खट्याळ खबऱ्या 'किसना'च्या भूमिकेत निखिल राऊत

शुक्रवार, 27 एप्रिल 2018 (12:20 IST)
सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा 'गुणी अभिनेता' अशी ओळख असणाऱ्या निखिल राऊतची प्रमुख भूमिका असणारं 'चॅलेंज' हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजतय. ज्यात निखिल 'स्वातंत्र्यवीर सावरकरांची' भूमिका करतोय त्याच्या ह्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होताना दिसतय.
 
आता तो आणखी एका भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालाय परंतू रंगभूमीवर नव्हे तर मोठय़ा पडद्यावर.
 
लवकरच निखिल एका ऐतिहासिक भूमिकेत आपल्या चाहत्यांना भेटणार आहे.‘फर्जंद’या आगामी मराठी सिनेमात निखिलने हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अनमोल सहकार्य करीत हेरगिरीचं काम अगदी बेमालूमपणे करणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या साथीदार खबऱ्याची 'किसनाची' भूमिका साकारली आहे. जो गुप्तहेर असल्यामुळे संपूर्ण चित्रपटात वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे. भूमिकेतलं वैविध्य इथेही जपत निखिलने ह्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. नुकतेच त्याने ह्या चित्रपटाचं पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे. त्यामुळे निखिलच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘फर्जंद’चं लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या नवोदित दिग्दर्शकाने केलं असून निर्मिती अनिरबान सरकार यांनी केली आहे.‘स्वामी समर्थ मुव्हीज’ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे सहनिर्माते संदिप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती