चीनची ऐतिहासिक भिंत शॉर्टकटसाठी फोडली, अर्थमूव्हर लावून पाडलं भगदाड
सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (15:26 IST)
जगप्रसिद्ध चीनची भिंत कुणी अर्थमूव्हर किंवा जेसीबी लावून फोडली असं कुणी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना? पण हे खरंय.
चीनच्या शांक्सी प्रांतात काम करणाऱ्या बांधकाम मजुरांनी चीनची ग्रेट वॉल फोडली असल्याचं समोर आलंय. त्यातही त्यांनी अर्थमूव्हर लावून ही भिंत फोडली.
हे लोक आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी शॉर्टकट काढायच्या बेतात होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
दोन संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची पुढे चौकशी चालू आहे.
33-वर्षीय पुरुष आणि 55-वर्षीय महिला चीनच्या भिंतीच्या 32 व्या भागाजवळ काम करत होते. त्या भिंतीला आधीच पडलेलं भगदाड यांनी आणखी मोठं केलं म्हणजे यांचा जेसीबी तिथून जाऊ शकेल.
त्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्याचं अंतर कमी करायचं होतं असं पोलिसांचं म्हणणं आहे.
या दोन संशयितांनी चीनच्या सांस्कृतिक ठेव्याचं न दुरुस्त करता येण्यासारखं नुकसान केलेलं आहे असं पोलिसांनी म्हटलं.
योयू राज्यात मिंग राजांनी बांधलेल्या ग्रेट वॉल ऑफ चायनाचा 32 वा भाग येतो. याला 32 वी भिंत असंही म्हणतात. ही वास्तू संरक्षित वास्तू आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना 24 ऑगस्टला मिळाली. भिंतीमध्ये मोठं भगदाड पडलं असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली.
चीनच्या भिंतीला 1987 पासून युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. ख्रिस्तपूर्व 220 ते 1600 पर्यंत ही भिंत सतत बांधली जात होती. मिंग राजांन जवळपास 2000 हजार वर्षं या भिंतीचं बांधकाम सुरू ठेवलं होतं. ती पडली की पुन्हा बांधली जायची.
सोळाव्या शतकात ती जगातली सर्वात मोठी लष्करी वास्तू ठरली होती.
या भिंतीचे आता सुस्थितीत असणारे भाग 14 ते 17 व्या शतकात बांधले गेले होते. यातल्याच एका भागाला आता एक मोठं भगदाड पडलं आहे.
या भिंतीचे जे भाग सुस्थितीत आहेत त्या उत्तम बांधणी असणारे टेहळणी बुरूज दिसतात, पण या भिंतीचा बराचसा भाग आता पडलाही आहे किंवा कालौघात नष्ट झाला आहे.
बिजिंग टाईम्समध्ये 2016 साली प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार चीनच्या भिंतीचा 30 टक्के भाग पूर्णपणे नष्ट झाला आहे तर फक्त 8 टक्के भाग अजूनही सुस्थितीत आहे.
चीनचा ऐतिहासिक ठेवा असलेली भिंत कोण का फोडेल हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या भिंतीची रचना समजून घ्यावी लागेल.
ही भिंत आक्रमकांना थांबवण्यासाठी बांधण्यात आली होती. यावर जागोजागी टेहळणी बुरूज आहेत. उत्तर चीनच्या भल्यामोठ्या प्रदेशातून ही भिंत जाते. गावं, खेडी, शहरं तर कधी कधी ओसाड प्रदेशातून ही भिंत जाते.
या भिंतीचे सर्वात जुने भाग, जे हजारो वर्षांपूर्वी बांधले गेलेत ते आता जमिनीत धसलेत. आता पाहाताना ते साधे खडक वाटतात. ते चीनच्या ग्रेट वॉलचा भाग असतील असं चुकूनही वाटत नाही.
या भिंतीच्या वीटा गेली अनेक दशकं आसपासचे शेतकरी घरं बांधायला किंवा गोठे बांधायला चोरून नेत आहेत.
पण या भिंतीची पडझड थांबवण्यासाठी आता चीनच्या सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता दोन लोकांना अटक झाली आहे.
चीनच्या लोकांना या दोघांनी जे केलं त्यामुळे धक्का बसेल असं नाही, कारण हे वर्षांनुवर्षं होत आलं आहे. पण या व्यक्तींच्या कृत्यामुळे त्यांना राग नक्कीच आला असेल कारण ग्रेट वॉल फक्त चीनच नाही तर जगाच्या दृष्टीने एक महत्त्वाची वास्तू आहे.