शून्य ते शिखरापर्यंत प्रवास करणारे श्री गजानन जोशी : विलक्षण जीवनशिल्प

बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (14:53 IST)
स्वप्नं पाहणे सोपे पण ते साकार करण्यासाठी अंगी पुरुषार्थ, दृढ संकल्प, धैर्य आणि धाडस याची गरज असते. तसेच जुन्या पिढीतील अशी काही विलक्षण माणसे आहेत ज्यांनी आपल्या गरजा मर्यादित ठेवून एखाद्या कार्याचा ध्यास घेऊन प्रयत्नांचे पर्वत उभे केले आणि याचे जिवंत उदाहरण म्हणजे मध्यप्रदेशातील इंदूरचे आजचे सफल उद्योजक, 94 वर्षांचे ''श्री गजानन जोशी''.
 
सरळ सौम्य वयक्त्मिवाचे धनी गजानन जोशी यांनी सातत्याने, प्रयोगशीलतेने आणि ईमानदारीने जी उंची गाठली ती अतुलनीय आहे. शेकडो कुटुंबाचे पोषण व मार्गदर्शन करणार्‍या ''अप्पा'' यांची कंपनी Vishalfab आज 15 पेक्षा जास्त देशात कॉपर पार्ट्स निर्यात करत आहे.
 
त्यांचा 22 ऑगस्ट 1930 रोजी जळगाव येथे जन्म झाला. 1951 मध्ये कुटुंबासह इंदूरला आल्यावर अप्पांनी सरकारी नोकरी धरली. मात्र 1956 मध्ये म.प्र. स्थापना काळात इंदूरची अँटीकरप्शन डिपार्टमेंट ब्रांच अहमदाबादला हलवण्यात आली. त्यावेळी त्यांच्या पत्नी विवाहानंतर लगेचच शिक्षिका म्हणून काम करत होत्या. या प्रवासात पत्नीकडून आर्थिक पाठबळ आणि मुलांचे संगोपन याने अप्पांना नवीन ऊर्जा दिली आणि ते इंदूला परत आले. 2 लहान बहिणींची लग्न आणि 2 लहान भाऊ आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाल्यानंतर अप्पांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
 
सुरुवातीला मीठ आणि शिकेकाईचा व्यवसाय, वैज्ञानिक उपकरणे, स्टील फर्निचर सारखे विविध व्यवसाय केले. नंतर इलेक्ट्रिक पम्पसेट्सची एजेंसी घेतली आणि मग ट्रेडिंगच्या काही मर्यादा लक्षात घेऊन 1985 मध्ये भाड्याच्या जागेत कृषी उपकरणे तयार करण्यात सुरुवात केली. मात्र वसुली अनिश्चित असताना मोठे नुकसान झेलावे लागले. तेव्हा नवीन व्यवसायाच्या शोधात असताना 1994 मध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्हजसाठी पार्ट्स विकसित करण्यात आले. आणि या प्रकारे व्याच्या 64 व्या वर्षी अप्पांना अपेक्षित यश मिळू लागले आणि मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. कालांतराने अनेक बहुराष्ट्रीय ग्राहक कंपनीशी जोडले गेले.
 
व्यवसाय म्हटला की नुकसान होण्याची शक्यता किंवा भीती नाकारता येत नाही त्यातून मराठी माणूस हा नोकरीप्रिय अशी ओळख, अशात इतक्या वर्षांपूर्वी व्यवसाय करण्याचे धाडस कसे आले? यावर वेबदुनियाशी बोलताना अप्पांनी सांगितले की ''सुरुवातीला बर्‍याच ठिकाणी पार्टटाइम जॉब केल्यामूळे व्यवसायिक लोकांशी संपर्कात आल्यामुळे धंध्याशी संबंधित बरीचशी माहिती मिळत गेली. ते बघून स्वतः व्यवसाय करण्याची इच्छा तीव्र होत गेली. त्यात बायकोची साथ मिळाली आणि हिंमत केली.''
 
व्यवसायात स्वत:ला झोकल्यानंतर साहजिकपणे परिस्थिती नेहमी एकसारखी नसते अशात कोणती मूल्ये टिकवून ठेवणे आवश्यक आहे यावर अप्पांनी सांगितले की प्रामाणिकपणा, सत्यता, संयम, सतत प्रयत्न आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे.
 
अप्पांनी विविध व्यवसाय करत यशाची उंची गाठण्यासाठी अनके वर्ष तपस्या केली मात्र हल्लीची पीढी फार लवकर उत्साहित होते आणि फार लवकर खचून देखील जाते अशात स्वत:ला पुढे वाढत राहण्यासाठी जोश कसा कायम ठेवायचा? यावर ते सांगतात की नेहमी मोठे स्वप्न बघत राहा आणि प्रयत्न करणे सोडू नका. स्वतः वर विश्वास कायम ठेवणे गरजेचे आहे कारण यश आणि अपयश हे जीवनात येणारच. अशात खचून न जाता प्रत्यन करत राहावे. सातत्य व प्रामाणिकपणा जपुन ठेवल्यास यश निश्चित हाती येईल. जीवनात आणि व्यवसायात यश आणि अपयश मध्ये समत्व राखणे हीच खरी परीक्षा असते. 
 
आणि मुख्य म्हणजे व्यवसायाचा खरा उद्देश केवळ वैयक्तिक संपत्ती कमावणे नसून मानव सेवा करण्याची सुवर्णसंधी असल्याचे समजावे. पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा हे फक्त माध्यम आहेत. म्हणून तरुणांनी अशी एक परंपरा उभी करावी जी इतरांसाठी एक उदाहरण बनेल आणि ज्यावर येणाऱ्या पिढ्या गर्व करतील.
 
तुम्ही मालक असला तरी तुमच्या कर्मचाऱ्यांना जबाबदारी किंवा बंधन म्हणून नाही तर मूल्यवान संपत्ती समजून वागवावे. कायदेशीर आणि नैतिकदृष्टीने योग्य निर्णय घेत जीवनाचा आनंद घ्यावा.
 
Age is just a number ही म्हण अप्पांच्या बाबतीत खरी ठरते त्यांना इतकी प्रेरणा कशी मिळते यावर त्यांनी सांगितले की ''माझी सुरुवातीपासून हीच इच्छा होती की शेवटपर्यंत कुणावरही अवलंबून नसावं आणि यासाठी शारीरिक सोबत मानसिकरीत्या देखील फिट राहणे अत्यंत आवश्यक आहे. अशात आजही रुटीनमध्ये डिसिप्लिन ठेवण्याचा नेहमी प्रयत्न असतो. शारीरिक फिटनेससाठी सकाळ उठल्यावर योग करणे, वेळेवर आहार घेणे, दररोज फॅक्ट्रीत 4 ते 5 तासांसाठी जाऊन तेथील कामाचे अपडे्टस घेणे आणि वेळेवर झोपणे सर्वकाही अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे सुरु असतं.''
 
गजानन जोशी यांचे चिरंजीव सुनील आणि अनिल हे उत्तम रीतीनं कारखान्याचं संचालन करत आहे. तसेच येणारी व्यवसाय वाढीची शक्यता बघून सुनील यांचे पुत्र सिद्धार्थ देखील USA मध्ये चांगला जॉब सोडून 2023 ला घरच्या व्यवसायात सामील झाले आहेत. अशा प्रकारे जोशी यांच्या 3 पिढ्या घरच्या व्यवसायात एकत्र काम करीत आहे.
 
इंदूरच्या सानंद न्यास संस्थेतर्फे श्री गजानन जोशी यांचा सानंद जीवन गौरव पुरस्काराने बहुमान केला जात आहे. सर्व तरुणांसाठी आणि सर्व उद्योजकांसाठी आदर्श म्हणून उभे असलेले श्री गजानन जोशी यांना शतायु लाभो व त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन सर्वांना सतत मिळत राहो हीच इच्छा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती