बेंगळुरू चार गड्यांनी पराभूत

WD
बंगलोरविरूद्धच्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात राजस्थानने १ चेंडू आणि ४ विकेटस् शिल्लक ठेवून रोमांचक विजय मिळवला. १७२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सलामी मिळाली नाही. सलामीवीर अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. १७ चेंडूत २१ धावांची सलामी दिल्यानंतर रहाणे २ धावा काढून रामपॉलच्या झेंडूवर बाद झाला. १७ चेंडूत २२ धावा काढणारा द्रविड हेन्रीक्सच्या चेंडूवर त्रिफळा बाद झाला. पॉवर प्लेमध्ये ४५ धावा काढणा-या राजस्थानची ४० चेंडूत २ बाद ४८ अशी स्थिती झाली. युवा यष्टिरक्षक संजू सॅम्सनने सामन्याचा रंगच बदलून टाकला. त्याने तुफान टोलेबाजी करताना ४१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ६३ धावा काढल्या. तोच सामनावीर ठरला.

सॅम्सनने तिस-या विकेटसाठी वॉटसन समवेत ६८ धावांची भर टाकली. सॅम्सनला रामपॉलने बाद केले. वॉटसन आणि हॉज यांनी आपल्या संघाचा विजय निश्चित करताना चौथ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. विजय निश्चित झाल्यानंतर वॉटसन आर.पी.सिंगच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ४१ धावा काढल्या. १८ चेंडूत १ चौकार व २ षटकारासह ३२ धावा काढून हॉज विनयकुमारच्या चेंडूवर त्रिफळा बाद झाला. विनयकुमारने अप्रतिम शेवटचे षटक टाकले. परंतु तो बंगलोरला विजय देऊ शकला नाही. राजस्थानने १९.५ षटकात ६ बाद १७३ अशी धावसंख्या काढून विजय मिळवला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला १७२ धावांचे आव्हान दिले. बंगलोरतर्फे एकालाही अर्धशतकी मजल मारता आली नाही.

अभिनव मुकुंद १९, ख्रिस गेल १६ चेंडूत ३४, कोहली ३५ चेंडूत ३२, डीव्हीलर्स १३ चेंडूत २१, हेन्रीक्स १९ चेंडूत २२ आणि विनय कुमारच्या ६ चेंडूतील २२ धावांमुळे बंगलोरने ६ बाद १७१ अशी धावसंख्या उभी केली.

राजस्थानने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. दोन्ही संघात प्रत्येकी ३ बदल करण्यात आले. बंगलोरने दिलशान, अरूण कार्तिक, सईद महंमद यांच्या जागी हेन्रीक्स, मुकुंद आणि मुरली कार्तिकला घेतले तर राजस्थानने केव्हीन कूपर, सचिन बेबी आणि दिशांत याज्ञिक यांच्या जागी, श्रीशांत, ओवीस शाह आणि यष्टिरक्षक संजू सॅम्सनला आणले.

मुकुंद आणि गेलने २४ चेंडूत ४४ धावांची सलामी दिली. गेलची महत्त्वाची विकेट वॉटसनने काढली. गेलने १६ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ३४ धावा काढल्या. सॅम्सनने झेल घेतला. धावसंख्येत २० धावांची भर पडलयानंतर मुकुंद परतला. त्रिवेदीने त्याचे दांडके उडवले. ६ षटकांच्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा निघाल्या आणि गेलची विकेट गेली. ९९ धावसंख्येवर डीव्हीलर्स गेला. श्रीशांतने त्याला बाद केले. १६ व्या षटकात कोहली बाद झाला.

३ चौकारासह ३२ धावा काढणा-या कोहलीला वॉटसनने बाद केले. ४ बाद १२३. त्यानंतर हेन्रीक्स- विनय कुमार तुफान खेळले. हेन्रीक्सने २ चौकार व एका षटकारांसह २२ धावा काढल्या. फॉकनरच्या शानदार फेकीवर तो धावबाद झाला. राजस्थानतर्फे वॉटसनने २२ धावांत ३ तर श्रीशांत व त्रिवेदीने प्रत्येकी एक बळी घेतला.

वेबदुनिया वर वाचा