कौटुंबिक मालिकांचा सध्या विविध वाहिन्यांवर रतीब घातला जात आहे. अतिरंजीतपणे नाती दाखवताना अक्षरशः उबग येतो. पण या मालिकांच्या गर्दीत इ टिव्हीवरील एक मालिका लक्षवेधी ठरेल असे दिसते. ‘सोनियाचा उंबरा,’ रंग माझा वेगळा सारख्या दर्जेदार मालिका देणार्या प्रो व्हीडीयो या कंपनीतर्फे मंथन ही नवी मालिका ७ जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्रौ ९.३० वाजता ई टीव्हीवरून प्रसारित होणार आहे.
‘मंथन’ ही मालिका स्त्रीप्रधान असली तरी यात पुरूषप्रधान समाजातील वास्तवावर बोट ठेवते. ‘मंथन’ ही कथा आहे मुख्यतः सुमतीची. सुमती एक साधारण मध्यमवयीन गृहिणी आहे. नोकरी करून आपल्या मुलांना आणि नवर्यालाही सांभाळणारी. सुमतीचा पती खोटया अहंकारापायी नोकरी सोडतो आणि सुमतीच्या जीवावर चैन करतो. अशा परिस्थितीत त्याला दारू आणि जुगाराचे व्यसन लागणे साहजिकच आहे. आपली पत्नी ही आपल्या मालकीची वस्तू आहे व आपल्या फायद्यासाठी तिचा कसाही वापर करू अशी त्याची मानसिकता आहे.
PR
PR
सुमतीची आई यशोदा आपल्या मुलीसोबत अर्थात सुमतीबरोबर रहाते. तिची दुसरी मुलगी नंदिनीने तिच्या मनाविरूध्द विवाह केला आहे. तो सल तिच्या मनात आहे. त्यात तिचा मोठा जावई कृष्णा व्यसनी व जुगारी. त्यामुळे तिला कुठूनही सुख नसते. यातली तिसरी महत्त्वाची व्यक्तीरेखा श्रुती. ही सुमतीची मुलगी. चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे. तिच्या लग्नाची सुमतीला आणि यशोदाला काळजी आहे. सुमतीचा मोठा मुलगा सुरेश आपल्या बायकोला स्वातीला घेऊन वेगळा रहातो. त्याची अपेक्षा आईने त्याला नवं घर घेण्यासाठी पैशांची मदत करावी. अशा विविध स्वभावाच्या व्यक्तीरेखांनी ही मालिका सुरू होते व सुमतीची संसार, मुलं आणि नवर्याला सांभाळताना होणारी परवड आणि ससेहोलपट दाखवते.
PR
PR
प्रो व्हिडीओच्या बॅनरखाली निर्माण झालेल्या या मालिकेची निर्मिती वेणूगोपाल के. ठक्कर यांची आहे. गौतम कोळी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. लेखन उमा कुलकर्णी यांचे असून गीतरचना मंगेश कुलकर्णी व संगीत अशोक पत्की यांचे आहे. छायाचित्रण नरेश देसाई यांचे आहे. यात शुभांगी गोखले, सुहिता थत्ते, शरद पोंक्षे, कुलदीप पवार, राजेष देशपांडे, केतकी थत्ते, राधिका हर्षे, आनंद अभ्यंकर, श्रुजा प्रभुदेसाई, मेघना वैद्य, शाल्मली कुलकर्णी, शंतनू रोडे यांच्या प्रमूख भूमिका आहेत.
प्रो व्हिडीओ गेली ३० वर्षे या क्षेत्रात आहे. ‘अमरावती की कथायें', ‘जरा याद करो कुर्बानी', ‘गंगापूर का गंगाराम', ‘कहानी नही जीवन है' या हिंदी व ‘वसुधा', ‘रंग माझा वेगळा', ‘सोनियाचा उंबरा' या त्यांच्या मराठी मालिका चांगल्याच गाजल्या.