डोनाल्ड ट्रंप यांना कैद होऊ शकते? ते पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येतील का?
मंगळवार, 4 एप्रिल 2023 (20:16 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कायदेशीर कारवाईच्या शक्यतेमुळे पुन्हा चर्चेत आहेत. पण या सगळ्याचा ट्रंप यांना तोटा होईल की फायदा? पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणानं अमेरिकेतलं राजकारणही ढवळून निघालं आहे.
जगातल्या सर्वांत शक्तीशाली महासत्तेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवरील कारवाईकडे साहजिकच सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे.
आरोप सिद्ध झाले, तर ट्रंप यांना तुरुंगात जावं लागेल का? त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते आणि शिक्षा झाली, तर ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का? जाणून घेऊयात.
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबतचं अफेअर लपवण्यासाठी तिला ट्रंप यांचे सहकारी मायकल कोहेन यांनी 2016च्या निवडणुकीआधी पैसे दिले आणि ट्रंप यांनी पुढे हिशेबात फेरफार करून ते पैसे फेडले असा दावा न्यूयॉर्कच्या सरकारी वकिलांनी केला आहे.
ट्रंप यांच्या वकिलांनी हे आरोप नाकारले आहेत. या प्रकरणी मॅनहॅटनमधील कोर्टातील ज्युरींनी ट्रंप यांच्यावर आरोप निश्चित केले म्हणजेच त्यांना इंडाइक्टमेंटला सामोरं जावं लागलं.
ते अशी नामुष्की ओढवलेले अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले. पण असे एखाद्या प्रकरणात अडचणीत येण्याची ट्रंप यांची ही पहिलीच वेळ नाही.
राष्ट्राध्यक्षपदी असताना ट्रंप यांच्यावर दोनदा महाभियोगही भरला होता म्हणजे त्यांना अमेरिकन संसदेत चौकशीला सामोरं जावं लागलं होतं.
2019-20 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियन हस्तक्षेप झाल्याच्या आरोपांमुळे आणि जानेवारी 2021 मध्ये कॅपिटॉल हिलवर ट्रंप समर्थकांच्या हल्ल्याप्रकरणी हे महाभियोग चालले. पण दोन्ही वेळा ट्रंप यांची सुटका झाली.
आता ते राष्ट्राध्यक्षपदी नसल्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या आरोपांखाली गुन्हेगारी खटले चालण्याची शक्यता आहे. सध्याचं प्रकरण त्यापैकीच एक आहे.
ट्रंप यांना तुरुंगात जावं लागेल का?
ट्रंप यांच्यावर लावलेले आरोप किती गंभीर आहेत आणि ते सिद्ध होतात का, यावरती त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते हे अवलंबून आहे.
ट्रंप यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले, तर त्यांना मोठा दंड भरावा लागण्याची शक्यता सर्वांत जास्त असल्याचं अमेरिकेतले कायदेतज्ज्ञ सांगतात.
त्यांना तुरुंगात जावं लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यांना सध्याच्या आरोपांखाली जास्तीत जास्त चार वर्षांसाठी कैद होऊ शकते.
पण त्यासाठी आधी काही गोष्टी सिद्ध व्हाव्या लागतील.
कोहेन यांच्याकरवी ट्रंप यांनीच स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचं, हे करत असताना आपण कायदा मोडत असल्याचं आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी हा फेरफार केल्याचं सिद्ध झालं तरच ट्रंप यांच्यावर कैदेची कारवाई होऊ शकते.
दुसरीकडे, ट्रंप यांनी आपल्या कुटुंबाला मनस्तापापासून वाचवण्यासाठी हे पैसे दिले होते आणि त्याचा निवडणुकीशी संबंध नव्हता, हा त्यांचा दावा त्यांच्या वकिलांना सिद्ध करावा लागेल.
तसंच या प्रकरणातून ते सुटले, तरी भविष्यात आणखी काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
6 जानेवारी 2021 रोजी ट्रंप यांनी आपल्या समर्थकांना जोमानं लढण्याचं आव्हान केल्यानंतर काही काळातच त्यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल या अमेरिकेच्या संसदभवनावर हल्ला केला होता. या प्रकरणात ट्रंप यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल की नाही, हे अजून स्पष्ट नाही.
ट्रंप यांच्या फ्लोरिडातील निवासस्थानी काही दस्तावेज सापडले होते, तेव्हा तपासात अडथळा आणण्याल्या प्रकरणी ट्रंप यांची चौकशी होऊ शकते.
तसंच 2020 च्या निवडणुकीत जो बायडन यांच्या बाजूनं गेलेला जॉर्जियातला निकाल बदलण्यासाठी ट्रंप यांनी त्या राज्याच्या सेक्रेटरींवर दबाव आणल्याचाही आरोप केला जातो आहे.
या प्रकरणांत कायदेशीर कारवाई होईल की नाही, हेही अजून स्पष्ट नाही.
पण जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की आरोप सिद्ध झाले तर ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात का? आणि या संपूर्ण प्रकरणाचा त्यांच्या इलेक्शन कँपेनवर काही परिणाम होईल का?
ट्रंप पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का?
ट्रंप यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले, तरी ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतील. कारण अमेरिकेचं संविधान एखाद्यानं निवडणुकीशी निगडीत गुन्हा केला असेल, तरी त्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीपासून किंवा हे पद स्वीकारण्यापासून रोखत नाही.
पण कायदेशीर लढाई लांबली, तर त्याचा परिणाम ट्रंप यांच्या प्रचारावर होऊ शकतो.
ट्रंप यांची आजवरची वाटचाल पाहता, एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी, म्हणजे बदनाम झालो तरी नाव तर चर्चेत आलं, अशी त्यांची भूमिका दिसून येते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा प्रचारादरम्यान फायदा मिळवण्याचा प्रयत्न ते करू शकतात. पण त्यांना कितपत यश येऊ शकतं?
आपलं नाव पुन्हा चर्चेत आणण्यात ट्रंप यांना यश आलं आहे, यात शंकाच नाही. अमेरिकेत बहुतांश टीव्ही चॅनेल्स आणि माध्यमं फ्लोरिडातल्या मार अ लेगो या ट्रंप यांच्या निवासस्थानापासून न्यूयॉर्क पर्यंतचा त्यांचा प्रवास लाईव्ह दाखवत होती.
बीबीसीच्या उत्तर अमेरिका संपादक सारा स्मिथ लिहितात की, “कोर्टात आपला वेश आणि आविर्भाव कसे असतील याविषयी ट्रंप यांनी सल्लागारांशी चर्चा केल्याच्या बातम्याही झळकल्या.
"ट्रंप यांची लोकप्रियता कशी वाढली आहे आणि त्यांच्या इलेक्शन कँपेनला मिळणाऱ्या निधीत कशी वाढ होते आहे याविषयी त्यांचे सल्लागार बोलताना दिसत आहे. त्यामुळे ट्रंप या कोर्टाच्या वारीचा वापर एखाद्या प्रचारसभेसारखा करत आहेत. ”
फ्लोरिडाचे राज्यपाल आणि रिपब्लिकन पक्षातले ट्रंप यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मानले जाणारे रॉन डिसँटिस यांनाही ट्रंप यांच्या समर्थनार्थ बोलावं लागलं.
ट्रंप यांच्यावर जाणूनबुजून असे आरोप होत असल्याचं त्यांच्या समर्थकांना वाटतंय आणि त्यामुळे एक प्रकारे रिपब्लिकन पक्षातल्या ट्रंप यांच्या गोटात नवा उत्साह संचारला आहे.
थोडक्यात, राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार निवडण्यासाठीच्या प्राथमिक निवडणुकीत म्हणजे प्रायमरीमध्ये ट्रंप यांना या कारवाईचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे, असं बहुतांश विश्लेषकांना वाटतं.
पण हीच गोष्ट 2024 साली प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात जाऊ शकते.
ट्रंप यांचे कट्टर समर्थक किंवा विरोधक यांची मतं या प्रकरणानं बदलणार नाहीत, पण जे कुठल्या एका बाजूचे नाहीत, अशा मतदारांवर मात्र परिणाम होऊ शकतो.
सारा स्मिथ सांगतात, “जॉर्जियापासून ते विस्कॉन्सिनपर्यंत मी देशभरातल्या अनेक अपक्ष मतदारांशी बोलले. त्यांना ट्रंप यांची धोरणं पटतात पण त्यांच्याभोवती सतत सुरू असलेला ड्रामा आणि गोंधळ याचा त्यांना कंटाळा आला आहे.” ट्रंप यांच्या समर्थकांचं मात्र याउलट मत असल्याचंही त्या नमूद करतात.
एक मात्र नक्की. यासगळ्यात अमेरिकन न्यायव्यवस्थेचीही कसोटी लागणार आहे. कारण ही केवळ एक कायदेशीर कारवाई आहे आणि त्यात राजकीय हस्तक्षेप नाही, हे त्यांना सिद्ध करावं लागणार आहे.