शिवसेनेने युती न करता स्वतःची ताकद ओळखावी

बुधवार, 31 जुलै 2019 (10:16 IST)
आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकीचं वातावरण तयार झालेलं आहे. भारतात सुमारे मिनिटाला ३४ मुलं जन्माला येतात पण भाजपात मात्र मिनिटाला ३५ माणसं जातात असं म्हटलं तरी सध्याचं राजकारण पाहता ही अतिशयोक्ती ठरणार नाही. जशी इनकमिंग भाजपात सुरु आहे तशी शिवसेनेरही सुरु आहे. पण भाजपात मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेत स्वतःच्या निष्ठवंतांना डावलून इतरांना संधी मिळेल अशा प्रकारे तरी इनकमिंग सुरु नाहीये. त्यामुळे शिवसेनेला भविष्यात पुष्कळ संधी मिळणार आहे. भाजपामध्ये चाललेली इनकमिंग पाहता मला आश्चर्य वाटत नाही. कारण सध्या भाजपाला अच्छे दिन आलेत. जसे पूर्वी कॉंग्रेसला होते. तेव्हा कॉंग्रेसमध्ये अशी इनकमिंग चालायची. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष तर इनकमिंगवरच उभारलाय असं म्हणायला काय हरकत आहे का? त्यामुळे भाजपामध्ये होणारी इनकमिंग आताच्या पीढीसाठी नवीन असली तरी हा राजकारणाचा एक भाग आहे. पण अशा इनकमिंगमुळे निष्ठावंत मात्र दुखावले जातात. जे भाजपामध्ये सध्या होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या धामधुमीत मी काही ज्येष्ठ व जुन्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांच्याकडनं मला कळलं की त्यांना डावलून इनकमिंगवाल्यांना तिकीट देण्यात आली होती. ते कार्यकर्ते भाजपाच्या स्थापनेआधीपासून कार्यरत होते. म्हणजे जनसंघ असल्यापासून. त्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं होतं. असं अनेक पक्षात घडतं. पण जो पक्ष नव्याने उभा राहत असतो व ज्याचा बोलबाला होत असतो त्या पक्षात सर्र्स घडतं. भाजपाला सध्या असेच दिवस आले आहेत. मी केवळ महाराष्ट्रापुरतं बोलत आहे हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे.
 
ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. आज देशासकट महाराष्ट्रातही भाजपाचा बोलबाला आहे. किंबहुना पाच दहा वर्षे तरी तो राहणारच आहे. पण एक राजकीय पक्ष म्हणून पाच दहा वर्षांपुरतं न पाहता पुढील १०० वर्षांपर्यंतचा काळ आपल्या डोळ्यांसमोर उभा राहिला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येणार आहे आणि कॉंग्रेसचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. राष्ट्रवादी हा पक्ष केवळ पवारांमुळे उभा आहे. पवारांनी जर राजकारणातून माघार घेतली तर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे हा पक्ष कोसळेत, त्याचे अनेक भाग पडतील. मुख्य भाग तर अजितदादा आणि सुप्रियाताई असे पडणार आहे. कॉंग्रेसला तारणहार मिळयला अजून दहा वर्षे जातील. मनसे हा पक्ष राज ठाकरेंच्या मुडवर अवलंबून आहे. पण त्यांनी जर नरेंद्र मोदींना दूषणे देण्यात धन्यता मानली तर त्यांनाही कुणी विचारणार नाही. अशा परिस्थितीत भाजपा मोठा होतोच आहे. परंतु शिवसेनेलाही मोठं होण्याची संधी आहे. एक शिवसेनेने सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नरेंद्र मोदींना विरोध करुन किंवा त्यांना दूषणे देऊन हाती काहीच लागणार नाही. किंबहुना नरेंद्र मोदींना विरोध करुन आजपर्यंत कुणालाच फायदा झालेला नाही. उलट मोदींच्या विरोधकांचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे किंवा धोक्यात आलेलं आहे. एक लेखक म्हणून आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मी वावरतो म्हणून मला वाटतं की लोकांच्या मनात मोदींविषयी प्रचंड आदर आहे. त्यामुळे मोदींना पराभूत करण्याची स्वप्नं शिवसेनेने पाहू नये असं मला वाटतं. कारण यामुळे कॊणताच लाभ होणार नाही. मोदिंना विरोध केल्याचा परिणाम गेल्या विधानसभेत पाहायला मिळाला आहे. शिवसेनेने हे लक्षात ठेवायला पाहिजे की लोकांना कॉंग्रेस नकोय. त्यामुळे मोदी त्यांना हवे आहेत. मग जर शिवसेनेने मोदी विरोध केला तर लोक कन्फ्युज्ड होतात आणि मोदी विरोधक त्यांना कॉंग्रेसपेक्षा वेगळे भासत नाहीत. त्यामुळे शिवसेनेने दुसरी रणनिती अवलंबिली पाहिजे असं मी विषेषतः म्हणेन. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातातून निसटत चाललेला गड जिंकणे. जी रणनिती भाजपाने सुरु ठेवलेली आहे. भाजपाने शिवसेने समोर अटी दाखवताना आम्हाला युती करायचीच आहे असा पवित्रा घेतला. इतक्या वर्षात भाजपाने शिवसेनेवर विशेष तोडसुख घेतलं नाही. त्यामुळे जनतेच्या नजरेत भाजपा उजवी ठरली. त्या उलट शिवसेना मात्र भाजपा विरोधात खूप आक्रमक राहिली. पण या आक्रमकतेचा हवा तसा फायदा सेनेला झालेला नाही. उलट इतकी वर्षे मोठा भाऊ असलेला शिवसेना हा पक्ष लहान भाऊ झाला. म्हणून शिवसेने आपली ताकद ओळखली पाहिजे असं मी म्हणेन...
२०१४ च्या निवडणूकीत शिवसेन २८२ जागांवर लढली होती आणि त्यांना ६३ जागा जिंकता आल्या. तसंच भाजपा २६० म्हणजे सेनेपेक्षा २२ जागा कमी लढूनही त्यांनी १२२ जागा जिंकल्या. दोघांच्या वोट शेरिंगमध्ये सुद्धा मोठा फरक होता. भजपाला २७.८% वोट्स मिळाले तर सेनेला १९.३% मिळाले. तर भाजपाला १४,७०९,४५५ वोट्स मिळाले तसेच सेनेला १०,२३५,९७२ वोट्स मिळाले होते. पण हा तत्कालीन राजकीय रणनितीमुळे बसलेला फटका होता. दुसरीकडे कॉंग्रेसने २८७ जागा लढवून ४२ जागा जिंकल्या आणि राष्ट्रवादीने २७८ जागा लढवून ४१ जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेसला सरासरी १८% म्हणजेच ९,४९६,१४४ वोट्स मिळाले तर राष्ट्रवादीला १७% म्हणजे ९,१२२,२९९ वोट्स मिळाले होते. म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांच्या सरासरी वोट्समध्ये जास्त फरक दिसून येत नाही. मला वाटतं जर यावेळी शिवसेनेने युती न करता स्वतःची ताकद दाखवून द्यायला हवी. पण ताकद दाखवताना आपण भाजपा अर्थात फडणविस किंवा मोदींचे विरोधक आहोत असं दाखवण्याची काडचीही गरज नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण फडणविस ह्यांच्याभोवती सध्या एक सकारात्मक वलय निर्माण झालेले आहे. मराठा आरक्षणामुळे सध्या त्यांना कुणी पराभूत करु शकणार नाहीत. पण शिवसेना आपल्या पक्षची ताकद मात्र वाढवू शकते. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की शिवसेने भाजपाला विरोध न करता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी गड जिंकावा... म्हणजेच कॉंग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादी ४१ अशा एकूण ८३ जागांवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आपल्या आधीच्या ६३ जागा राखून या ८३ पैकी किती जागा जिंकता येतील याकडे शिवसेनेने लक्ष दिलं पाहिजे. निवडणूकीनंतर हवं तर भाजपाशी युती करुन सत्ता स्थापन करावी. भाजपा जर स्वतंत्र लढली तर १५० + जागा जिंकू शकतील असा माझा अंदाज आहे. अर्थात मॅजिक फिगर १४५ आहे. म्हणजे एकतर्फी बहुमत. पण शिवसेनेला १०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याची संधी आहे. जर समजा भाजप १३५ पर्यंत येऊन थांबली आणि शिवसेनेला १०५ पर्यंत जागा मिळाल्या तर शिवसेनेकडे तीन पर्याय उरतील लवकर हालचाली करुन सत्ता स्थापन करायची किंवा भाजपाच्या सत्तेत सहभागी व्हायचे किंवा मुख्य विरोधी पक्ष बनून पाच वर्षे भाजपाला नामोरहम करायचं... जर सेनेने विरोधी पक्ष म्हणून भाजपाचा विरोध केला तर जनता पूर्वीप्रमाणे कन्फ्युज्ड होणार नाही आनी कदाचित पाच किंवा दहा वर्षांनंतर शिवसेनेची स्वतःची सत्ता असू शकते... म्हणजे शिवसेना हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष होऊ शकतो आणि त्यांना बाळसाहेबांचं स्वप्नंही पूर्ण करता येऊ शकेल. त्यामुळे शिवसेनेने युती न करता स्वतःची ताकद ओळखावी आणि आपली ताकद दाखवावी... 
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती