'कम्बख्त इश्क' - कमनशिबी प्रेक्षक

चित्रपटाचा व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी करीनाच्‍या फोटोवर क्लिक करा...

बॅनर : नाडियाडवाला ग्रेंडसन एंटरटेनमेंट, इरॉस एंटरटेनमेंट
निर्माता : साजिद नाडियादवाल
दिग्दर्शक : साबिर खा
गीतकार : आरडीबी, अंविता दत्त गुप्ता, साबिर खान
संगीत : आरडीबी, अनू मलिक, सुलेमान मर्चेण्ट
कलाकार : अक्षय कुमार, करीना कपूर, आफताब शिवदासानी, अमृता अरोरा, सिल्वेस्टर स्टॅलोन, ब्रॅंडन राउथ, डेनिस रिचर्डस, किरण खेर, जावेद जाफरी, बोमन ईरानी
रेटिंग : 2/5

'कम्बख्त इश्क' पाहिल्यानंतर एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमधून बाहेर पडून ढाब्यावर जेवल्यासारखं वाटतं. निर्माता साजिद नडियादवालाने भरपूर पैसा खर्च केलाय, पण तो कारणी लागलेला नाही. दिग्दर्शनच कमकुवत असेल तर कितीही पैसा ओतला तरी त्याचा काय उपयोग. हा चित्रपट साजिदच्याच 'गोलमाल' किंवा 'सिंग इज किंग' या साखळीतला आहे, असे सांगितले होते. हे दोन्ही 'बिनडोक' म्हणजे डोके बाहेर ठेवून पहायचे चित्रपट असले तरी त्यात काही एक मनोरंजन नक्की होते. कम्बख्त इश्कमध्ये त्याचाच अभाव जाणवतोय.

'कम्बख्त इश्क' दोन व्यक्तींच्या परस्परातील नात्यांची कहाणी आहे. या व्यक्तींचे स्वभावही परस्परांहून अगदीच भिन्न आहेत. विराज (अक्षय कुमार) हॉलीवूडमधील प्रसिद्ध स्टंटमॅन आहे. बड्या बड्या हिरोंचा तो डमी आहे. प्रेम आणि लग्न हे दोन शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीत. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी पारंपरिक आहे. स्टंटमधून मिळणारे पैसे तो स्त्रियांवर उडवतो.

IFM
सिमरिता (करीना कपूर) सर्जन होणार आहे. फावल्या वेळात ती मॉडेलिंगही करते. स्वतःच्या बळावर सुपरमॉडेल बनलेल्या सिमरिताचा पुरूषांवर विश्वास नाही. पुरूषांची आयुष्याला गरजच काय असा तिचा सवाल आहे.

विराजचे छोटा भाऊ लकीवर (आफताब शिवदासानी) खूप प्रेम आहे. पण विराजपेक्षा लकी वेगळा आहे. तो कामिनीवर (अमृता अरोरा) प्रेम करतोय. तिच्याशी त्याला लग्नही करायचेय. कामिनी मॉडेल आहे आणि सिमरिताची मैत्रिण आहे.

विराज लकीला आणि सिमिरिता अमृताला लग्नपासून परावृत्त करू पाहते. पण दोघेही ऐकत नाही. लकी व कामिनीचे लग्न होते. या माध्यमातून विराज आणि सिमरिता परस्परांच्या विरोधात उभे रहातात. मध्ये अमेरिकन अभिनेत्री डेनिस रिचर्ड्सचे एक उपकथानक आहे.

अविंता दत्त-गुप्ता, इशिता मोईत्रा आणि साबिर खान या तिघांनी फालतू पटकथा लिहिली आहे. पटकथेतही तितकेच फालतू आणि 'हास्यास्पद' (म्हणजे हसू आणणारे नव्हे) प्रसंग रचलेत. त्यात जावेद जाफरीचे एक 'स्किट' टाकलेय. तेही तितकेच फालतू आहे. त्याचा कथेशी काहीही संबंध नाही.

यातल्या अनेक प्रसंगांना तार्किकता नाही. अशा चित्रपटांसाठी डोके घरी ठेवून यावे लागते हे नक्की. पण विनोद सादर करतानाही तार्किकता लागते. त्याचा पूर्ण अभाव आहे. 'बिनडोक' चित्रपट बनविण्यासाठी दिग्दर्शकाने 'डोके' वापरावे लागते. पण तेही इथे वापरले गेलेले नाही. दिग्दर्शक साबीर खान साफ अपयशी ठरलाय. दोन चार प्रसंग सोडले तर हास्यस्फोटक जागा नाहीत. अनू मलिकचे संगीतही खास नाही.

अक्षय कुमारने आता काही नवीन विचार केला पाहिजे. कॉमेडी करतानाही ती आपल्याला शोभेल अशीच केली पाहिजे. अमृता अरोराचा अभिनयाशी काहीही संबंध नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. करीना कपूरने वाट्याला आलेली भूमिका ठीक केलीय. बोमन इराणी, किरण खेर यांनी का काम केलेय कळत नाही. सिल्वेस्टर स्टॅलोन, डेनिस रिचर्ड्स, ब्रॅंडन रॉथ यांनी केवळ बॉलीवूडप्रेमाखातर चित्रपट केलाय.

एकुणात कम्बख्त इश्क निराशाजनक आहे. फार अपेक्षा ठेवून गेलात तर आत्यंतिक निराशा घेऊन बाहेर याल. कम्बख्त म्हणजे कमनशीबी, याचाच नेमका अर्थ चित्रपटगृहाबाहेर पडल्यानंतर कळतो.