गणेशोत्सव काळात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या लालबागच्या राजाचा थाटच न्यारा असेच म्हणावे लागेल. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी १० दिवसांत लाखो गणेशभक्त लालबागला हजेरी लावतात. दर्शनासाठी याठिकाणी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा असतात. २४ तास भाविकांची अलोट गर्दी लोटल्याचं दिसून येते. गणेश विसर्जनाच्या वेळीही मुंबईच्या रस्त्यांवर तुडुंब गर्दी असते. यंदा निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा होत असल्याने लालबागच्या राजाचं दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. रस्त्यालगतच्या इमारती, टेरेस, उड्डाणपूल येथे भाविकांनी लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती.
लालबागच्या राजासह अनेक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भाविकांची गर्दी पाहता चोरांचा सुळसुळाट झाला. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल ५० मोबाईल, सोन्याचे दागिने लंपास केले. त्याचा फटका गणेशभक्तांना बसला. गणेश मिरवणुकीत मोबाईल चोरी, पाकीट चोरीच्या, सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. याबाबत पोलीस तक्रार देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रारदारांची रांग लागली होती.