयसीएमआरनं नुकताच यावर विस्तृत अभ्यास केला आहे. त्यात असं म्हटलं आहे की, ज्यांना गंभीर कोव्हिडची लागण झाली होती आणि त्याला फार दिवस झाले नसतील तर हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी किमान एक ते दोन वर्ष अधिक परिश्रमाचं काम, जास्त वर्कआऊट, धावणे किंवा जास्त व्यायाम करणे टाळायला हवे," असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले.
 
यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी एका कार्यक्रमातही यावर चर्चा केली होती.
 
"कोव्हिडनंतर अचानक हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याचे प्रकार समोर येत आहेत. आयसीएमआरनं अभ्यास सुरू केला आहे. व्हॅक्सिनेशन आणि को-मॉर्बिडिटी याबाबतचा डेटा आमच्याकडे आहे," असं ते म्हणाले होते.
 
सोबतच त्यांनी याबाबत अहवाल सादर केला जाणार असल्याचंही सांगितलं होतं.
 
आयसीएमआरमधील डॉ. अॅना डोगरा यांनी याबाबत बीबीसी हिंदीला सांगितलं की, "आयसीएमआरनं त्यांच्या अभ्यासाबाबतचा अहवाल पीयर रिव्ह्यू म्हणजे तज्ज्ञांना अभ्यासासाठी पाठवला आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आरोग्य मंत्रालय याबाबत माहिती देईल."
 
कोव्हिड आणि हार्ट अटॅक यांचा संबंध जोडणे योग्य आहे का?
आयसीएमआरचा रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. पण त्यापूर्वी कोरोना आणि शरिरावर होणारे परिणाम याबाबत दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयात संशोधन करण्यात आलं होतं.
 
2020 ते 2021 दरम्यान 135 जणांवर केलेल्या या संशोधनात त्यांच्या हृदयावर याचा परिणाम झाल्याचं आढळून आलं.
 
या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना सतत निगराणीमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या हृदयावर झालेला कोरोनाचा परिणाम कमी होत गेला.
 
याच संशोधनात सहभागी असलेल्या एका डॉक्टरांनी बीबीसीला सांगितलं की, "आमच्या संशोधनात कोरोनामुळं हृदयावर परिणाम झाल्याचं समोर आलं. कोव्हिड व्यक्तीच्या हार्टच्या इलॅक्ट्रिकल सिस्टीम, हार्टचे पंपिग मसल आणि हार्टच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करतं."
 
त्यांनी सांगितलं की, ज्या लोकांना गंभीर कोव्हिड झाला होता, त्यांना अधिक परिश्रम न करण्याचा सल्ला देण्यात आला. कारण त्यामुळं त्यांच्या हृदयावर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळं त्यांना कठोर परिश्रम किंवा व्यायाम न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
 
कोव्हिड झालेल्या रुग्णांमध्ये हार्ट अटॅकची शक्यता वाढली होती, हेही अभ्यासात समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.
 
"पण ज्या लोकांना कोव्हिड झाला त्यांना हार्ट अटॅक येणारवर यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण जोपर्यंत मोठ्या स्तरावर संशोधन होत नाही आणि त्याचे निष्कर्ष समोर येत नाही, तोपर्यंत स्पष्टपणे काही सांगता येणार नाही," असंही त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं.
 
लस आणि हार्ट अटॅक यात किती तथ्य?
त्याचवेळी डॉक्टर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं वक्तव्यदेखिल अंत्यंत संतुलित आणि योग्य असल्याचं सांगतात.
 
ज्या लोकांना गंभीर कोव्हिडचा सामना करावा लागला आहे, त्यांनी कठोर परिश्रम केल्यास त्यांच्या हृदयावर दबाव पडू शकतो. त्यामुळं हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढू शकतो, असं ते म्हणाले.
 
त्यांच्या मते, "जे रुग्ण गंभीर कोव्हिडमधून बरे झाले आहेत, त्यांनी व्यायामाला हळू-हळू सुरुवात करावी. अचानक वेगानं त्यांनी व्यायामाची सुरुवात करता कामा नये."
 
कोव्हिडदरम्यान लोकांना लस घेण्याचा सल्ला देण्यात आला.
 
नंतर अशी शंकाही व्यक्त करण्यात आली की, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर लोकांना हार्ट अटॅक होऊ शकतो. या मुद्द्यावर वादळी चर्चाही सुरू होती.
 
पण जीबी पंतमधील अभ्यासात हेदेखिल समोर आलं की, ज्या लोकांचं लसीकरण झालं त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकची जास्त प्रकरणं समोर आली नाहीत.
 
कोव्हिडची लस घेतल्यानंतर हार्ट अटॅकची प्रकरणं वाढली, असं काही नसल्याचं डॉक्टरांचं मत आहे.
 
तरुणांमध्ये आधीती हार्ट अटॅकची प्रकरणे समोर येत होती का?
नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. ओपी यादव म्हणाले की, "गेल्या दोन तीन दशकांचा विचार केला तर, सुमारे 10 टक्के हार्ट अटॅक अशा लोकांना येत होते जे 40 पेक्षा कमी वयाचे होते. एवढंच नाही तर, 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांच्या बायपास सर्जरीचं प्रमाणदेखील 10 टक्के होतं."
 
तरुणांमध्ये हार्ट अटॅकची प्रकरणं आधीही समोर येत होती. पण काही सेलिब्रिटींचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याच्या बातम्यांनंतर तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याची चर्चा सुरू झाली, असं डॉ ओपी यादव म्हणाले.
 
डॉ. ओपी यादव यांनी याबाबत एक प्रश्नही उपस्थित केला. "ज्यांना हार्ट अटॅक आला त्यांना को-मॉर्बिडिटी जसे - डायबिटिज, हायपरटेन्शन, लठ्ठपणा अशा समस्या होत्या का, हे कोणी पाहिलं का? त्यांचे लिपिड प्रोफाइल काय होते?
 
जेव्हा असे मृत्यू होतात तेव्हा या गोष्टीचाही अभ्यास करायला हवा. कारण हार्ट अटॅकच्या प्रकरणांत ऑटोप्सी होत नसल्याचं पाहिलं गेलं आहे, असंही ते म्हणाले.
 
कोरोनानंतर डॉक्टर कठोर व्यायाम टाळण्याचा सल्ला का देत आहेत?
दोन्ही डॉक्टरांनी सल्ला दिला की, जर एखादा व्यक्ती गंभीर कोव्हिडमधून बरा झालेला असेल, तर त्यानं लगेचच पूर्वीप्रमाणं कठोर व्यायाम करायला नको.
 
डॉ. ओपी यादव म्हणाले, "कोव्हिडमुळं तुमचं रक्त अधिक घट्ट होतं. त्याचे क्लॉट किंवा गाठी तयार होतात. हार्ट अटॅक कोलेस्टेरॉल जमा झाल्याने येत नाही. कारण ते हळू-हळू अनेक वर्षांमध्ये जमा होत असतं. पण जेव्हा त्याचा सरफेस रप्चर असतो आणि त्यातून वाहणारं रक्त त्याठिकाणी जमा होऊ लागतं, तेव्हा तसं व्हायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं क्लॉट तयार होतात आणि त्यामुळं हार्ट अटॅक येतो."
 
त्यामुळं कोव्हिडदरम्यान रक्त पातळ करण्याचं औषधही दिलं जात होतं. जर हृदयात रक्ताची गाठ झाली तर हार्ट अटॅक येऊ शकतो आणि मेंदूत झाली तर स्ट्रोक येतो.
 
अशाचप्रकारे शरिराच्या वेगवेगळ्या भागात रक्ताच्या गाठी तयार झाल्याने परिणाम होतो.
 
दोन्ही डॉक्टरांच्या मते, ज्यांना गंभीर कोव्हिड झाला होता आणि सोबत को-मॉर्बिडिटी असेल त्यांचा कोरोना पूर्णपणे बरा झाल्यानंतर एक दीड वर्षानेच हळू हळू व्यायाम सुरू करायला हवा.
 
डॉक्टर खालील सल्ला देतात -
 
जर तुम्ही पहिल्या दिवशी 200 मीटर चालत असाल तर काही दिवसांनी 400 मीटर चाला आणि अशाप्रकारे हळू-हळू गती वाढवा.
कठोर आणि अवघड व्यायाम करुच नका.
तुम्हाला आधी एखादं काम करताना दम लागत नव्हता आणि आता बदल झाला असेल, तर डॉक्टरांना लगेचच सांगा.
डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीमध्ये वेदना होणे, हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढत असेल आणि असे आधी होत नसेल, आणि ही सर्व लक्षणं कोरोना बरा झाल्यानंतर दिसत असतील, तर डॉक्टरांना नक्की दाखवा.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जे रुग्ण कोरोनातून बरे झाले असतील आणि कोणत्याही वयाचे असतील तरी त्यांनी व्यायाम जरूर करावा, पण त्याचं प्रमाण हळू-हळू वाढवायला हवं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती