हार्दिक पांड्या: कर्णधारपद दुरावलं, नंतर घटस्फोटही झाला, चढ-उतारानंतर आता नवी आव्हानं
शनिवार, 20 जुलै 2024 (09:19 IST)
टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना. दक्षिण आफ्रिकेविरोधात टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या शेवटची ओव्हर टाकत होता. फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरनं मोठा फटका खेळला. चेंडू सीमारेषेपलिकडे पडून षटकार होणार असं सगळ्यांनी गृहित धरलं होतं. पण सूर्यकुमार यादवनं एक अविस्मरणीय झेल घेतला आणि विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं गेलं.
हा टी20 विश्वचषक जिंकल्यावर स्वप्नपूर्तीच्या आनंदानं हार्दिक पांड्याच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
सगळीकडं जल्लोषाचं वातावरण होतं. विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबाबरोबर फोटो काढत होते, व्हीडिओ कॉलवर बोलत होते.
हार्दिक पांड्या या आनंदाच्या क्षणी प्रचंड भावनिक झाला होता. "गेले सहा महिने माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. मला माहिती होतं की, मी प्रचंड मेहनत घेतली तर चमकदार कामगिरी करून दाखवू शकतो," असं तो म्हणाला.
पण परवा 18 जुलैचा दिवस हार्दिकसाठी प्रचंड कठीण ठरावा असा होता. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला, त्यात पांड्याला उपकर्णधारपदावरून हटवलं होतं. हा एक धक्काच होता.
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमधून निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिकला कर्णधारपद मिळणार अशी चर्चा होती. कारण याआधीही हार्दिकनं टी20 मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी हाताळली होती.
पण, हार्दिकला टी20 संघाचं कर्णधारपदच काय पण उपकर्णधार पदही मिळालं नाही. एवढंच नाही तर वन डे टीममध्ये स्थानही मिळालं नाही.
त्यांनंतर संध्याकाळी हार्दिकनं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आणखी एक वाईट बातमी दिली. पत्नी नताशा स्टान्कोविचपासून विभक्त होत असल्याचं त्यानं सांगितलं.
तसं पाहता, गेल्या काही दिवसांपासून या गोष्टीची चर्चा सुरू होतीच. पण आता स्वत: हार्दिक आणि नताशा स्टान्कोविच यांनी अधिकृतपणे विभक्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
चढ-उतारांचं चक्र
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिकनं आयुष्यातील गेल्या सहा महिन्यांचा उल्लेख अनेकदा केला आहे. त्यानं हे सांगणं स्वाभाविकच होतं. कारण या सहा महिन्यात हार्दिकच्या आयुष्यात कमालीचे चढउतार आले.
तसं पाहता गेल्या दोन वर्षांपासून हार्दिक पांड्याच्या करियरमध्ये प्रचंड चढउतार आले.
आधी 2022 कडे वळूया. त्यावर्षी भारतीय क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभूत होऊन मायदेशी परतला होता.
विश्वचषकासारख्या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव झाल्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांवर प्रश्नांचा भडिमार होत होता. संघाला नेतृत्व बदलाची गरज असल्याची आणि नवीन नेतृत्वाच्या हाती संघाची धुरा देण्यावर चर्चा होत होती.
यानंतर भारतीय युवा संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली. हार्दिक देखील यासाठी सज्ज दिसला. एका पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, "हा माझा संघ आहे."
त्यानंतर असं वाटू लागलं होतं की, आता हार्दिक क्रिकेट विश्वात तळपणार आहे. हार्दिकचं करियर जोरदार टेक ऑफ घेणार. त्याच वर्षी म्हणजे 2022 च्या आयपीएलमध्ये हार्दिकनं मुंबई इंडियन्स सोडली आणि तो गुजरात टायटन्समध्ये गेला. गुजरात टायटन्सचा तो कर्णधार झाला.
महत्त्वाची बाब म्हणजे हार्दिकनं पहिल्या वर्षातच गुजरात टायटन्सला आयपीएलचा विजेता बनवलं. त्याच्या पुढील मोसमात म्हणजे 2023 मध्येही गुजरात टायटन्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला.
यानंतर आली 2023 ची विश्वचषक स्पर्धा. ही स्पर्धा भारतातच खेळली गेली.
या विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या एका सामन्यात हार्दिकला दुखापत झाली आणि दुर्दैवानं तो विश्वचषक स्पर्धेबाहेर फेकला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे विश्वचषकात सुरुवातीपासून उपांत्य सामन्यापर्यंत भारतीय संघ अपराजित होता.
मात्र, अंतिम सामन्यात चित्र पालटलं. अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
त्यानंतर 2024 च्या टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघात असणार, की नाही याची कूजबूज सुरू झाली.
मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद आणि विरोध
त्यानंतर आली 2024 ची आयपीएल स्पर्धा. पण आयपीएलचा हंगाम सुरू होण्याआधीच असं काही घडलं ज्यामुळं सर्वांनाच धक्का बसला.
इथूनच हार्दिक पांड्याच्या या कठीण 'सहा महिन्यांची' सुरुवात झाली.
मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सशी सौदा करत हार्दिकला पुन्हा संघात समाविष्ट करून घेतलं. एवढंच नाही तर त्याला संघाचा कर्णधारही केलं.
रोहित शर्मानं अनेक हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. पण त्याला हटवत हार्दिकच्या हाती संघाची धुरा देण्यात आली.
रोहितनं या निर्णयावर जाहीरपणे कधीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, रोहितची पत्नी रितिका सचदेव हिनं सोशन मीडियावर केलेल्या काही पोस्टमुळं रोहित आणि त्याचं कुटुंब, मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर नाराज असल्याचं जाणवत होतं.
पण त्याहीपेक्षा जास्त नाराज होते, मुंबई इंडियन्सचे चाहते. यानंतर सोशल मीडियावर संघाच्या फॉलोअर्सची संख्या अचानक घटली.
आयपीएल 2024 च्या संपूर्ण मोसमात मुंबईचा संघ जिथं सामने खेळायला गेला, तिथं चाहत्यांनी हार्दिक पांड्याला लक्ष्य केलं. हार्दिकची बोलण्याची स्टाईल, मैदानात क्षेत्ररक्षण लावण्याच्या पद्धतीवरही लोकांनी प्रश्न उपस्थित केले.
या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत वाईट झाली. क्रमवारीत मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात खाली होता. स्वत: हार्दिकलाही चमकदार कामगिरी करता आली नाही.
म्हणजेच कर्णधार म्हणून आणि खेळाडू म्हणूनही हार्दिकला अपयश आलं होतं. त्याचे चाहतेही त्याच्यावर नाराज होते.
कठीण काळ
त्याचवेळी एक बाब लोकांच्या लक्षात येऊ लागली. ती म्हणजे आयपीएलच्या सामन्यांत हार्दिकबरोबर नेहमी दिसणारी त्याची पत्नी नताशा या हंगामात दिसत नव्हती. त्यात चाहते हार्दिकवर टीकेचा भडिमार करत असतानाही त्याच्या पत्नीनं त्यावर प्रतिक्रिया किंवा काही पोस्ट केली नाही.
त्यानंतर वेध लागले टी20 विश्वचषकाच्या संघ निवडीचे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्याच हाती राहील, हे स्पष्ट केलं.
म्हणजेच ज्या रोहित शर्माकडून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं, तोच आता भारतीय संघाचा कर्णधार होता आणि हार्दिक पांड्या त्याच्याबरोबर उपकर्णधार म्हणून खेळणार होता.
आयपीएलमधील घडामोडींचा या दोघांमधील नात्यांवर काय परिणाम झाला असेल? दोघे आपापसातील संबंध कसे हाताळतील? संघावर या गोष्टीचा काय परिणाम होईल? या मुद्द्यांबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या.
मात्र, तसं काहीही झालं नाही. वेस्टइंडिज आणि अमेरिकेत झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ एकजुटीनं खेळला. या स्पर्धेत हार्दिकनं अष्टपैलू कामगिरी केली. त्याने फक्त धावाच काढल्या नाहीत तर 11 महत्त्वाच्या विकेटही घेतल्या.
या सर्व पार्श्वभूमीवर बार्बाडोसच्या मैदानात हार्दिकच्या आयुष्यानं वेगळंच वळण घेतलं. तो आता करियरच्या शिखरावर होता.
जे चाहते त्याच्यावर नाराज होते, तेच आता त्याला चीअर करत होते. आयपीएलच्या मोसमात ज्या वानखेडे स्टेडियमवर हार्दिकला टार्गेट करण्यात आलं होतं, विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच स्टेडिअममध्ये झालेल्या कार्यक्रमात हार्दिकच्या नावाचा जयघोष होत होता.
पण, एवढ्यावर हार्दिकच्या आयुष्यातील चढउतार थांबले नाही. पुन्हा एकदा हार्दिकच्या आयुष्यात काळे ढग दाटून आले. ती 18 जुलैच्या संध्याकाळी त्याच्या हातून भारतीय संघाचं उपकर्णधारपद तर गेलंच, त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यातही त्याच्या वाट्याला एकटेपणा आला.