Champa Shashthi 2024 चंपाषष्ठी शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
शनिवार, 7 डिसेंबर 2024 (05:24 IST)
Champa Shashthi 2024 चंपाषष्ठी किंवा स्कंद षष्ठी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथी साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले होते. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो.
या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धती आहे.
कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्याप्रमाणे त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच दरररोज फुलांच्या माळा वाढवत अर्पित केल्या जातात. सहा दिवस नंदादीप लावतात. या दरम्यान घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे, एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण-सुवासिनीला भोजनाला आमंत्रित करणे या प्रकारे उत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. खंडोबाची तळी भरून आरती केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.
तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन "सदानंदाचा येळकोट" किंवा "एळकोट एळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.