ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित होत नसताना भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात शत-प्रतिशत भाजपचा दावा केल्याने भाजप ठाण्यात शिंदेसेनेबरोबर मैत्रिपूर्ण लढतीच्या मन:स्थितीत आहे का, अशी चर्चा सुरू आहे.
ठाणे आणि कल्याणचे उमेदवार अद्याप शिवसेनेकडून जाहीर झालेले नाहीत. ठाणे लोकसभा शिवसेनाच लढणार असल्याचे शिंदेसेनेकडून ठासून सांगितले जाते. परंतु, भाजपकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी दबाव वाढविला जात आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कळवा, ठाण्यातील फेसबुकवर शत- प्रतिशत भाजप अशा पोस्ट गुरुवारी करण्यात आल्या.
बुधवारी महायुतीचा संयुक्त मेळावा झाला. त्यामध्ये ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आपले उमेदवार असल्याचा राग महायुतीच्या नेत्यांनी आळवला. लागलीच दुसऱ्याच दिवशी ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी शत-प्रतिशत भाजपचा नारा दिल्याने शिंदेसेना ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडत नसेल, तर शिंदेसेनेच्या विरोधात ठाण्यात मैत्रिपूर्ण लढतीचे संकेत भाजप देत असल्याची चर्चा सुरू झाली.