पेंडीच्या खुराकातून म्हशीने गिळले मंगळसूत्र

मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (09:06 IST)
खटाव तालुक्यातील मांडवे गावाजवळ सुनील मांडवे यांची वस्ती आहे. यात सकाळी म्हशीला देण्यात आलेल्या पेंडीच्या खुराकामध्ये पाच तोळे सोन्याच्या मंगळसूत्र गिळले. सदरची गोष्ट वेळीच शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून गिळलेले मंगळसूत्र सुरक्षित बाहेर काढले.
 
रक्षाबंधनाच्या सणासाठी मांडवे यांच्या बहीण साधना पाटील या माहेरी आल्या होत्या. रात्री झोपताना चोरांच्या भितीने साधना यांनी त्यांचे पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि दीड तोळय़ांचे नेकलेस घरातील पेंडीच्या पोत्यात लपवून ठेवले होते. सकाळी सुनील यांनी नेहमीप्रमाणे प्लॅस्टिक टपामध्ये म्हशीला पेंडीचा खुराक दिला. म्हशीने पेंड खाल्यानंतर सुनील यांना टपाच्या तळाशी गंठण आढळून आले. त्यांनी घरात चौकशी केल्यानंतर साधना यांनी गंठण आणि नेकलेस पेंडीच्या पोत्यात ठेवल्याचे सांगितले. त्यावरून म्हशीने मंगळसूत्र गिळल्याचा संशय आला. त्यानंतर पशु वैद्यकीय चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. नितीन खाडे यांनी म्हैशीच्या पोटाची शस्त्रक्रिया करून सोन्याचे मनिमंगळसूत्र बाहेर काढले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती