डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीतील उद्धवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेतील वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने लोकसभा मतदारसंघात चांगला संदेश दिला असून त्या विजय होतील असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या सात खासदारांचे तिकीट कापले याबाबत बोलताना सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या १३ पैकी सात खासदारांची तिकीटे कापली गेली. हा नियतीचा खेळ आहे. त्यांना पश्चाताप होत असेल. तसेच उद्धव ठाकरे आणि मातोश्रीची आठवण येत असेल. २०१४ आणि २०१९ साली या सगळ्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलावले जायचे. स्वतः ठाकरे कुटुंब उपस्थित असायचे रश्मी वहिनी औक्षण करून उमेदवारांना एबी फॉर्म द्यायच्या. आता दहा तास वेटिंग करावे लागते. त्यानंतर देखील तिकीट मिळत नाही. मातोश्रीवर मिळणारा मान आणि आत्ताच त्यांचे स्थान यांची सगळ्यांना जाणीव झाली असेल. शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार असं म्हणणाऱ्यांना दुप्पट जागा देखील मिळाल्या नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी २१ उमेदवारांची घोषणा केली आहे.