श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरुक्मिणीरमणाय नमः ॥
ऐका श्रोते हो सावकाश ॥ चरित्र अति विशेष ॥ श्रवणीं पडातां सकळ दोष ॥ उठाउठीं पळती हो ॥१॥
गडेमंडळ अति उत्तम ॥ तेथें पिपाजी राजा पवित्र परम ॥ जयाचे घरीं नित्य धर्म ॥ वस्ति करूनि राहिला ॥२॥
साधुसंत येती घरा ॥ तयांसी जातसे सामोरा ॥ ठाव देऊनि निजमंदिरा ॥ इच्छा भोजन देतसे ॥३॥
शौर्यतेजें अति प्रबळ ॥ उदार ज्ञानी धर्म शीळ ॥ धृतिदक्ष सर्वकाळ ॥ उपासक शक्तीचा ॥४॥
तयासी प्रसन्न भगवती ॥ पुत्र कांता सर्व संपत्ती ॥ भावेंकरूनियां नृपती ॥ अर्चन करी शक्तीचें ॥५॥
प्रातःकाळीं करूनि स्नान ॥ शोडशोपचारें करी पूजन ॥ वस्त्रें अलंकार संपूर्ण ॥ पुष्पें परिमळ अर्पीतसे ॥६॥
धूप दीप आणोनि सत्वर ॥ नैवेद्य दाखवी नृपवर ॥ भाव देखोनियां सादर ॥ नैवेद्य सेवी जगदंबा ॥७॥
फल तांबूल दक्षिणा ॥ भावें अर्पूनि करी प्रदक्षिणा ॥ नमस्कार घालोनि निजसदना ॥ जाय भोजना नृपवर ॥८॥
तंव कोणे एके वेळीं ॥ अवघी मिळोनि संतमंडळी ॥ तीर्थें करीत गडेमंडळीं ॥ वैष्णव आले नगरासी ॥९॥
निराश निष्काम वीतरागी ॥ अलिप्त होऊन वर्तती जगीं ॥ ऐसे वैष्णव बैरागी ॥ अवचित आले त्या ठाया ॥१०॥
अनंत जन्मीं तीर्थाटन ॥ केले असती यागयज्ञ ॥ तरीच गृहासी संतजन ॥ अकस्मात येतील ॥११॥
एकादशीव्रत नेमान ॥ केलें असेल पितृसेवन ॥ तरीच गृहाप्रति वैष्णवजन ॥ अकस्मात येतील ॥१२॥
वापी कूप आराम जाण ॥ केले असतील निर्माण ॥ तरीच तेणें पुण्येंकरून ॥ गृहास वैष्णव येतील ॥१३॥
गोप्रदान अन्नदान ॥ केलें असेल कृष्णार्पण ॥ तरीच गृहापति वैष्णवजन ॥ अकस्मात येतील ॥१४॥
अनंत जन्म तपें आगळीं ॥ केलीं असतील भूमंडळीं ॥ तरीच गृहासी संतमंडळी ॥ येईल जाण निजभाग्यें ॥१५॥
अनंत जन्मींचें ते वेळीं ॥ सुकृत फळलें तत्काळीं ॥ म्हणोनि वैष्णव भक्तमंडळी ॥ त्याचे गह्रा पातली ॥१६॥
सेवक सांगती राजयाकारण ॥ नगरासी आले वैष्णवजन ॥ रायें करूनियां सन्मान ॥ शिधा त्यांस दिधला ॥१७॥
स्नान करूनि ते वेळीं ॥ गेला अंबिकेचें देउळीं ॥ पूजा अर्चन करून सकळी ॥ नैवेद्य दाखवी नृपवर ॥१८॥
नित्य करितां शक्तिपूजा ॥ नैवेद्य भक्षी कमळजा ॥ नमस्कार घालूनि राजा ॥ आपण भोजन करीतसे ॥१९॥
तंव रायासी म्हणे भद्रकाळी ॥ नगरासी आली संतमंडळी ॥ ते जेविल्याविण कदाकाळीं ॥ नैवेद्य भक्षितां मज नये ॥२०॥
ब्रह्मांडनायक वैकुंठवासी ॥ अनंत शक्ती जयाच्या दासी ॥ त्याचे प्रिय आले घरासी ॥ तुझ्या भाग्यासी पार नाहीं ॥२१॥
राजा विनवी कर जोडून ॥ वरिष्ठदेव तुजहूनि कोण । ऐसें ऐकोनियां वचन ॥ काय बोले भवानी ॥२२॥
ब्रह्मा इंद्र आणि हर ॥ हे नेणती जयाचा पार ॥ तो क्षीराब्धिवासी कमलावर ॥ श्रेष्ठ असे सर्वांसी ॥२३॥
रविचंद्रासी दिधली दीप्ती ॥ त्याच्या तेजें ते राहाटती ॥ तो पुराणपुरुष रुक्मिणीपती ॥ श्रेष्ठ सर्वांसी असे कीं ॥२४॥
जेणें मत्स्यावतार धरून ॥ शंखासुर मारिला आपटून ॥ तो ब्रह्मांडनायक जगज्जीवन ॥ श्रेश्ठ सर्वांसी असे कीं ॥२५॥
कूर्म वराह नरसिंह वामन ॥ परशुराम अवतार धरून ॥ सुखी केले गोब्राह्मण ॥ तो मधुसूदन श्रेष्ठ पैं ॥२६॥
इंद्रादिक सकळ देव ॥ बंदी घाली दशग्रीव ॥ रामें अवतार धरूनि सर्व ॥ ते सोडविले प्रतापें ॥२७॥
राजा म्हणे विश्वजननी ॥ देवांत श्रेष्ठ शिरोमणी ॥ तो भेटवीं मजलागूनी ॥ म्हणोनि चरणीं लागला ॥२८॥
ऐसें ऐकोनि आदिमाया ॥ म्हणे संतांसी शरण जाऊनियां ॥ तयांसीं अनन्य भजतां राजा ॥ ते तुज रघुराया भेटविती ॥२९॥
ऋद्धि सिद्धि राज्य धन ॥ हें मागसी तरी मी देईन ॥ परी श्रीरामाचें दर्शन ॥ मजस्वाधीन तें नाहीं ॥३०॥
यश श्री आणि औदार्य जाण ॥ ज्ञान वैराग्य संपूर्ण ॥ षड्गुण ऐश्वर्यलक्षणें ॥ तयांचे ठायीं असती पैं ॥३१॥
तो देवाधिदेव सनातन ॥ जाहलासे भक्ताधीन ॥ ऐसे जे संत वैष्णवजन ॥ तुझ्या नगरासी पातले ॥३२॥
ऐसें बोलतां भद्रकाळी ॥ राजा उठिला ते वेळीं ॥ जेथें होती संतमंडळी ॥ तयांसमीप पातला ॥३३॥
तेथें येऊनि नृपवर ॥ तयांसी घाली नमस्कार ॥ साहित्य देऊनि सत्वर ॥ भोजन घातलें तयांसी ॥३४॥
तांबूल देऊनि अति सादर ॥ गळां घातले सुमनहार ॥ करून साष्टांग नमस्कार ॥ संतांसी विनंती करीतसे ॥३५॥
संमुख उभा राहूनी ॥ राजा विनवी कर जोडूनी ॥ म्हणे श्रीरामाचें मजलागूनी ॥ दर्शन स्वामींनीं करवावें ॥३६॥
संत म्हणती तये समयीं ॥ रामानंदासी शरण जाईं ॥ तयाचा अनुग्रह घेतां पाहीं ॥ सार्थक होईल जन्माचें ॥३७॥
क्षुद्र दैवतांची सेवा करितां ॥ आत्मज्ञान नव्हे सर्वथा ॥ आतां तरी नृपनाथा ॥ सावधानता भजनासी ॥३८॥
क्षुद्र दैवतांचें उपासना ॥ निर्बळ रायाचें करितां सेवन ॥ अज्ञानी श्रोतयांचें भाषण ॥ सौख्य नेदीचे सर्वथा ॥३९॥
प्रेमेंविण हरिकीर्तन ॥ अज्ञान गुरु शिष्य कृपण ॥ षंढ भ्रताराचे संगतीनें ॥ सौख्य नव्हेचि सर्वथा ॥४०॥
आशाबद्ध वक्ता जाण ॥ अभक्त श्रोता वादक पूर्ण ॥ अनुभवाविण ब्रह्मज्ञान ॥ सौख्य नेदी सर्वथा ॥४१॥
ज्ञानाविण संन्यासग्रहण ॥ मूर्ख पुत्र गृहस्थ निर्धन ॥ दुर्मुखी स्त्रियांचे संगतीनें ॥ सैख्य नव्हेचि सर्वथा ॥४२॥
संत म्हणती रायालागून ॥ आतां होई सावधान ॥ रामानंदस्वामीसी शरण ॥ जाई वेगें नृपवरा ॥४३॥
ऐसें ऐकोनि संतवचन ॥ अनुताप जाहला रायालागून ॥ प्रधानासी बोलावून ॥ राज्यभार तया ओपिला ॥४४॥
वस्त्रें भूषणें अलंकार ॥ काढोनि द्रव्याचें भांढार ॥ विप्रांसी बोलावूनि सत्वर ॥ लुटवी नृपवर त्यांहातीं ॥४५॥
अश्वगजरथगोदान ॥ तेंही केलें कृष्णार्पण ॥ रामानंदस्वामींसी शरण ॥ आनंदवना पातला ॥४६॥
रायाची स्त्री पतिव्रता ॥ तिनेंही त्यजोनि माया ममता ॥ विप्रस्त्रियांसी तत्त्वतां ॥ वस्त्रें भूषणें वांटिलीं ॥४७॥
रामानंदस्वामी जवळी ॥ दोघें जाऊनि ते वेळीं ॥ मस्तक ठेविला चरणकमळीं ॥ भावेंकरूनि तेधवां ॥४८॥
तन मन आणि धन ॥ केलें गुरूसी अर्पण ॥ रामानंदस्वामींसी विनीत होऊन ॥ त्याचा अनुग्रह घेतला ॥४९॥
रामकृष्णनारायण ॥ मंत्र दिधला त्यांकारण ॥ सद्गुरुमुखें श्रवण मनन ॥ अनुभवें निदिध्यासन लागलें ॥५०॥
गुरु ज्ञानी अनुतापी शिष्य ॥ तेथें आत्मज्ञानप्रकाश ॥ त्याविरहित जो का अभ्यास ॥ तो मिथ्या दांभिक जाणावा ॥५१॥
उत्तम परीस चांगला ॥ खापरासी नेऊनि लाविला ॥ तेवीं अभक्त मलिन शिष्याला ॥ सद्गुरु काय करील ॥५२॥
संत दयाळु सर्वांसी ॥ राव रंक समान त्यांसी ॥ परी जो भावना धरी जैसी ॥ तें फळ तयासी येतसे ॥५३॥
वासरमणि उगवतां पूर्ण ॥ प्रकाश सर्वांसी समान ॥ अकंर्म्यासी शिक्षा होतसे जाण ॥ पावती मान सज्ञानी ॥५४॥
चकोर आणि तस्करास ॥ चांदणें सारिखेंचि प्रकाश ॥ तस्करा देखोनि वाटती दोष ॥ पीयूष भासे चकोरां ॥५५॥
तयाच परी साधुसंत ॥ समदृष्टी अखंड वर्तत ॥ परी जो जैसी भावना धरित ॥ तैसेंच फळ देत तयासी ॥५६॥
असो आतां बहु भाषण ॥ रामानंदस्वामींचें दर्शनेंकरून ॥ रायासी जाहलें पूर्ण ज्ञान ॥ कृपादृष्टीं तयाच्या ॥५७॥
श्रवण आणि हरिकीर्तन ॥ राजा करी प्रेमेंकरून ॥ रात्रंदिवस हरिभजन ॥ राम कृष्ण गोविंद ॥५८॥
तंव कोणेएके दिवसीं ॥ राजा पुसे स्वामींसी ॥ आतां आज्ञा द्यावी मजसी ॥ द्वारावतीसी जावया ॥५९॥
वंदोनि श्रीगुरूचे चरण ॥ द्वारकेसी गेलीं दोघें जण ॥ करूनि गोमतीचें स्नान ॥ कृष्णदर्शनासी चालिले ॥६०॥
महाद्वारासी जाऊन ॥ भावें घालिती लोटांगण ॥ मग दोघेंही कर जोडून ॥ करिती स्तवन श्रीहरीचें ॥६१॥
जय जय मुकुंदा मुरारी ॥ पुराणपुरुषा श्रीहरी ॥ मज दीनावरी कृपा करीं ॥ शरण चरणासी पातलों ॥६२॥
तूं देवाधिदेव सनातन ॥ हें नेणेंच मी अज्ञान ॥ तुज नेणतां उपासन ॥ शक्तिपूजन म्यां केलें ॥६३॥
अमृत टाकोनि घेतलें धूण ॥ परीस टाकूनि घेतला पाषाण ॥ तेवीं तुज नेणतां उपासन ॥ शक्तिपूजन म्यां केलें ॥६४॥
अश्वत्थ त्यागोनियां जाण ॥ शिंदीस घातलें जीवन ॥ तेवीं तुज नेणतां उपासन ॥ शक्तिपूजन म्यां केलें ॥६५॥
उगवला नसतां वासरमणी ॥ तोंवरी खद्योततेज आगळें मानी ॥ तेवीं तुज नेणतां चक्रपाणी ॥ म्यां भवानी उपासिली ॥६६॥
वेदांत पडला नव्हता श्रवणीं ॥ तों कोकशास्त्र आगळें मानी ॥ तेवीं तुज नेणतां चक्रपाणी ॥ म्यां भवानी उपासिली ॥६७॥
कल्पतरु त्यजोनि जवळी ॥ मान्य केली जैसी बाभुळी ॥ तेवीं तुज नेणतां वनमाळी ॥ म्यां पूजिली भवानी ॥६८॥
अनंत जन्मींचें सुकृत ॥ फळा आलें सुनिश्चित ॥ म्हणोनि गृहासी साधुसंत ॥ अकस्मात पातले ॥६९॥
तुझा महिमा निरुपम ॥ त्यांनी कथिला मजलागून ॥ ऐसें म्हणोनियां लोटांगण ॥ पुन्हां मागुती घातलें ॥७०॥
ऐकोनियां करुणावचन ॥ देवें दिधलें आलिंगन ॥ पिपाजी राजासी दर्शन ॥ साक्षात जाहलें तेधवां ॥७१॥
चतुर्भुजरूप सगुण ॥ पीतांबरधारी जगज्जीवन ॥ मुकुट विराजे देदीप्यमान ॥ देव सनातन देखिला ॥७२॥
कीर्तन करूनि महाद्वारीं ॥ नाचे नामाचिये गजरीं ॥ चातुर्मास द्वारकापुरीं ॥ गजर करी नामाचा ॥७३॥
आज्ञा मागोनि वैकुंठनाथा ॥ परतोनि चालिलीं उभयतां ॥ तों पुढें अरण्यांत चालतां ॥ महाव्याघ्र देखिला ॥७४॥
महाभयानक पंचानन ॥ पुढें आला करीत गर्जन ॥ राजकांता तयासी देखोन ॥ भय मानसीं पावली ॥७५॥
परम सुकुमार लावण्यखाणी ॥ मागें पाहे परतोनी ॥ भ्रतारासी म्हणे ते क्षणीं ॥ व्याघ्र नयनीं देखिला ॥७६॥
थरथरां कांपे राजबाळा ॥ तंव पंचानन जवळी आला ॥ पिपाजी राजा म्हणे तिजला ॥ भिऊं नको सर्वथा ॥७७॥
तुजला दिसतो पंचानन ॥ परी त्यांत आहे श्रीरघुनंदन ॥ रितें स्थळ त्यावांचून ॥ अणुमात्र दिसेना ॥७८॥
सर्वां घटीं समान अर्क ॥ कां सकळ रसांमाजी जैसें उदक ॥ तैसाचि हा यदुनायक ॥ सर्वां घटीं सारिखा ॥७९॥
धटीं मठीं सम जैसें ॥ बिंबलें दिसे आकाश ॥ तैसाचि व्यापक जगदीश ॥ सर्वां घटीं सारिखा ॥८०॥
शलभ आणि खगपतीसी ॥ आकाश सारिखेंच दोघांसी ॥ तैसाचि तो हृषीकेशी ॥ भूतमात्रासी सारिखा ॥८१॥
पट तंतूहोनि नव्हती ॥ कीं सुवर्णासीच अलंकार म्हणती ॥ तेवीं विश्वंभर नेणोनि भूतीं ॥ विश्व म्हणती अज्ञान ॥८२॥
अनंत ब्रह्मांडें भरून ॥ उरला असे जगज्जीवन ॥ व्याघ्र नव्हे तो रुक्मिणीरमण ॥ निश्चयेंसीं जाणावा ॥८३॥
जळीं स्थळीं पाषाणी ॥ भरूनि उरला चक्रपाणी ॥ रिता ठाव त्यावांचूनी ॥ अणुमात्रही असेना ॥८४॥
ऐसें पिपाजी राजा बोलिला ॥ तटस्थ जाहली राजबाळा ॥ तों व्याघ्र येऊनि ते वेळां ॥ उभा ठाकला सन्निध ॥८५॥
पिपाजी म्हणे व्याघ्रासी ॥ राम भजें तूं अहर्निशीं ॥ व्याघ्र लागला चरणासी ॥ निजभावेंसीं ते वेळां ॥८६॥
संतदर्शन होतांचि जाण ॥ तयासी जाहलें दिव्य ज्ञान ॥ पिपाजी बोले तयालागून ॥ हिंसाकर्म न करावें ॥८७॥
तुळसीमाळा काढोनि त्वरित ॥ घातली व्याघ्राच्या गळांत ॥ रामकृष्ण हा मंत्र ॥ त्याकारणें दीधला ॥८८॥
रामकृष्ण नारायण ॥ याहूनि विशेष मंत्र कोण ॥ गजेंद्र पशु जो अज्ञान ॥ रामभजनें तरला तो ॥८९॥
वाटपाड्या वाल्हा कोळी ॥ नारदें उपदेशिला तत्काळीं ॥ जपतां रामनामावळी ॥ वाल्मीकि ऋषि तो जाहला ॥९०॥
अजामिळ पातकी ब्राह्मण ॥ दुरितें वेष्टिला संपूर्ण ॥ मुखें म्हणतां नारायण ॥ वैकुंठभुवन पावला ॥९१॥
कामक्रोध मद मत्सर ॥ दंभ मोह अहंकार ॥ राम राम जपतां निरंतर ॥ उठाउठीं पळती हो ॥९२॥
मग व्याघ्रें हात जोडोन ॥ पिपाजीसी केलें साष्टांग नमन ॥ म्हणे आपुले कृपेंकरून ॥ श्रीरामभजनीं लागलों ॥९३॥
पूर्वीं माझे अपराध जाहले बहुत ॥ श्रीरामनामीं जाहलों पुनीत ॥ पुन्हां साष्टांगेंसीं नमीत ॥ पिपाजीतें तेधवां ॥९४॥
ऐसा मंत्रशिरोमणी ॥ व्याघ्रासी सांगोनि तेच क्षणीं ॥ पिपाजी गेला तेथूनी ॥ आनंदवनीं सत्वर ॥९५॥
व्याघ्रासी अनुताप जाहला पूर्ण ॥ हिंसाकर्म टाकिलें तेणें ॥ वर्जिलें मांसादि भक्षण ॥ गलित पर्ण खातसे ॥९६॥
सप्त दिवसपर्यंत ॥ हिंडत असतां अरण्यांत ॥ हरिभजनीं धरूनि हेत ॥ देह ठेविला तयानें ॥९७॥
व्याघ्र वृश्चिक सिंह श्वान ॥ सर्प ससाणा गज दारुण ॥ सर्व योनींत तामस गुण ॥ सात्त्विक लक्षण यां नाहीं ॥९८॥
संतसंगाचें महिमान ॥ पंचाननासी जाहलें दिव्य ज्ञान ॥ हरिभजनीं ठेवूनि मन ॥ कृष्णार्पण देह केला ॥९९॥
संसारीं असोनि मायाजाळीं ॥ जो आठवी हरीसी अंतकाळीं ॥ तो मुक्तचि होय तत्काळीं ॥ संशय मनांत न धरावा ॥१००॥
हरिभजनीं हेत धरून ॥ व्याघ्रें देह टाकिला जाण ॥ जुण्यागडीं नागर ब्राह्मण ॥ तेथें जन्म घेईल तो ॥१॥
नरसी मेहेता वैष्णववीर ॥ तो व्याघ्रें घेतला अवतार ॥ त्याचें चरित्र अति प्रियकर ॥ श्रोतीं सादर परिसावें ॥२॥
संतचरित्र हेचि गंगा ॥ कीं हे भागीरथी चंद्रभागा ॥ येथें न्हावोनि पांडुरंगा ॥ शरण जावें सद्भावें ॥३॥
सुमन आणि शुद्धमती ॥ तुळसी सुमनें घेऊनि हातीं ॥ चरणावरी महीपती ॥ भावें मस्तक ठेवीतसे ॥४॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ षड्विंशतितमाध्याय रसाळ हा ॥१०५॥