विष्णूच्या संनिध गायन केलें असतां, हजार गाई दान दिल्याचें पुण्य मिळतें व वाद्य वाजविणाराला वाजपेय यज्ञाचें फळ मिळतें ॥!३॥
नाचणाराला सर्व तीर्थांत स्नान केल्याचें पुण्य मिळतें; या सर्वांना द्रव्य देणाराला हें सर्व पुण्य मिळतें ॥१४॥
नृत्य, गीत पाहिल्यानें व ऐकल्यानें पुण्याचा सहावा भाग मिळतो. संकटांत असतां, जर कोठें स्नानाकरितां पापी न मिळेल तर ॥१५॥
अथवा आजारी असून स्नानाला अशक्त असेल तर विष्णूच्या नामांनीं मार्जन करावें. कोणास सांग उद्यापन करण्यास सामर्थ्य नसेल तर ॥१६॥
व्रत संपूर्ण होण्याकरितां शेवटीं ब्राह्मण भोजन घालावें. ब्राह्मण हे पृथ्वीवर विष्णूचीं अव्यक्तरुपी स्वरुपें आहेत ॥१७॥
त्यांचा संतोष झाला म्हणजे विष्णु सर्वदा संतुष्ट होतात. कोणास दीपदान देण्यास सामर्थ्य नसल्यास दुसर्यानें लाविलेल्या दिव्याची वात सारावी ॥१८॥
किंवा त्या दिव्याचें प्रयत्नानें वातादिकांपासून रक्षण करावें. तुलसीवनादि न मिळाल्यास विष्णुभक्त ब्राह्मणाची पूजा करावी ॥१९॥
कारण, विष्णु आपल्या भक्तांजवळ सर्वदा राहतात. वैष्णव ब्राह्मण न मिळाल्यास व्रत करणारानें व्रत संपूर्ण होण्याकरितां गाई, पिंपळ, वड यांची सेवा करावी ॥२०॥
ऋषि म्हणालेः-- पिंपळ व वड हे ब्राह्मणाचे बरोबरीचे कसे सांगितले ॥२१॥
सर्व वृक्षांपेक्षां तेच पूज्यतम कशाकरितां केले ? सूत म्हणालेः-- भगवान विष्णूच, प्रत्यक्ष अश्वत्थरुपी आहेत; यांत संशय नाहीं ॥२२॥
वड हा रुद्ररुपी आहे व पळस ब्रह्मदेवस्वरुपी आहे. त्यांचें दर्शन व पूजा पापनाश करणारीं आहेत ॥२३॥
व त्यापासून दुःख विपत्ति, व्याधि व शत्रु यांचा नाश होतो. ऋषि म्हणतातः-- सूता ! ब्रह्मा, विष्णु व शंकर हे वृक्षरुप कसे झाले ॥२४॥
याविषयीं आम्हाला मोठी शंका उत्पन्न झाली आहे; तरी हे धर्मज्ञा ! ती कथा सांगा. सूत म्हणतातः-- पूर्वी देवांनीं पार्वती व शंकर यांचें सुरत चाललें असतां अग्नीला ब्राह्मणरुपानें पाठवून विघ्न केलें. तेव्हां रतिसुखांत विघ्न झालें म्हणून पार्वती संतापानें थरथर कंपायमान होऊन देवांना शाप देती झाली ॥२५॥२६॥
पार्वती म्हणालीः-- हे कृमिकीटादिक सुद्धां रतिसुख जाणतात, त्या रतिसुखाला विघ्न करणारे देवहो ! तुझी वृक्ष व्हा ॥२७॥
सूत म्हणालेः-- याप्रमाणें पार्वतीनें संतापून देवांना शाप दिला. त्यामुळें सर्व देवसमुदाय वृक्ष झाले ॥२८॥
हे ऋषिहो ! तेव्हांपासून विष्णु अश्वत्थ ( पिंपळ ) व शंकर वड झाले. पिंपळाला शनिवारीं स्पर्श करावा, इतर वारीं त्याला स्पर्श करुं नये ॥२९॥