ॲरॉन जोन्स आणि अँड्रेस गौस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सह-यजमान अमेरिकेने ICC T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या सामन्यात कॅनडाचा सात गडी राखून पराभव करून विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. नवनीत धालीवाल आणि निकोलस किर्टन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कॅनडाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 194 धावा केल्या, पण प्रत्युत्तरात अमेरिकेने 17.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा करत विजयाची नोंद केली. अमेरिकेकडून ॲरॉन जोन्सने दमदार फलंदाजी करत 40 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. ॲरॉनने अँड्रिससोबत तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. अँड्रिसनेही 46 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या आणि अमेरिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमेरिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने 42 धावांवर दोन गडी गमावले. यानंतर अँड्रिस आणि ॲरॉनने मिळून डाव सांभाळला आणि दमदार फलंदाजी केली. आरोनने केवळ 22 चेंडूत अर्धशतक केले, जे अमेरिकेसाठी टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे.