श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (14:25 IST)
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून 3 वेळा आणि एकूण 21 दिवस निद्रा घेत असते. उरलेले 344 दिवस अष्टोप्रहर जागृत अवस्थेत असते. देवीची 21 दिवसाची निद्रा तीन तीन टप्प्यात या प्रकारे विभागली आहे -
 
घोर निद्रा
श्रम निद्रा
मोह निद्रा
 
मंचक याचा अर्थ पलंग असा आहे आणि देवी या काळात पलंगावर निद्रा घेते.
 
घोर निद्रा :- नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात. या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात. ही निद्रा तुळजाभवानी मंदिर संस्थानात असलेल्या चांदीच्या मंचकावर भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या समाप्ती पर्यंत निद्रा असते आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनावर आरूढ होते.
 
श्रम निद्रा :- घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे अधर्म कारस्थान पाहून त्याच्याशी युद्ध करण्यास सज्ज झाली नऊ दिवस असुराशी युद्ध करून महिषासुर नवव्या दिवशी देवीला शरण आला आणि तिच्या चरणाशी स्थान मागून सर्व देवतांची माफी मागू लागला. नऊ दिवसाच्या अहोरात्र युद्धामुळे आलेल्या थकव्याने शारदीय नवरात्र नंतर पाच दिवस आई निद्रा घेते याला श्रम निद्रा म्हणतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगराहुन पलंग येतो त्यावर आईसाहेब निद्रा घेतात या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात. ही निद्रा माहेरच्या लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध दशमी (दसरा) ते अश्विन शुद्ध पौर्णिमा (कोजागिरी पौर्णिमा) पर्यंत असते. नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. निद्रा घेण्याच्या आधी देवीला 108 साड्या नेसवल्या जातात. हा पलंग पायी तुळजापूरला दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणला जातो. पहाटे देवी सीमोल्लंघन खेळून या पलंगावर निद्रा घेते.
 
मोह निद्रा :- शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रीस्त असते. देवीची मोहन यात्रा हे सृजनाचे प्रतीक असून आठ दिवस निद्रा काळाचे संपल्यानंतर नवमी म्हणजेच तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्म दिवस असतो यामुळे या निद्रेस मोह निद्रा म्हणतात. हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचे सूचक आहेत एखादी स्त्री जशी नऊ महिन्यांनी सृजन होते तसा हा कालावधी असतो. 
देवी शारदीय अश्विन नवरात्राच्या आधी चांदीच्या पलंगावर निद्रा घेते. शारदीय अश्विन नवरात्राच्या नंतर पाच दिवस माहेरून आणलेल्या चंदन लाकडाच्या पलंगावर निद्रा घेते आणि शाकंभरी नवरात्र च्या दरम्यान 8 दिवस देवी चांदीच्या पलंगावर निद्रा घेते अशा अवघ्या विश्वाचा भार सोसून विसावा घेण्यासाठी आई या दिवसात गादीवर असते म्हणून भवानी भक्त आणि देवीचे आराधी गादी तक्का उशी यांचा त्याग करतात आणि काहीजण उपवास पण करतात.
 
निद्रा करी मंची जगदंबे
भाविक भक्त कदंबे
निद्रा करी मंची......
श्री जगदंबे नमोस्तु

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती