अंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य है जप का केला जातो?

मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (16:38 IST)
आपल्या हिंदू धर्मात राम नाम सत्य है चे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या नावाचा तीनदा जप केल्याने एक हजार वेळा देवाचे नाव जपल्या सारखेच प्रभाव पडतो असे म्हणतात. परंपरेनुसार अंत्यसंस्काराच्या वेळी ‘राम नाम सत्य है’ हा शब्द उच्चारला जातो, तर कोणत्याही आनंदाच्या वेळी हे चार शब्द उच्चारले जात नाहीत.
मग हे शब्द कोणाच्या तरी मृत्यूनंतरच का उच्चारले जातात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. तर ते समजून घेऊया.
 
राम नामाचा जप केल्याने काय होते?
अंत्यसंस्कारासाठी नेत असताना जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेव्हा हा शब्द मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना आणि जवळीकांना हे कळवाचे असते की मरण आल्यानंतर मनुष्य आपल्यासोबत काहीही घेऊन जात नाही. माणूस एकटा जन्माला येतो आणि मृत्यू झाल्यावर एकटाच जातो. शरीर नश्वर आहे आणि आत्मा या जीवनचक्रातून मुक्त होतो, सांसारिक आसक्तीपासून मुक्त होतो, म्हणून आता या मृत शरीराला काही अर्थ नाही, आणि रामाचे एकच नाव आहे जे सत्य आहे. या राम नामाचा जप केल्याने व्यक्ती या जगाचा निरोप घेतल्याची जाणीव होते.
 
जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्याच्या प्रियजनांना खूप दुःख होतो. ते या मृत्यूचे दुःख सहन करू शकत नाहीत, अशा वेळी रामाचे या प्रकारे नामस्मरण केल्याने त्यांना ते दुःख सहन करण्याची शक्ती मिळते. त्यांच्या वेदना कमी होऊन मानसिक शांती मिळते.
 
मनुष्य जे कर्म करतो ते भोगावेच लागते, म्हणजेच त्याचा पुढचा जन्म त्या आधारावर ठरवला जातो. पण जगरुपी माया कोणीच समजू शकत नाही, जो समजतो त्याला ज्ञानी म्हणतात. म्हणूनच जेव्हा मृतदेह नेतात तेव्हा राम नाम सत्य है हा जप मृत व्यक्तीसाठी केला जात नाही, तर त्याच्या जवळच्या आणि प्रियजनांसाठी केला जातो, जेणेकरून त्यांना समजेल की मृत्यू अटळ आहे आणि राम हेच सत्य आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती