गुणकारी रानमेवा

WD
गुणकारी रानमेवा मावळ प्रांतात बहरत आहे. अस्सल जाणकार जंगलात जाऊन या रानमेव्याची चव चाखत आहेत. सर्वसाधारण रानमेवा म्हणजे करवंदे, जांभळे, आंबा, फणस, आवळा, रायआवळे ही होत. याचबरोबर दरवर्षी तोरणं, आमगुळे, आळू हा रानमेवा बहरतो. मावळ खो-यात एक म्हण आहे,‘पाडव्याला पाड आणि अखितीला गोड’.

गुढीपाडव्याला करवंदे, जांभूळ, आंबा या फळांना पाड आलेला असतो. अक्षयतृतीयेला ती फळे पूर्ण पक्व होऊन चाखावयास मिळतात. आमगुळे संपत आली आहेत तर तोरणं ही सध्या संपण्याच्या मार्गावर आहेत.परंतु फणस, आळू ही दोन फळे तयार होण्यास अजून अवकाश आहे. तसेच करवंदे, जांभळे आंबा ही फळे अत्यंत गुणकारी व चवदार असतात.

WD
तोरणं : ही फळे लहान बोरे चन्या-मन्या यांसारखी असून गोड व पिठूळ असतात. ही फळे आल्यानंतर पानगळ होते. परंतु शेंड्यांची पाने हिरवी असतात. झाडाच्या शेंड्यांना तुरा येतो. झाडाला आलेल्या तु-यावरूनच झाड ओळखता येते. ही पिकलेली फळे अत्यंत नाजूक असल्याने ती अत्यंत नाजूक असतात. ती जास्त काळ टिकत नाहीत. जास्त दाब त्यांना सहन होत नाही. झाडावरून हातात गोळा करताना त्यांचा दाब पडला तर या फळाची साल वेगळी होते.

आळू : हे झाड पेरूप्रमाणे दिसते. फळे पेरूसारखीच दिसतात. पिकलेल्या फळांचा आकार चिक्कूसारखा दिसतो. त्यांचा रंग चिक्कूप्रमाणे दिसतो. चवीला आंबट-गोड असतात. त्यात चिक्कूसारखी बी असते.

डोंगरी जांभूळ : ही जांभूळ मावळी किंवा रानजांभूळ या नावाने ओळखली जातात. याचा बहर मे महिन्याच्या दुस-या आठवड्यात येतो. ती आकाराने लहान असतात. चवीला गोड असतात. यात गर थोडा कमी असतो. याची झाडे फार उंच नसतात.

WD
रायवळ आंबा : जंगलातील जुनी व विनालागवडीचीही ही झाडे येतात. यात अनेक प्रकारचे आंबे असतात. काळा आंबा हा पिकलेला असला तरी त्याची साल ही काळपट हिरवी असते. रायवळ आंबे प्रामुख्याने आंबट-गोड असतात.

रायवळ आवळा : ही मध्यम आकाराची फळे असून ती चवीला तुरट असतात. पौड, ताम्हिणी या रस्त्याने कोकणात जाताना स्थानिक मुले फणस, आंबे, करवंदे, जांभूळ, कै-या या फळांची विक्री करताना दिसतात. तर अशा या रानमेव्याची चव आयुष्यात एकदा तरी चाखून पाहिलीच पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा