अक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठी आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांच्या नवीन सस्पेन्स 'हाकामारी’ सिनेमाची घोषणा
मंगळवार, 16 मार्च 2021 (15:27 IST)
सस्पेन्स चित्रपट नेहमीच प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि चांगला पर्याय आहे. सस्पेन्स चित्रपटांसाठी प्रेक्षक नेहमीच उत्साही असतात. शिवाय हे सिनेमे रसिकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे सुद्धा ठरतात. मात्र एखाद्या सिनेमाची कथा ही फक्त कल्पनेपुरती मर्यादित नसेल तर? मनोरंजन विश्वात असे अनेक सिनेमे आहेत जे केवळ काल्पनिक नसून सत्य घटनांवर आधारित आहेत. असाच एक सस्पेन्स सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'हाकामारी'. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर आणि या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची ही कलाकृती असणार आहे.
'हाकामारी' हा प्लॅनेट मराठीचा पहिलाच वेब चित्रपट असणार आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस करणार असून या सिनेमाच्या कथेबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही. मुळात या चित्रपटाचे नावच अतिशय वेगळे आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. 'हाकामारी हा शब्द अनेकांसाठी नवीनच असेल, मात्र सिनेमा आल्यानंतर सर्वांनाच या शब्दाचा अर्थ उमगणार आहे.
फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी २०१३ मध्ये टाईम प्लिज या धमाकेदार सिनेमाने त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत धुराळा, आनंदी गोपाळ, डबलसीट, वायझेड, मला काहीच प्रॉब्लेम नाही आदी यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. यातील अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर वाहवा मिळवली आहे.
लवस्टोरी सिनेमांमध्ये समीर यांचा हातखंडा आहे. तरीही या सिनेमाच्या निमित्ताने समीर पहिल्यांदाच एका भयपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची कथा 'दिल दिमाग और बत्ती' फेम आणि साहित्य परिषदेचे पुरस्कार प्राप्त लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिली असून त्यांनी आतापर्यंत दंशकाल, दैत्यालय, अंधारवारी, कलजुगरी आदी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
फिल्मफेअर पुरस्कार विजेती अभिनेत्री आणि सर्वांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि नृत्याने रसिकांना वेड लावत असते. नटरंग, अजिंठा, क्लासमेट्स,मितवा, हंपीपर्यंत, सिंघम रिटर्न, ग्रेट ग्रँड मस्ती अशा अनेक मराठी, हिंदी सिनेमांमधून सोनालीने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. या सिनेमाच्या निमित्ताने सोनाली भाऊ अतुल कुलकर्णीसोबत 'द फॅलेरर्स' या बॅनरच्या अंतर्गत निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. या नव्या भूमिकेबद्दल सांगताना सोनाली म्हणते, " मी एक अभिनेत्री होण्याआधी एक निर्माताच होते. रेडिओ, टीव्ही आणि फिल्म प्रॉडक्शनची विद्यार्थिनी असताना मला निर्मिती क्षेत्राने भुरळ घातली. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटला वाव आहे. या सिनेमातून आम्ही एक वेगळा पठडीबाहेरील सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. समीर विध्वंस सारखा दूरदृष्टी असणारा दिग्दर्शक, प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर ही टीम एकत्र येत एक सुंदर कलाकृती रसिकांसाठी घेऊन येणार आहे."
तर प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, " 'हाकामारी' हा अतिशय वेगळा सस्पेन्स सिनेमा असणार आहे. या चित्रपटाची कथा लोककथा, गूढता, प्रेम आणि भयपट आदी सर्व विषयांना धरून पुढे जाणारी आहे. हा सिनेमा प्लॅनेट मराठीचा पहिला वेब सिनेमा आहे. या सिनेमामुळे आम्ही एका मोठ्या आणि वेगवान जगात जाणार आहोत, याचा आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे. 'द फॅलेरर्स' , ए थ्री मीडिया अँड इव्हेंट्स आणि समीर विध्वंस आदी मिळून प्रेक्षकांचे नक्कीच या सिनेमातून जोरदार मनोरंजन करू हे नक्की."
अक्षय बर्दापूरकर, सोनाली कुलकर्णी आणि समीर विध्वंस यांनी केलेल्या या सिनेमाच्या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण होणार हे नक्की.