वाणीचे सामर्थ्य

NDND
संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी एकच स्वर अद्‍भूत झाला व तो म्हणजे 'ॐ'. असे प्राचीन शास्त्राचे जाणकार सांगतात. मूळ ब्राह्यी स्थिती ही इतकी निरपेक्ष, निर्गुण, निराकार आणि शुद्ध स्वरूपाची असते की त्यातले कुठलेही स्पंदन, हालचाल व त्यातून उत्पन्न होणारा स्वर हा मूळ स्थितीच्या सदंर्भात दुय्यम ठरतो, गौण ठरतो. म्हणूनच शब्द ब्रह्म, नादब्रह्म, अन्नब्रह्म या सर्वांना ब्रह्मानंद सहोदर असे संबोधले जाते.

NDND
म्हणजे यांच्या विशुद्ध आस्वादातून जो निखळ आनंद मिळतो तो जणू ब्रह्मानंद असतो. परंतु, ते शुद्ध ब्रह्म नव्हे अशी पुस्तीही त्याला जोडावी लागते. भरत मुनीच्या 'वाक्य पदीयम्' या ग्रंथात 'स्फोटवादाची' प्रक्रिया सांगितलेली आहे. त्यांत चार प्रकारच्या 'वाणींचा' उल्लेख आहे.

1. परावाणी 2. पश्यान्ति वाणी 3. मध्यमा वाणी व 4. वैखरी वाणी. त्यापैकी वैखरी वाणी ही सर्वात प्रगट आणि स्पष्ट वाणी असून त्यात बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये संवाद साधला जाऊ शकतो. त्याहून अस्पष्ट अशी वाणी म्हणजे मध्यमा वाणी असून त्यात अप्रगट स्वरूपात वक्त्याची वाणी स्थिर असते.

उदा. एखाद्या चर्चेत जर आपण सहभागी झालो असलो तर चर्चेच्या दरम्यान एखादा मुद्दा मांडावा अशी उर्मी आपल्या ठिकाणी निर्माण होते. त्यानुसार शब्दांची जळवाजुळव अंर्तमनात सुरू होते. परंतु, ती वैखरी वाणीत रूपांतरीत होण्यापूर्वीच आपला विचार बदलतो व आपण तो मुद्दा न सांगण्याचा निर्णय घेतो म्हणजे मध्यमेत अस्फूट स्वरूपात प्रगट झालेली परंतु वैखरीच्या स्फूट स्वरूपात न पोहोचलेली वाणी म्हणजे मध्यमा वाणी होय.

प्राचीन शास्त्राप्रमाणे मनुष्याच्या नाभी केंद्राच्या जागी पश्यन्ती वाणीचे स्थान असते. म्हणजे मध्यमेच्या अस्फूट जाणीवेच्या पलीकडे नेणिवेच्या पातळीवर जो विचार अव्यक्त स्वरूपात प्रस्फुटित होत असतो ती वाणी म्हणजे पश्यन्ती वाणी होय. एखाद्या वेळेस आपले एखादे मत आपण अतिशय प्रभावीपणे नेमक्या शब्दात व्यक्त करून टाकतो. नंतर आपलेच आपणास आश्चर्य वाटते की, असे प्रभावी शब्द आपल्या वाणीद्वारे बाहेर पडलेच कसे? म्हणजेच त्याची जाणीव ही स्पष्ट स्वरूपात आपल्या जवळ नसल्यामुळे आपल्या नेणिवेतील वाणी सामर्थ्याचे भान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही.

MH GovtMH GOVT
सर्वात शेवटच्या परंतु, कालक्रमानुसार सर्वांत आरंभी जी वाणी असते तिचे नाव 'परावाणी' असून प्राचीन शास्त्रानुसार तिचे स्थान म्हणजे आपल्या शरीरातील मूलाधार केंद्र होय. श्री संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या केवळ 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथ सिद्ध केला आणि नंतर त्यावर रसाळ वाणीने प्रवचने केली हा आपणास अद्भूत चमत्कार वाटतो. परंतु, जन्मोजन्मींच्या सत्कर्मांचे फलित म्हणून त्यांना परावाणीचे वरदान परमेश्वराने मुक्त हस्ताने दिले व त्यामुळेच त्यांच्या लेखणी आणि वाणीत अद्भूत सामर्थ्य आले.

परा, पशान्ति आणि मध्यमा या सारख्या अस्फुट आणि अव्यक्त वाणींचे महत्व तर निर्विवादपणे आहेच परंतु 'वैखरी' सारख्या स्फूट आणि व्यक्त वाणीचे महत्त्वही आपल्या दैनांदिन लोकव्यवहारांत आपणास जाणवल्यावाचून रहात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 'हरहर महादेव' आणि 'भवानी माता की जय' म्हणताच मावळ्यांचे बाहू फुरफुरत असत. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हे लोकमान्य टिळकांचे साधे शब्द नव्हते, तर त्या शब्दांना मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले होते.

महात्मा गांधींनी 1942 साली 'चले जाव' या दोन शब्दांच्या दणक्याने ब्रिटिश सत्ता हादरवून टाकली होती. थोडक्यात शब्दात केवढी प्रचंड ऊर्जा साठवलेली असते याची कित्येकदा आपणास कल्पनाही नसते. म्हणूनच शब्दांचा वापर फार सावधगिरीने करावयास हवा. शब्द दुधारी शस्त्राप्रमाणे ही काम करतात. शब्द आणि त्यांच्या साह्याने निर्माण होणारी वाणी कधी कधी इष्ट दिशेने परिणाम घडवून आणते. म्हणूनच 'बोला, परंतु शब्द जरा जपूनच वापरा' हा सावधानतेचा इशारा सर्वांनाच द्यावास वाटतो.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा