आयपीएल स्पर्धा सुरू असताना सोशल मीडियाला जणू रोज एका नायकाची आणि खलनायकाची अपेक्षा असते.
एखादा फलंदाज तडाखेबंद खेळी करतो तर एखादा गोलंदाज टिच्चून गोलंदाजी करताना संस्मरणीय स्पेल टाकतो.
मग शोध घेतला जातो तो खेळाडू कुठून आला, कसा आला. त्याचा प्रवास संघर्षमय असेल तर तो शब्दांकित केला जातो.
बेताची आर्थिक परिस्थिती, घरच्यांचा पाठिंबा नाही, संसाधनं नाहीत अशा स्थितीतून आयपीएलपर्यंत वाटचाल कशी केली हे जाणून घेणं प्रेरणादायी असतं.
त्या खेळाडूचं नाव ट्रेंड होतं. हॅशटॅगही तयार होतो. लोकांच्या बोलण्यात, स्टोरीजमध्ये, रील्समध्ये त्या खेळाडूची चर्चा होऊ लागते.
मात्र त्याचवेळी सोशल मीडियाला खलनायकाचीही अपेक्षा असते. रुढार्थाने हा खलनायक चित्रपटात दाखवतात तसा नसतो. खराब कामगिरी होत असलेला खेळाडू, पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या संघाचा कर्णधार यांना खलनायक ठरवलं जातं. सगळा राग त्यांच्यावर काढला जातो.
स्वत:ला आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केलेला खेळाडू धावांसाठी झगडत असेल किंवा विकेट्ससाठी संघर्ष करत असेल तर सगळे टीकाकार त्याला मॅच का मुजरिम ठरवून मोकळे होतात.
भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हसतहसत एक गंभीर गोष्ट सांगितली होती. राहुल यांना द वॉल अशी बिरुदावली मिळाली आहे. भारतीय संघाची अभेद्य भिंत असं द्रविडचं वर्णन केलं जातं.
त्यावेळी द्रविड म्हणाले होते, प्रसारमाध्यमांना हे नाव आवडतं. ज्या दिवशी किंवा ज्या काळात माझी कामगिरी लौकिकाला साजेशी होणार नाही त्यावेळी दीवार में दिवार अशा मथळ्यासह बातमी करता येईल.
आणि असं झालंही. 2011-12 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात राहुल द्रविडला सूर गवसेना.
सूर्यग्रहण
सध्या असंच काहीसं सूर्यकुमार यादवच्या बाबतीत होतं आहे. सूर्यकुमार यादवच्या नावातील आद्याक्षरांचं मिळून त्याला स्काय असं नाव देण्यात आलं.
मैदानात चौफेर फटकेबाजी करणाऱ्या सूर्यकुमारला न्यू मिस्टर 360 असंही म्हटलं जाऊ लागलं.
पदार्पण केल्यापासून अत्यंत कमी कालावधीत सूर्यकुमारने धावांची टांकसाळ उघडली. संघाच्या विजयात योगदान दिलं.
नटराज शैलीतला पूल असो किंवा नो लूक स्कूप असो- सूर्यकुमारला रोखायचं कसं असा प्रश्न गोलंदाजांना पडू लागला.
याच सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर सूर्यकुमारने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून सूर्याच्या कामगिरीत घसरण झाली.
सलग तीन एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला.
आयपीएलच्या 16व्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यात सूर्यकुमारची कामगिरी यथातथाच झाली आहे. त्यामुळे आता सूर्यग्रहण अशा बातम्या होऊ लागल्या आहेत.
सूर्यकूमार यादवसाठी शेवटचे दोन महिने दुस्वप्नासारखे आहेत. जे घडतंय त्यावर विश्वास ठेवणं त्याच्यासाठी खूप कठीण आहे कारण त्याआधीचं वर्ष सूर्यकुमारसाठी स्वप्नवत ठरलं होतं.
1 फेब्रुवारी 2023 रोजी अहमदाबाद इथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी20 स्पर्धेत सूर्यकुमारने 24 धावांची उपयुक्त खेळी केली होती.
नशिबाने केलेली क्रूर थट्टा म्हणा किंवा नशिबाचा कटू फेरा म्हणा- त्यानंतरच्या 7 डावांमध्ये तो केवळ 24 धावा करु शकला आहे. यामध्ये 1 कसोटी, एकदिवसीय आणि 3 ट्वेन्टी-20 सामन्यांचा समावेश आहे.
सगळ्यात निराशाजनक गोष्ट म्हणजे सात डावांमध्ये 4 वेळा तो पहिल्याच चेंडूवर माघारी परतला आहे. गोल्डन डकचं शिकार होणं त्याच्या नशिबी आलं आहे.
सूर्यकुमारच्या यादवच्या चेहऱ्यावरचं तेज हरपून हैराण, निराश करणारे भाव दिसू लागले आहेत.
जागतिक क्रमवारीत अव्वल
सध्याचा त्याचा फॉर्म बघता हा फलंदाज आयसीसी ट्वेन्टी20 जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानी आहे यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.
क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणारा मोहम्मद रिझवान आणि सूर्यकुमार यांच्यात 100 गुणांचं अंतर आहे. एवढा फरक आहे कारण 2022 मध्ये सूर्यकुमारने 1164 धावा केल्या. त्याचा स्ट्राईकरेट 187.43 असा अचंबित करणारा होता. सरासरी 46.56 अशी विलक्षण होती.
गेल्या वर्षभरात सूर्यकुमारने 9 अर्धशतकांची नोंद केली. याव्यतिरिक्त दोन शतकंदेखील झळकावली. न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये शतक झळकावणं सोपं नाही.
या दौऱ्यांमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सूर्याने अद्भुत सातत्यावर आश्चर्य व्यक्त केलं नव्हतं.
हा असा काळ होता जेव्हा विराट कोहलीसारखा महान खेळाडू सूर्यकुमारची फलंदाजी पाहून म्हणाला होता, सूर्यकुमार खेळपट्टीवर राहून फटकेबाजी करतोय का व्हीडिओ गेममध्ये खेळतोय.
ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकादरम्यान सूर्याची फटकेबाजी पाहून लोक अचंबित झाले होते. प्रतिस्पर्धी गोलंदाज सूर्यकुमारसमोर निष्प्रभ वाटत होते. प्रतिस्पर्धी संघाच्या पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या प्रशिक्षकांच्या डोळ्यातील भाव समोर व्हिव्हिअन रिचर्ड्स खेळत असल्याचा भास करुन देत.
सूर्यकुमारची बॅट जेव्हा तळपत होती
विश्वचषकादरम्यान मेलबर्न इथे झिमाब्वेविरुद्ध जगभरातल्या पत्रकारांनी आपापलं काम थांबवून त्याच्या फलंदाजीचा आस्वाद घेतला होता.
कारकीर्दीत इतक्या लगेच अनेक वर्ष क्रिकेटचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांकडून असा सन्मान मिळणं दुर्मीळ समजलं जातं.
या दिमाखदार कामगिरीनंतर 2023 च्या सुरुवातीला सूर्याला त्याच्या कामगिरीचं फळही मिळालं.
राजकोट इथे सूर्यकुमारने श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी साकारली. ट्वेन्टी20 प्रकारात त्याला भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं.
एकदिवसीय संघात संजू सॅमसनऐवजी सूर्यकुमारच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतही सूर्यकुमारला खेळवण्यात आलं. मात्र त्यानंतर नशिबाचं चक्र फिरलं.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मुंबईच्या लढतीपूर्वी माझी सूर्यकुमारशी भेट झाली. सूर्यकुमारच्या चेहऱ्यावर पूर्वीचा जोश कायम होता. नेहमीच्या सौहार्दपूर्ण पद्धतीने तो माझ्याशी बोलला. त्याचा बोलण्यात निराशा वगैरे जाणवली नाही.
सूर्यकुमारच्या दिनक्रमात आणि सरावात बदल दिसलेला नाही. आधी तो आपल्या खेळाप्रती संवेदनशील आणि सजग असे, तशाच आताही वाटला.
पुन्हा चमकणार?
सूर्यकुमारच्या बॅटला झालंय तरी काय? हा प्रश्न सूर्यकुमारला थेट विचारण्यात मला संकोच वाटला. त्यामुळे मी त्याला एवढंच म्हणालो, सरावात घामाने निथळून निघालेल्या तुला पाहताना आनंद झाला.
सूर्यकुमार म्हणाला, मेहनत करणं माझ्या हातात आहे. परिणाम देवाच्या हातात आहे. मी माझ्यापरीने सर्वतोपरी मेहनत करत आहे. असं म्हणून सूर्यकुमार पुढे निघून जातो. पण दिल्लीतही तो शून्यावर बाद झाला.
सामना संपल्यानंतर सूर्यकुमार बराच वेळ दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्याशी चर्चा करताना दिसला.
योगायोग म्हणजे आयपीएल सुरू होण्यापूर्वी पॉन्टिंग यांनीच सूर्यकुमारबद्दल गौरवोद्गार काढले होते. एकदिवसीय आणि ट्वेन्टी20 प्रकारात सूर्य दमदार कामगिरी करू शकतो असं पॉन्टिंग म्हणाले होते. भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर सूर्यकुमारवर विश्वास ठेवायला हवा असं ते पुढे म्हणाले.
सर्वाधिक विश्वचषक खेळण्याचा अनुभव पॉन्टिंग यांच्याकडे आहे. सूर्यकुमारच्या खेळात सातत्याचा अभाव आहे हे त्यांना माहिती आहे. पण यासंदर्भात त्यांनी अँड्यू सायमंड्सचं उदाहरण दिलं. सायमंड्स मोठ्या लढतींमध्ये मॅचविनर म्हणून समोर येत असे अशी आठवण पॉन्टिंग यांनी सांगितलं.
जो खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18 डावांमध्ये एकदाही शून्यावर बाद झाला नाही, त्याला सलग तीन सामन्यात पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झालेलं पाहावं लागत आहे.
पण क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच घडत नाहीये. एकदिवसीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर अलेक स्टुअर्ट, अंड्यू सायमंड्स, शेन वॉटसन यासारखे मोठे खेळाडू या अनुभवातून गेले आहेत. गोल्डन डकचा अनुभवही त्यांनी घेतला आहे.
सचिन तेंडुलकर गोल्डन डकची शिकार झालेला नाही. पण 1994 मध्ये सलग तीन एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाला होता.
हे आकडे हेच सूचित करतात की खेळाडू कितीही मोठा असो, प्रत्येकाचा बॅडपॅच अर्थात वाईट कालखंड येतो. खेळ क्रूर वाटू लागतो.
चांगली गोष्ट अशी की संघाचा सूर्यकुमारवर विश्वास आहे. लेगस्पिनर पीयुष चावला यांनीही सूर्यकुमारला पाठिंबा दिला. 10 चेंडू वाट बघा. 3 चौकार लगावताच त्याचा आत्मविश्वास परत येईल असं पीयुषने सांगितलं.