सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा

शुक्रवार, 11 जून 2021 (17:02 IST)
गेल्या आठवड्यापासून म्हणजेच ५ जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि काही मोठ्या महानगरपालिका यांचे स्वतंत्र प्रशासकीय गट करून त्यांची विभागणी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली. त्यानुसार दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगर पालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
राज्य सरकारने जाहीर केलेल्या टप्प्यांनुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली आहे. दर गुरुवारी यासंदर्भात आढाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महानगर पालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येतील, किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेऊन निर्बंध कठोर होतील, याविषयीचा निर्णय घेईल. नव्याने घेण्यात आलेले निर्णय ठरल्याप्रमाणे १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून त्या त्या जिल्ह्यात किंवा महानगर पालिका क्षेत्रामध्ये लागू करण्यात येतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती