सूर्यापेक्षा 66 कोटी पट वस्तुमानाच कृष्णविवराचा शोध

मंगळवार, 10 मे 2016 (12:17 IST)
सूर्यापेक्षा 66 कोटी पट जास्त वस्तुमान असलेले महाकाय कृष्णविवर सापडले असून ते जवळच्याच अंडाकार दीर्घिकेच्या केंद्रस्थानी आहे, असे खगोलवैज्ञानिकांनी सांगितले. आयर्विन येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी या कृष्णविवराचे अचूक मोजमाप केले असून अटाकामा लार्ज मिलीमीटर सबमिलीमीटर अँरे या चिलीतील दुर्बिणीच्या मदतीने हे कृष्णविवर शोधण्यात आले आहे.
कृष्णविवराभोवती फिरणारी शीत रेणवीय वायूची चकती व धुळीचा वेग ठरवण्यातही यश आले आहे. हे कृष्णविवर एनजीसी 1332 या दीर्घिकेत आहे. या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 66 कोटी पट आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले. अलमा या दुर्बिणीच्या मदतीने कृष्णविवराचा शोध घेण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे कॅलिङ्खोर्निया विद्यापीठाचे अँरॉन बार्थ यांनी सांगितले. घनदाट व थंड आंतरतारकीय वायू तसेच धूळ यातून प्रकाश बाहेर पडत नाही, पण अलमा दुर्बीण ज्या तरंगलांबीचा अदमास घेऊ शकते त्या पातळीवर मात्र चमकदार असा ठिपका दिसतो. अलमा दुर्बीण एनजीसी 1332 या दीर्घिकेवर केंद्रित करण्यात आली होती. ही अंडाकार दीर्घिका पृथ्वीपासून 7.30 कोटी प्रकाशवर्षे दूर असून अंडाकार दीर्घिकांमध्ये जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे असतात. एकूण दहा अंडाकार दीर्घिकांचा विचार करता त्यात शीत रेणवीय वायू व धूळ असलेली कृष्णविवरे त्यांच्या केंद्रस्थानी आहेत. या रेणवीय वायू व धुळींकडून आलेल्या प्रकाशाची तरंगलांबी अलमा दुर्बिणीच्या मदतीने मोजता येत असल्याने या कृष्णविवराचा शोध लावणे सोपे झाले.
 
कमी ते दीर्घ तरंगलांबीच्या लहरी डॉप्लर परिणामानेही ओळखता येतात. त्यात वायूची चकती निरीक्षकाच्या दिशेने की विरुद्ध दिशेने फिरते आहे याचा विचार महत्त्वाचा असतो, त्यामुळे वायूची गती ओळखण्यास खगोल वैज्ञानिकांना मदत होते. या प्रकरणात कार्बन मोनॉक्साईड रेणूपासूनच्या रेडिओ लहरींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. कार्बन मोनॉक्साईडपासून आलेल्या लहरी या चमकदार असतात, त्यामुळे त्यांचे मापन करता आले. इतर दीर्घिकांमधील जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरांचा शोध घेणे यात शक्य आहे, असे बेंजामिन बोझिले यांनी सांगितले. 
 
‘अँस्टडॉफिजिकल जर्नल लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा