पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी सर्वस्तरातून प्रबोधन केले जात असले तरी पाण्याबाबत आपण म्हणावे तेवढे जागृत नाही. एकीकडे दुष्काळात ग्रामीण भाग होरपळत असताना शहरात मोठा खर्च करून पुरविल्या जाण्या-या पाण्याचा अपव्यय होतो आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न इतका गंभीर बनेल की, प्रसंगी पाण्यासाठी युध्दे होतील असे मत जलतज्ञांकडून व्यक्त करण्यात येते आहे. म्हणूनच अनेक माध्यमांतून पाण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न सुरू असताना चित्रपटाच्या माध्यमातून याच विषयावर प्रबोधन करण्यासाठी किसान पिक्चर्सने 'तहान' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न निर्मिते भिमसेन धोंडे आणि दिग्दर्शक दासबाबू यांनी केला आहे.
'तहान' हा चित्रपट सामाजीक बांधीलकी जोपासणारा असून एक राजकीय फॅटसी आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, शेतक-यांच्या आत्महत्या, सत्ताधारी तसेच विरोधकांच्या एकमेकांच्या वाटमारीत सामान्यांच्या प्रश्नाकडे होत असलेले दुर्लक्ष, बोथट झालेल्या संवेदना यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने हे प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहेत. टंचाईग्रस्त महाराष्ट्र पाण्याच्या बाबतीत सधन व्हावा यासाठी सामान्य माणसाची एक फॅटसी मांडण्यात आली आहे.
पाणी नाही म्हणून पीक नाही, पीक नाही म्हणून पैसा नाही. अशावेळी शेतक-यांना आपला चरीतार्थ चालवणे कठीण झाले आहे. यासाठी शेतकरी सावकाराकडून कर्जे काढतो पण, कर्जे फेडणार तरी कशातून. मग कर्जांचा डोंगर वाढत जातो आणि एक दिवस त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते. त्याचा असह्यतेचा फायदा राजकारण्यांकडून घेतला जातो. एखाद्याच दु:ख कशाप्रकारे दुस-याचे सुख बनु शकते याचे सुरेख चित्रण 'तहान' या चित्रपटात केले गेले आहे. दिग्दर्शक दासबाबू यांनी 'लढा', 'श्रीमंताची लेक', 'हे बंध रेशमांचे', 'एक धागा सुखाचा', 'आई' यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शक केले आहे.
'तहान' मध्ये सदाशिव अमरापुरकर, अरूण नलावडे, कुलदीप पवार, सुनिल शेंडे, विजय चव्हाण, विक्रम गोखले यांच्याबरोबरच सुनिल बर्वे, आदिती भागवत, किशोर नांदलस्कर, सुरेखा कुडची, अश्विन एकबोटे, स्मिता ओक, किशोर प्रधान, भारती पाटील, अशोक समेळ, अभय कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे. निर्माते भिमसेन धोंडे छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सध्या कार्यरत असणा-या पत्रकारांनीच पत्रकारांची भूमिका केली आहे. जगदीश खेबुडकर, प्रा. भगवान देशमुख, इंद्रजित भालेराव यांनी गीतरचना केली असून पाच गाण्यांमध्ये लावणी व समुहगीताचा समावेश आहे. सुरेश वाडकर, वैशाली सामंत, साधना सरगम, विठ्ठल उपम व प्रशांत मोरे यांनी गीते गायली आहेत. या चित्रपटाचा लाभ घ्यावा असे आवाहन निर्माते भिमसेन धोंडे यांनी केले आहे.