डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे मृत्यू

मंगळवार, 2 जून 2020 (18:09 IST)
मुंबईत हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवला आहे. डॉ. चित्तरंजन भावे असं या डॉक्टरांचं नाव असून त्यांना कोरोनाच्या उपचारांसाठी बेड मिळण्यासाठी तब्बल १० तास वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे त्यांनी सेवा दिलेल्या मुंबईतल्या रहेजा हॉस्पिटलमध्ये त्यांना बेड उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
डॉ. चित्तरंजन भावे हे कान नाक घसा तज्ज्ञ आहेत. रहेजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी आतापर्यंत अनेकांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. तिथेच काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कोरोनाच्या रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. मात्र, जास्त त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी जेव्हा डॉ. भावे स्वत: कार चालवत रुग्णालयात पोहोचले, तेव्हा मात्र त्यांना स्वत:साठीच बेड मिळू शकला नाही. तब्बल १० तास वाट पाहिल्यानंतर त्यांना बेड उपलब्ध झाला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू ओढवला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती