शकिरावर कोट्यवधींच्या कर चोरीचा आरोप

मंगळवार, 22 जानेवारी 2019 (12:29 IST)
पॉप संगीतकार शकिरा आपली आगळी वेगळी संगीत शैली व नृत्यासाठी ओळखली जाते. 1990 साली तिने तयार केलेले मागिया व पेलिग्रो हे पहिले दोन्ही म्युझिक अल्बम सुपर फ्लॉप ठरले. परंतु त्यानंतर 2010 साली फीफा विश्र्वचषकात गायलेल्या वाका वाका (दिस टाइम फॉर आफ्रिका) या गाण्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यानंतर मात्र तिच्या संगीत कारकिर्दीचा सुवर्णकाळ सुरु झाला. तिचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरु लागले. आणि आज पाहता पाहता संपूर्ण जगात तिने आपले चाहते निर्माण केले आहेत. परंतु आजवर केवळ गाण्यांमुळे चर्चेत राहणारी शकिरा गेल्या काही काळात तिची झळकणारी अर्धनग्र छायाचित्रे व इतर संगीतकारांवर केलेल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे ती चर्चेत राहू लागली आहे. आणि आता तर कोट्यवधी रुपयांच्या कर चोरीचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. स्पॅनिश सरकारने शकिरावर 14.5 दशलक्ष यूरो म्हणजेच 118 कोटी रुपयांच्या कर चोरीचा आरोप केला आहे. 2015 साली ती स्पेनमधील बहामास शहरात अधिकृतरीत्या स्थायिक झाली. परंतु सरकार ने केलेल्या दाव्यानुसार 2012 पासूनच ती अनधिकृतरीत्या स्पेनमध्ये राहत आहे. स्पेनमधील नियमांनुसार त्या देशात अनधिकृतरीत्या 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस विशेष कर भरावा लागतो. आणि हा कर चुकवण्याचा प्रयत्न शकिराने केला आहे. शकिराने मात्र कानांवर हात ठेवत कर चोरीचे आरोप फेटाळून लावले आहेत. याउलट स्पॅनिश कर खाते खोटे सांगत असून आपण 2015 सालीच प्रियकर गोरार्ड पीकसोबत स्पेनमध्ये वास्तव्यास आल्याचा प्रतिदावा तिने केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती