महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केला नाही. मग राज ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभा कोणासाठी आहेत आणि या जाहीर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे, अशी मागणी भाजपा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.
राज ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. या सभांमधून राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या उमेदवारांना निवडून द्या, शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार करत आहेत. हा प्रचार प्रत्यक्षपणे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा होत आहे.