सुमन कल्याणपूरांनी गायलेली गाणी जेव्हा लोकांना लता मंगेशकरांची आहेत असं वाटतं...

शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (14:59 IST)
सुमन कल्याणपूर यांना पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली त्याची एक आठवण प्रसिद्ध आहे.वर्ष होतं 1956. पुणे शहरातील डेक्कन स्टुडिओत एकदा भर दुपारी सुमन हेमाडी (सुमन कल्याणपूर यांचं पूर्वाश्रमीचं नाव) एका वडीलधारी  व्यक्तीला घेऊन आवाजाची टेस्ट द्यायला आल्या होत्या.तेव्हा एका संगीत दिग्दर्शकाला गाणं गाऊन दाखवलं, पण त्याने नापसंती दर्शवल्याने सुमनजी निराश झाल्या.
 
अशातच उन्हामुळे व निराशेने घशाला कोरडं पडली, म्हणून त्या सोबतच्या वृध्दाला घेऊन चहा प्यायला गेल्या.
त्यांचं कोकणी बोलणं ऐकून त्या चहावाल्याने ऐकलं, तोसुद्धा कोकणीच होता. एकूणच काय घडलं, हे लक्षात येताच त्याने दोघांना पुन्हा संगीतकार वसंत पवार यांच्याकडे नेलं.
 
चहावाल्याचा वसंत पवार यांच्याशी चांगला परिचय होता. सुमन कल्याणपूर यांनी यावेळी पुन्हा गाऊन दाखवलेले भावगीत वसंतरावांना आवडले.
 
नंतर विष्णुपंत चव्हाण, वामनराव कुलकर्णी व राजाभाऊ परांजपे यांच्याकडे सुमन कल्याणपूर यांची स्तुती करताना ही मुलगी म्हणजे जणू 'प्रतिलता' आहे, असं त्यांनी म्हटलं.
 
तेव्हाच सुमन कल्याणपूर यांना 'पसंत आहे मुलगी ' (1956) चित्रपटातून मराठी पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली आणि त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली.
 
सुमन कल्याणपूर यांना भारत सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे, या निमित्ताने त्यांच्याबाबत काही गोष्टी आवर्जून सांगाव्या वाटतात.
 
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1938 चा. म्हणजेच परवा दिवशी त्यांचा 85वा वाढदिवस. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांना पद्मभूषण पुरस्काराची भेटच जणू मिळाली आहे.
 
'पसंत आहे मुलगी ' मध्ये गाण्याची संधी मिळाली, त्यानंतर संगीतकार वसंत प्रभू यांच्या 'दिसतं तसं नसतं ' (1956) चित्रपटातही त्यांना संधी मिळाली. गाणं होतं, ‘मानसपूजा करते शबरी'.
 
चित्रपट संगीतात येण्यापूर्वी सुमन कल्याणपूर या पंडित नवरंग नागपूरकर, खाँसाहेब अब्दुल रेहमान खाँ तसेच संगीतकार यशवंत देव यांच्याकडे संगीत शिकत.
 
सुमन कल्याणपूर म्हटलं की त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वात जणू उतरलं असं दिसतं.
 
निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज. आणि अनेक लोकप्रिय गाणी...
 
सुमन हेमाडी हे त्यांचं  लग्नाआधीचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपूर या नावाने सर्व परिचित झाल्या.
 
मराठी भाव तसेच सिनेसंगीतात सुमन कल्याणपूर या गायिकेचे योगदान फार मोठं आहे. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित झाले.
 
त्यांनी त्या काळातील आघाडीची  म्युझिक कंपनी HMVकडे त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
 
हिंदीतील त्यांच्या वाटचालीबद्दल सांगायचं तर, वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी मोहमद शफी यांनी संगीत दिलेल्या ‘मंगु’ (1954) या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले होते.
 
गाण्याचे बोल होते "कोई पुकारे धीरे से तुझे". गंमत म्हणजे, या चित्रपटाचे संगीतकार ओ.पी.नय्यर होते.
 
पण हे एकच गाणं महम्मद शफी यांनी संगीतबद्ध केले होते.
 
याचं कारण म्हणजे या एकाच गाण्यानंतर महम्मद शफी हे या चित्रपटापासून बाजूला झाले आणि ओ. पी. नय्यर यांच्याकडे हा चित्रपट आला. पण तरीही त्यांनी सुमन कल्याणपूर यांचं गाणं चित्रपटात कायम ठेवलं.
 
पुढे सुमन कल्याणपूर यांना संधी मिळत गेली तशी त्यांनी त्या काळातील आघाडीच्या पार्श्वगायिका लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या बरोबरीचं स्थान निर्माण केलं.
 
सुमन कल्याणपूर यांच्या काही लोकप्रिय मराठी गाणी सांगायची तर त्यात विविधता दिसते.
 
‘जिथे सागरा धरणी मिळते’ असं म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, ‘घाल घाल पिंगा वार्यार माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात’, असं म्हणणारी सासुरवाशीण, ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही’ हे अंगाई गीत, ‘कशी गवळण राधा बावरली’ ही गवळण,
 
‘सांज आली दुरातुनी, क्षितिजाच्या गंधातुनी’ हे विरहगीत, ‘नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर’ हे भावगीत, ‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’, ‘देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा’ सारखी भक्तीगीते, ‘उठा उठा चिऊताई’, ‘या लाडक्या मुलांनो या’ सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता.
तर काही मराठी चित्रपट गीते सांगायची तर, माहेरच्या अंगणात येतील (सुखाचे सोबती), अरे संसार संसार (मानिनी), रसिका प्रियतमा वेड लाविलेस का? ( प्रीती विवाह), उजाड झाला बाग सखे गं उजाड झाला (माझा होशील का?), लावण्याने लाजून जावे (सुभद्राहरण), नको वाजवूस पावा (काय हो चमत्कार), आम्ही इंद्राच्या वारांगना ( सवाल माझा ऐका) अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत.
 
सुखाची सावली आणि वावटळ या मराठी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार देण्यात आला. तसंच त्यांना राज्य शासनाच्या वतीने 'लता मंगेशकर पुरस्कारा'ने गौरविण्यात आलं आहे.
 
विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही गाणी त्या काळात आकाशवाणी, ग्रामोफोन, लाऊडस्पीकर अशी मोजकीच माध्यमे असूनही लोकप्रिय झाली, याचा अर्थ ती गाणी सकस आणि दर्जेदार आहेत.
 
पण दुर्दैव असं की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी ही लता मंगेशकर यांनी गायली आहेत, असा अनेकांचा समज असतो, अशी खंत त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.
 
सुमन कल्याणपूर यांनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी दशरथ पुजारी यांच्याकडे गायली.
 
यशवंत देव यांच्या  संगीत दिग्दर्शनाखालील सुमन कल्याणपूर यांची गाणी सांगायची तर, ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही आहेत.
 
सुमन कल्याणपूर यांनी मराठी व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी आणि ओडिया भाषेतसुद्धा गाणी गायली आहेत.
 
एकूण 13 भाषांमध्ये त्यांनी 3500 गाणी गायली आहेत.
 
‘अगर तेरी जलवा नुमाई न होती, खुदा जाने तुमसे मुहब्बत न होती’(बेटी बेटे), ‘ना तुम हमे जानो ना हम, तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया’( बात एक रातकी), ‘ठहरीए होश में आऊ, तो चले जाईएगा’(मोहब्बत इसको कहते है), ‘तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैनें करनी थी’( फर्ज), ‘परबतो के पेडो पर शाम का बसेरा है’(शगून) ,’अज हु ना आये बालमा’( सांज और संवेरा), ‘तुमने पुकारा और हम चले आये’( राजकुमार), ‘मेरे मेहबुब न जा’( नूर महल), ‘नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’ (जब जब फूल खिले), ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’(ब्रह्मचारी), ‘मेरा प्यार भी तू है’ (साथी), ‘दिल एक मंदिर है’ (दिल एक मंदिर), ‘शराबी शराबी ये सावन का महिना’ (नूरमहल), ‘आपसे हमको बिछडे हुए’( विश्वास), ‘चले जा चले जा....जहां प्यार मिले’(जहाँ प्यार मिले), ‘मन गाए वो तराना’(चालाक), ‘दिल ने फिर याद किया’(दिल ने फिर याद किया), या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली होती.
 
ही गाणी आज युट्यूबवर ऐकता-पाहताना सुमन कल्याणपूर यांच्या पार्श्वगायनातील अष्टपैलुत्व, खोली, विविधता कौतुकास्पद वाटते.
 
मोनो रेकॉर्डिंगच्या काळातील अर्थात साठच्या दशकातील ही गाणी पन्नास वर्षांनंतरही आपला गोडवा आणि लोकप्रियता टिकवून आहेत.
 
विशेष गाणं सांगायचं तर, संगीतकार नौशाद यांच्या 'कातिल ' (1960) या चित्रपटातील फारुख कैसर यांनी लिहिलेलं आणि मोहम्मद रफींसोबत गायलेले 'सुनी किसीने बेकहे हमारी दास्ता, तडप के दिल ने कह दिया चुप रही जुबान' याचा खास उल्लेख करायलाच हवा.
 
लोकप्रियतेच्या या शिखरावरच असतानाच त्यांनी गायन सोडून दिलं.
 
“जिथे मन रमत नाही, जिथले व्यवहार मनाला रुचत नाहीत, तिथे उदासपण घेऊन रेंगाळण्यापेक्षा मी स्वेच्छेने पार्श्वगायन सोडलं, पण संगीताशी कधीही फारकत घेतली नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
 
कालांतराने 1994 साली कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेल्या 'अष्टविनायक' या ध्वनीफितीव्दारे काही काळ पुनरागमन केलं. पण तितकंच आणि तात्पुरतं.
 
2009 साली त्यांचे 'सुमन सुगंध' हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याच्या निमित्ताने त्या आपल्या चाहत्यांसमोर आल्या आणि यानिमित्त त्यांनी काही मुलाखतीही दिल्या. त्याच सुमारास सुमन कल्याणपूर फॅन्स क्लबही स्थापन झाले.
 
हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची वाटचाल सुरु असतानाच्या काळातच काही अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादीदींसोबत गाण्याचे सोडून दिल्याने लतादीदींची काही गाणी सुमनताईंच्या वाट्याला आली.
 
या गाण्याचं त्यांनी अक्षरशः सोनं केलेलं आहे. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या ‘चांद’ (1959) या हिंदी चित्रपटाकरीता एकत्र गायल्या होत्या.
 
शैलेन्द्र यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल आहेत, ‘कभी आज कभी कल कभी परसों ऐसी ही बीते’.
 
सुमन कल्याणपूर या यशवंत देव यांच्या शिष्य म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्या 'शुक्राची चांदणी' या चित्रपटासाठी पहिल्यांदा गायल्या. त्या गाण्याचे बोल होते, ‘प्रभू तुझ्या विश्वामध्ये,’ दुर्दैव म्हणजे, हा चित्रपट पूर्ण न झाल्याने हे गाणं रसिकापर्यंत पोहोचू शकलं नाही.
 
गायनाच्या पलिकडे त्यांनी पेन्सिल स्केचेस, प्रोट्रेटस, निसर्गचित्र रेखाटणे, फोटोफ्रेम्स रंगवणे, स्वेटर शाली विणणे, विविध प्रांतातील पाकसिध्दी करणे, प्रेस्टीज तसेच पाव बनवणे असे अनेक छंद जोपासले आहेत. दैनंदिन देवपूजा ही ते सगळ्यात महत्त्वाची मानतात.
 
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती