लैंगिक छळाची 17 प्रकरणे, सर्व गप्प तर जबाबदार कोण?

रूपाली बर्वे

शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (16:20 IST)
* दाक्षिणात्य सिनेविश्वात लैंगिक शोषणाची वाढती प्रकरणं
* हेमा कमिटीच्या अहवालात धक्कादायक खुलासे
* मल्याळम इंडस्ट्रीचं गलिच्छ रूप
* कोणी कोणावर गंभीर आरोप केले?
* सर्व गप्प तर जबाबदार कोण?

Mollywood #MeToo कोलकता कांड आणि नंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये लहान मुलींसोबत लैंगिक छळच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या दोन्ही प्रकरणात न्याय मिळवा म्हणून लोक रस्त्यावर उतरले. देशभरातील डॉक्टर्स संपावर गेले तर जनतेने रेल्वे स्टेशन जाम केले. देशभरात आपआपल्या पातळीवर संघटनांनी विरोध नोंदवला. तर टीव्ही आणि सोशल मीडियावर न्यायासाठी आवाहन केले गेले. तसेच दुसर्‍या बाजूला मल्याळम चित्रपटसृष्टीत लैंगिक शोषणाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. जस्टिस हेमा कमिटीच्या अहवालात अशी अनेक छुपी रहस्ये उघड झाली आहेत, ज्यानंतर आतापर्यंत आशा गमावलेल्या महिलांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची कहाणी उघड केली आहे.
 
हेमा समितीचा अहवाल समोर आल्यापासून मल्याळम चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री लैंगिक छळावर उघडपणे बोलत आहेत. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीत होत असलेल्या लैंगिक छळ आणि गैरवर्तनाचा खुलासा केला आहे. अनेक दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शकांवर आरोप करताना त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्सच्या नावाखाली इंडस्ट्रीत त्यांच्याशी किती घृणास्पद कृत्ये करण्यात आली हे सांगितले आहे.
 
लैंगिक छळाच्या आरोपांमुळे मल्याळम चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार, अभिनेता सिद्दीकी आणि दिग्दर्शक रंजीत यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. सत्ताधारी सीपीएमच्या एका आमदारासह चित्रपटातील व्यक्तिरेखांवर लैंगिक छळाचे आरोप करण्यासाठी महिला कलाकार पुढे येत आहेत.
 
कोणी कोणावर गंभीर आरोप केले?
या प्रकरणी मल्याळम चित्रपट निर्माते रंजीत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर अभिनेता सिद्दीकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता केरळमधील अभिनेता-राजकारणी एम मुकेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2009 मध्ये घडलेल्या एका घटनेबाबत पश्चिम बंगालमधील एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून दिग्दर्शक रंजीत विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पलेरी 'माणिक्यम' या चित्रपटात काम केल्यानंतर दिग्दर्शकाने लैंगिक हेतूने तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप तिने केला होता. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिने रंजीत यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तसेच कोझिकोड येथील एका व्यक्तीने चित्रपट निर्माता रंजित यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्याचा दावा केला आहे. 2012 मध्ये बेंगळुरूमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दिग्दर्शकाने त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा दावा त्या व्यक्तीने केला आहे.
 
'दृश्यम' फेम अभिनेता मोहनलालवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला तेव्हा संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला. यानंतर त्यांना मल्याळम मूव्ही-आर्टिस्ट असोसिएशन (AMMA) चा राजीनामा द्यावा लागला.
 
सोनिया मल्हारने तिच्या सहकलाकारावर गैरवर्तनाचा आरोप केला आणि म्हणाली की मला त्याने झोपायला तयार हो असे म्हटले. अभिनेत्री मिनू मुन्नर हिने लोकप्रिय अभिनेता जयसूर्यावर शारीरिक आणि शाब्दिक शोषणाचा आरोप केला आहे. आता या प्रकरणी अभिनेता जयसूर्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 
 
मीनू मुन्नरने दावा केला आहे की जयसूर्याने 'दे इंगोट्टु नोक्कीये' चित्रपटाच्या सेटवर तिचे लैंगिक शोषण केले होते. हे प्रकरण 2008 सालचे असल्याचे सांगितले जात असून आता त्याला वेग आला आहे. अभिनेता जयसूर्याशिवाय अभिनेता मुकेशवरही लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दोघांशिवाय इडवेला बाबू आणि मनियानपिला राजू यांच्यावरही हेच आरोप करण्यात आले आहेत. अभिनेत्री मीनू मुनीर हिने सुप्रसिद्ध अभिनेते मुकेशसह सहा जणांवर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचाराचा आरोप केला आहे. 2013 मध्ये काम करताना या लोकांनी आपले शोषण केल्याचे त्याने एक पोस्ट शेअर करून उघड केले.
 
अभिनेत्री गीता विजयन आणि श्रीदेविका या दोन्ही अभिनेत्रींनी इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक तुलसीदास यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गीता विजयनने एका मुलाखतीत सांगितले की, ती 1991 मध्ये 'चन्चट्टम' चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक तुलसीदास यांनी त्यांचे शोषण केले होते. ते रोज रात्री दार ठोठावायचे. श्रीदेविकाने दिग्दर्शक तुलसीदास यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपानुसार 2006 मध्ये जेव्हा त्या 'अवन चंडियुडे मकन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये होती, तेव्हा तुलसीदासने तिला खूप त्रास दिला होता.
 
मल्याळम अभिनेत्री सोनिया मल्हारने आता तिच्यासोबत झालेल्या विनयभंगाची गोष्ट सांगितली आहे. 2013 मध्ये तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य घडल्याचे अभिनेत्रीने उघड केले. शॉटनंतर अभिनेत्री बाथरूममध्ये गेली आणि जेव्हा ती परत आली तेव्हा एका अभिनेत्याने तिला पकडले. ती जागा निर्जन असल्याने ती खूप घाबरली आणि रडू लागली. मात्र अभिनेत्याने सोनियाला रडताना पाहिल्यानंतर लगेचच आपल्या चुकीबद्दल माफी मागितली.
 
सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते बाबुराज यांच्यावर एका महिलेने असे आरोप केले आहेत की ऐकून चाहत्यांनाही धक्का बसेल. असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA) चे संयुक्त सचिव बाबुराज यांच्यावर एका ज्युनियर आर्टिस्टने त्यांना केरळच्या घरी बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
 
दिग्दर्शक साजीन बाबूवर दोन महिलांनी लैंगिक छळ आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. हेमा समितीच्या तपासात या दोन्ही महिलांनीही आपले म्हणणे मांडले, त्यानंतर या अहवालाने सर्वांनाच धक्का बसला. दुसरीकडे ही बातमी साजीन बाबूपर्यंत पोहोचताच दिग्दर्शकाने आपली चूक ताबडतोब मान्य केली आणि आपण दोन्ही महिलांकडून आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली असल्याचे सांगितले.
 
हेमा समितीचा अहवाल का जाहीर करावा लागला?
मल्याळम उद्योगातील महिलांवरील लैंगिक गैरवर्तनाच्या तक्रारींची चौकशी करणे आणि भविष्यातील घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे समितीचे प्राथमिक कार्य होते. समितीच्या माध्यमातून मल्याळम चित्रपट उद्योगातील महिला कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आणि लैंगिक छळ, शोषण आणि अत्याचाराशी संबंधित महत्त्वाचे तपशील देण्यात आले. आतापर्यंत हेमा समितीचा अहवाल केरळ सरकारने सार्वजनिक केला नव्हता, परंतु आरटीआय कायदा 2005 मुळे 19 ऑगस्ट रोजी केरळ सरकारला हा अहवाल सार्वजनिक डोमेनमध्ये जाहीर करावा लागला.
 
अहवालात धक्कादायक खुलासे
मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांची स्थिती जाहीर करणाऱ्या या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या अहवालात मल्याळम उद्योगातील महिलांच्या शोषणाचे 17 प्रकार उघड झाले आहेत, ज्यातून उद्योगात काम करणाऱ्या महिलांना जावे लागते. यामध्ये लेडीज टॉयलेट, चेंजिंग रुम, पगारात भेदभाव, कामाच्या बदल्यात सेक्सची मागणी अशा सर्व प्रकारच्या शोषणाचा उल्लेख करण्यात आला आहे.
 
समिती कशी स्थापन झाली?
14 फेब्रुवारी 2017 च्या एका प्रकरणानंतर हेमा समिती स्थापन करण्यात आली होती. 14 फेब्रुवारी 2017 रोजी मल्याळम चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या कारमधून कोचीला जात होती. त्यानंतर तिचे अपहरण करून तिच्याच कारमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. त्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांच्या सुरक्षेचा विचार करून, जुलैमध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती हेमा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.
 
इतक्या वर्षांनी अहवाल का सादर केला गेला
केरळ सरकारने 295 पानांच्या अहवालातून 63 पाने काढून तो जारी केला आहे. हा अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये जस्टिस के हेमा, अभिनेत्री शारदा, निवृत्त आयएस अधिकारी के बी वल्सा कुमारी यांचा समावेश होता. या अहवालात कास्टिंग काउच, लैंगिक छळ, चित्रपटाच्या सेटवरील सुरक्षा, सेटवरील गैरवर्तन, सायबर गुंडगिरी, मासिक पाळीदरम्यान महिलांची स्थिती यासारख्या समस्यांचा समावेश आहे. हेमा समितीचा अहवाल उशिरा जाहीर झाल्याबद्दल बरीच टीका झाली होती. 
 
आता हेमा समितीच्या तपासाची आग बंगाली चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीने इंडस्ट्रीतील लैंगिक छळाची काळी बाजू उघड केली आहे. बंगाली इंडस्ट्रीमध्येही हेमा समितीमार्फत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. आपल्या पोस्टद्वारे अभिनेत्रीने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे बंगाली इंडस्ट्रीमध्ये हेमा कमिटीप्रमाणे समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.
 
लज्जास्पद
खरं म्हणजे सुमारे पाच वर्षांनी हा अहवाल जारी करणे धक्कादायक आणि लज्जास्पद आहे. कोलकाता घटनेबाबत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारची वृत्ती जशी शंकास्पद आहे, त्याचप्रमाणे केरळच्या पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारवरही न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालावर पाच वर्षे निष्क्रिय असल्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लैंगिक छळाच्या रॅकेटचा पर्दाफाश करणारा अहवाल सार्वजनिक करताना सरकारचे हात पाच वर्षे का बांधलेले होते?
 
दरम्यान, अशा काही अभिनेत्री देखील असतील ज्यांनी कंटाळून आत्महत्येचा मार्ग शोधला असावा. न्याय न मिळण्याच्या आणि करिअर गमावण्याच्या भीतीमुळे अनेक अभिनेत्रींनी गप्प राहणेच योग्य मानले असेल. कारण महिला कलाकारांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची उघड मागणी होत असताना नकार दिल्यावर कित्येकांना काढून टाकण्यात आले असेल, कित्येकांचे करिअर बरबाद झाले असेल तर काही डिप्रेशनला बळी पडल्या असतील.
 
राज्याची प्रतिष्ठा डगाळली
केरळ हे देशातील एक राज्य आहे ज्याचे साक्षरता आणि इतर मापदंडांमध्ये पुढे राहिल्याबद्दल देशभरात कौतुक केले जाते. पण या अहवालातून समोर आलेल्या सत्याने या राज्याची प्रतिष्ठा डागाळली आहे. त्याचप्रकारे ही समस्या फक्त इथेच नाही आणि अशा बातम्या वेळोवेळी देशातील इतर फिल्म इंडस्ट्रीमधून येत असतात. याचे एक प्रमुख कारण सिनेविश्व अजूनही पुरुषप्रधान मानसिकतेने ग्रासलेले दिसते. मात्र कोणत्या ही राज्यात अशा घटना घडल्यावर विरोधी पक्षातील लोक अशा प्रकरणांचा गाजावाजा करून राजकीय मतलबाच्या पोळ्या भाजतात मात्र जेव्हा प्रकरण सिनेसृष्टीतील असेल तर सर्व गप्प बसून राहतात. जिथे राजकारण होऊ शकतं नाही, फायदा मिळू शकत नाही तिथे मात्र सर्वांची जीभ जड होते.
 
देवीला पूजल्या जाणार्‍या देशात अशा दुहेरी समजामुळे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा पोटापाण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या स्त्रियांच्या मनातील कोमल भावना, इच्छा, आकांक्षा आजही पायाखाली तुडवल्या जातात. देवीला चुनरी-साडी नेसवूून डोके टेकणार्‍या कथित भाविकांचे स्त्रियांची अब्रू लुटताना हात कसे थरथरत नाहीत?
 
एक आणखी जबाबदारी जी प्रत्येक कुटुंबाने उचलावी ती म्हणजे मुलींना बाहेर पडताना शेकडो सूचना देताना ''स्त्रीचा सन्मान कसा करावा'' ही एक सूचना जरी मुलांना देत त्यांना घडवले तर तोंड लपवण्याची पाळी येणार नाही.
 
तर, या सर्वांतून एक हे देखील लक्षात येते की कोणत्याही प्रकरणावर सरकारने पुढाकार घेतल्यास त्याचे दूरगामी परिणाम मिळू शकतात. अशा प्रकरणांवर राजकारण न करता लवकरात लवकर न्याय मिळवून दिला आणि गुन्हेगारांना जरब बसेल अशा शिक्षेची तरतुद असलेला कडक कायदा केल्यास संपूर्ण देशात याचा परिणाम दिसून येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती