गोवा विधानसभा निवडणूक : उत्पल पर्रिकरांची भाजपला सोडचिठ्ठी, पणजीतून अपक्ष लढणार
शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (21:43 IST)
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनोहर पर्रिकरांच्या राजकीय वारसदारीवर हक्क सांगणारे त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती.
पणजीतून विधानसभेची उमेदवारी मागणाऱ्या उत्पल यांना भाजपनं कोणतंच आश्वासन दिलं नव्हतं आणि त्यानंतर शिवसेनेसह 'आप'पर्यंत सगळे पर्रिकरांच्या मागं उभं राहण्याची भाषा करु लागले.
मनोहर पर्रिकरांनी ज्या पणजी शहरातल्या विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवली, त्या जागेसाठी त्यांनी भाजपाकडे तिकीट मागितलं होतं. मात्र पणजीमधून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे.
'मुलगा आहे म्हणून भाजपात तिकिट मिळत नाही'
गोव्याच्या निवडणुकीची भाजपाची जबाबदारी महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. फडणवीस सातत्यानं गोव्यात तळ ठोकून आहेत.
जेव्हा उत्पल पर्रिकरांच्या तिकिटाच्या मागणीबद्दल त्यांना विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, "मनोहरभाईंनी गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवण्याकरता भरपूर काम केलं आहे. पण मनोहरभाईंचा किंवा एका नेत्याचा मुलगा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये तिकिट मिळत नाही.
त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो काही मी घेऊ शकत नाही. आमचं जे संसदीय मंडळ आहे, तेच त्याविषयी निर्णय घेऊ शकतं."
मनोहर पर्रिकरांचा मुलगा आहे म्हणून असलेल्या राजकीय वजनापोटी उत्पल यांना तिकिट मिळणार नाही हे तर भाजपानं स्पष्ट केलं होतं. .
"देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेवर मी काही मत मांडण्याची गरज नाही. पण गेली 34 वर्षं भाईंबरोबर (मनोहर पर्रिकर) जे कार्यकर्ते होते ते माझ्यासोबत आहेत," उत्पल पर्रिकरांनी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेबद्दल पत्रकारांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं.
"जे सध्या गोव्याच्या राजकारणात चाललं आहे ते मला मान्य होण्यासारखं नाही. प्रामाणिकपणा, चारित्र्य याला काही किंमत देणार नाही आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना तुम्ही मनोहर पर्रिकरांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघात तिकिट देणार? या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे केवळ पणजीपुरतं नाही आहे. गोव्यात सगळीकडेच जे चाललं आहे ते मान्य होण्यासारखं नाही," त्यांनी म्हटलं होतं.
पणजीची वारसदारी
सध्या इथं अंतान्सिओ ऊर्फ बाबुश मॉन्सेराटे आमदार आहेत.
2019मध्ये मनोहर पर्रिकरांचं निधन झाल्यावर जी पोटनिवडणूक झाली तेव्हा मॉन्सेराटे हे कॉंग्रेसचे उमेदवार होते आणि निवडूनही आले. पण त्याच वर्षी जे 10 कॉंग्रेसचे आमदार फुटून भाजपाला जाऊन मिळाले, त्यात मॉन्सेराटेही होते.
मनोहर पर्रिकर यांचं निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबात उमेदवारी देणार का अशी चर्चा होती आणि उत्पल यांचंही नाव होतं. पण उत्पल हे मनोहर पर्रिकर सक्रीय असतांना राजकारणापासून लांब राहिले. ते स्वत: इंजिनिअर आहेत आणि जवळपास दहा वर्षं नोकरीसाठी अमेरिकेत होते.
नंतर ते परत आले. पण पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून सिद्धार्थ कुंकेळीकर यांना तिकिट दिलं गेलं. त्यांचा या जागेवर अधिकारही होता कारण 2017 मध्ये जेव्हा मनोहर पर्रिकर केंद्रातून परत गोव्यात आले तेव्हा कुंकेळीकरांना त्यांच्यासाठी पणजीची जागा राजीनामा देऊन मोकळी केली.
उत्पल यांना भाजपा डावलतं आहे असं दिसताच विरोधी पक्ष त्यांच्यासाठी सरसावले होते. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न ते करताहेत. एका बाजूला 'पर्रिकरां'ना आपल्याकडे ओढायचं आणि दुसरीकडे 'पर्रिकरां'ना डावललं म्हणून भाजपाला खिंडीत गाठायचं.
'उत्पल अपक्ष उभे राहिले, तर कोणीही उमेदवार देऊ नयेत'
शिवसेना खासदार संजय राऊत यासाठी सर्वांत पुढे होते.
"मनोहर पर्रिकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाशी भाजपानं ज्या प्रकारचं वैर घेतलं आहे, ते काही कोणाच्या मनाला पटत नाही, जरी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांतले असलो तरीही," संजय राऊत सोमवारी (17 जानेवारी) माध्यमांशी बोलतांना म्हटलं होतं.
एवढं म्हणून राऊत थांबले नाहीत. उत्पल पर्रिकरांनी धाडस दाखवावं असं म्हणतांनाच जर ते अपक्ष म्हणून उभारले तर त्यांच्याविरुद्ध कोणीही उमेदवार देऊ नये असंही आवाहन राऊत यांनी केलं.
"मला खात्री आहे की उत्पल पर्रिकरांना भाजपाला उमेदवारी द्यावी लागेल. ज्याप्रकारे आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहिलो आहे ते पाहता भाजपाला उत्पल यांचा विचार करावाच लागेल. पण जर तसं झालं नाही आणि ते अपक्ष लढणार असतील तर सर्व विरोधी राजकीय पक्षांनी त्यांच्या मागे उभं रहावं अशी आमची भूमिका आहे. 'आम आदमी पार्टी' ,'तृणमूल', कॉंग्रेस, 'गोवा फॉरवर्ड पार्टी' यांच्यासह कोणीही त्यांच्याविरुद्ध उमेदवार देऊ नये," संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
एकीकडे शिवसेनेची भूमिका तर दुसरीकडे गोव्यातला महत्त्वाचा पक्ष बनलेल्या 'आप'नं पण पर्रिकरांना आपल्या जवळ ओढण्याचे संकेत दिले.
रविवारी (16 जानेवारी) अरविंद केजरीवाल गोव्यात होते. उत्पल पर्रिकरांना 'आप'मध्ये घेणार का असं विचारल्यावर म्हणाले," अगोदर उत्पल पर्रिकरांना 'आप'मध्ये यायचं आहे का ते विचारा मग मी सांगेन. त्यांचं स्वागत जरुर होईल, पण त्यांना यायचं आहे का?"
'पर्रिकरांचा मुलगा बंड करतो, हा नैतिक पेच'
गोव्यातल्या भाजपासमोर दोन मुख्य प्रश्न आहेत. एक म्हणजे भाजपासाठी पर्रिकरांच्या मुलानं टोकाची भूमिका घेणं हे किती धोक्याचं आहे? दुसरा, उत्पल पर्रिकर खरंच टोकाची भूमिका घेतील का?
"भाजपासाठी ही एका प्रकारे नैतिक आणि भावनिक कोंडी झाली आहे. म्हणजे पर्रिकरांचा मुलगासुद्धा आज बंड करतो, त्याला भाजपा आपला वाटत नाही, हा संदेश राज्यभर जाणं हा भाजपासमोरचा कठिण प्रश्न आहे. निवडणुकीच्या गणितात पणजी मतदारसंघात ते एकदम ताकदवान आहेत आणि त्यांना आत्मविश्वासही आहे. पण पर्रिकर विरोधात जाणं हा पेच आहे," असं गेली अनेक वर्षं गोव्याचं राजकारण जवळून बघणारे राजकीय पत्रकार प्रमोद आचार्य यांना वाटतं.
उत्पल पर्रिकर सध्या तरी भूमिका सोडणार नाही असंही त्यांना वाटतं. "सध्या तरी उत्पल पर्रिकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि तिकिट दिलं नाही तर ते अपक्ष म्हणून उभे राहू शकतात. त्यांनी तशी तयारी ठेवली आहे आणि त्यादृष्टीनं ते कामही करताहेत. भाजपा त्यांना समजावण्याचा पूर्ण प्रत्यत्न करेल, पण त्यांना तिकिट देण्याच्या मात्र पक्षाचा मूड नाही. बाकीच्या मतदारसंघात याचा काय परिणाम होईल याचाही त्यांना अंदाज घ्यावा लागेल," प्रमोद आचार्य म्हणतात.