महिला प्रिमियर लीगला 4 मार्च पासून सुरुवात होणार आहे. या लीगमधील पहिला सामना मुंबई आणि अहमदाबादच्या संघांमध्ये खेळवला जाईल. महिला प्रिमियर लीगचा पहिला हंगाम 23 दिवसांचा असणार आहे. पहिला सामना 4 मार्चला तर अंतिम सामना 26 मार्चला खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने महिला आयपीएलच्या शेड्युलबाबत संपूर्ण माहिती दिलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने महिला प्रिमियर लीगच्या ओपनिंगचे जोरदार आयोजन केले आहे.
महिला प्रिमियर लीगमधील पहिला सामना मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जाण्यासाठी बीसीआयकडून प्रयत्न सुरू आहेत. ही लीग मुंबईच्या सीसीआय आणि डि.वाय.पाटील स्टेडियमवर आयोजित केली जाऊ शकते. वानखेडे स्टेडियमवर महिला आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार नाहीत. कारण भारतीय पुरुष संघ याच काळात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. यानंतर एप्रिल महिन्यात आयपीएलचे सामनेही वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातील. आयपीएलच्या पूर्वी मुंबई इंडियन्सचा संघही याच मैदानावर सराव करेल. (WPL)